>> जुने गोवे पोलिसांत तक्रार; दोघांची अटकपूर्व जामिनासाठी धाव
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची एक तक्रार जुने गोवे पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली असून, या प्रकरणातील दोन संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्या दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
मेरशी येथे राहणाऱ्या नौदलाच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला राज्य सरकारच्या अबकारी खात्यात उपनिरीक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून सहा लाख रुपये उकळण्यात आले होते. या प्रकरणी शिवा मोरे आणि सरिता केरकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी मार्च 2023 ते ऑक्टोबर 2024 या काळात तक्रारदाराकडून 6 लाख रुपये घेतले होते. संशयितांनी अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नावे बनावट दस्तऐवज तयार करून तक्रारदाराच्या मुलाचे नाव नोकरीसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांच्या अंतिम यादीत असल्याचे दाखविले. त्यानंतर त्या तक्रारदाराकडे सदर दस्तऐवज सुपूर्द केला. तक्रारदाराने याबाबत अबकारी खात्यामध्ये चौकशी केली असता ही यादी खोटी असल्याचे समोर आले. दरम्यान, नोकरीच्या आमिषाने फसवणूक झालेले अनेकजण आता तक्रार दाखल करत असून, ही व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत.