निवडणूक आयोगाने मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि तमलूकमधील भाजपचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांच्या प्रचारावर 24 तासांसाठी बंदी घातली. गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या अशोभनीय वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली. निवडणूक आयोगाचा हा आदेश मंगळवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून लागू झाला.
निवडणूक आयोगाने 17 मे रोजी या विधानाची दखल घेत हे विधान चुकीचे, तर्कहीन आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे असल्याचे म्हटले होते. या असभ्य टिप्पणीमुळे निवडणूक आयोगाने गंगोपाध्याय यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती, ज्याला गंगोपाध्याय यांनी सोमवारी उत्तर दिले.
गंगोपाध्याय यांचे उत्तर वाचून आयोगाने त्यांचे म्हणणे पुन्हा ऐकून घेतले आणि त्यांनी ममता बॅनर्जींवर खालच्या पातळीवरचा वैयक्तिक हल्ला केल्याचा निष्कर्ष काढला. या विधानावरून देशातील महिलांची स्थिती काय आहे, हे लक्षात येते. या वक्तव्यामुळे बंगालचा अपमान झाला आहे. असेही आयोगाने म्हटले आहे.
मार्चमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचा राजीनामा देऊन गंगोपाध्याय भाजपमध्ये दाखल झाले होते. ते यावर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होणार होते; मात्र तत्पूर्वीच त्यांनी 5 मार्च रोजी राजीनामा दिला होता. न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच गंगोपाध्याय यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती.