अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊतांना कैदेची शिक्षा

0
2

>> न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन देखील मंजूर

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच 25 हजार रुपयांच्या दंडाचीही शिक्षा फर्मावली. त्यानंतर लगोलग संजय राऊत यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी वरिष्ठ न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. तसेच 30 दिवसांच्या आत वरिष्ठ न्यायालयात अपील करून दाद मागण्याची मुभाही देण्यात आली.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून मीरा-भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यापैकी 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप राऊत यांनी केला होता. त्यानंतर, मेधा यांनी राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

पुराव्यादाखल सादर केलेली कागदपत्रे, चित्रफितींचा विचार करता राऊत यांनी मेधा यांच्याविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे मेधा यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली असल्याचे सादर केलेल्या पुराव्यातून सिद्ध होते, असे न्यायालयाने आदेशात म्हटले होते.