अफलातून

0
10
  • मीना समुद्र

घरातल्या आणि टीव्हीवरच्या- दोन्ही कोळ्यांना लागू होणारी ही कविता. नवऱ्याबद्दलची बायकोची तक्रार असे मानवी भावभावनांचे आणि त्यातूनही मिसेस स्पायडरमॅनची तक्रार, चिंता, काळजी, वात्सल्य, प्रेम या स्त्रीसुलभ भावना इतक्या ताकदीने सहजसोप्या शब्दात व्यक्त करणे ही साधी गोष्ट नाही.

पावसाळा येण्यापूर्वी मृगाचे लालशेंदरी किडे जमिनीतून डोकी वर काढताना दिसतात. वर्षभर कुठे लपतात कोण जाणे; पण मोसमी ऋतूचा सुगावा त्यांना बरोब्बर लागतो. ते दिसले की शेतकऱ्यांना पावसाची ग्वाही मिळते. म्हणजे हे छोटे पाऊसदूतच. या कीटकांचे आगमन आशादायक असले तरी पावसाळ्यात येऊन घरात हमखास ठिय्या मारणारे काही कीटक प्रचंड त्रासदायक असतात. त्यातले पहिले म्हणजे डास! जिथे-तिथे पाणी साचून त्यांची संख्या बेसुमार वाढते आणि घरात शिरून मग माणसांना ते आपली शिकार बनवतात. कोंदट हवेमुळे झुरळांचा, पालींचा सुळसुळाट वाढतो. त्यामानाने अष्टपाद कोळी मात्र निरुपद्रवी.

असाच एक कोळी परवा कोपऱ्यातला झाडू घेताना तिथून भिंतीवर आणि मग दाराकडे तुरूतुरू पळताना दिसला. त्याला झाडू घेऊन पळवून लावताच पाय आकसून घेतले आणि गोळीसारखा होऊन फटीत लपून बसला. मग त्याचा नाद सोडून दिला. एरव्हीपेक्षा आकाराने बराच मोठा वाटला होता म्हणून बाहेर हाकलून देणार होते. सध्या घरात मांजर नाही, नाहीतर अशी हलणारी वस्तू पाहून तिने पंजाच मारला असता. मात्र पाली-झुरळांइतकी या कोळ्याची किळस नाही वाटत. एकदमच टपकला तर थोडंसं गांगरून जायला होतं खरं; पण हा घरगुती कोळी ना चावत, ना काही इजा करत. आपलं जाळं विणण्याचं काम शांतपणे करत तो घराच्या कोपऱ्यात बसलेला असतो.
कोळी म्हणजे मच्छीमार, मासे पकडणारा. पण हा कोळी जाळी स्वतः विणून त्यात अडकलेल्या माशा, चिलटं असे छोटे-छोटे कीटक खाऊन आपली गुजराण करतो. कोळ्यासारखं- धीवरासारखं जाळं टाकून बसलेला म्हणून त्याला ‘कोळी’ म्हटले जात असावे. आपल्या शरीराच्या विशिष्ट भागातून चिकट द्रव काढून, ते ताणून-ओढून कोळी अष्टकोनी जाळी तयार करतात. इतके बारीक, नाजूक असे ते तलम तंतूंचे जाळे फार सुंदर दिसते. ते धागे मात्र चिवट असतात. जाड, बारीक, मऊ, खरबरीत, गुळगुळीत, चिकट, ओलसर अशा प्रकारच्या पाहिजे तिथे पाहिजे तशा तंतूंची तलम रेख ओढल्यासारखे ते दिसतात. पण असतात बळकट. त्याच्या मध्यभागी कोळी पडून राहतो आणि एखादे भक्ष्य जाळ्यात सापडलेच तर त्या धाग्यांना बसणाऱ्या हेलकाव्याने किंवा किंचित थरथरीनेही ते निद्रिस्त वाटणारे कोळी जागे होतात आणि त्या भक्ष्याचा फडशा पाडतात. बराच काळ भक्ष्याविनाही ते राहू शकतात.

कोळी सतत आपल्या कामात इतके मग्न असतात की एका ठिकाणची कोळिष्टकं किंवा ही जाळी-जळमटं काढावीत तर चारआठ दिवसांत पुन्हा ती लागलेली दिसतात. कोळ्याचा कामसूपणा आणि त्याचं कसब शिकण्यासारखं. जाळं तुटलं तरी पुन्हा पुन्हा तो बांधत राहतो. एका लढाईत पराभूत झालेल्या राजाने भयभीत होऊन गुहेचा आश्रय घेतला असता त्याला कोळ्याच्या जाळ्याचे हे कसब आणि पडला तरी पुन्हा-पुन्हा लोंबकळत राहून त्याचे जाळे बांधण्याचे कौशल्य आणि जिद्द पाहून त्यानेही धडा घेतला आणि हार न मानता पुन्हा प्रयत्न करून आपले राज्य मिळविण्यासाठी तो सज्ज झाला. ही कथा आपण वाचलेली असलेच लहानपणी. कोळ्याचे इतके कुशलतेने विणलेले जाळे तोडायचे, काढायचेही जिवावर येते काहीवेळा. पण किती झाले तरी ती आपल्या दृष्टीने जाळीजळमटेच! रानावनात, पडिक जागी कोळ्यांचे हे वर्तुळ झाडापेडांवरही दिसून येते. पावसाचे थेंब त्यात अडकून चमकतात. तसेच रानटी कोळी घरगुती कोळ्यांपेक्षा आकाराने मोठे असावेत. काळ्या, करड्या, तपकिरी रंगाच्या या कोळ्यांचे पाय काटकुळे असतात. काहींचे केसाळही असतात. काही कोळी विषारी असतात. कोळी अंगाखाली चिरडला तर त्याजागी खाज, पुरळ, लाली येण्याची शक्यता असते. पण तो अंगावरून फिरला तर नवे कपडे मिळतात असाही एक समज आहे.

पण घरातले डास, चिलटं अशांना जाळ्यात पकडणारा कोळी हुशार खरा! त्याला कुठेही उंच चढता येते. चपळ हालचाली करता येतात. या त्याच्या गुणांमुळेच तो कुतूहलजनक आणि बालकप्रिय ठरला, आणि दूरदर्शनवर ‘स्पायडरमॅन’चे चांगल्यांना मदत आणि दुष्टांना धडा शिकवणारे पात्र निर्माण झाले. अन्‌‍ ते अतिशय लोकप्रियही ठरले. त्याच्या लालचुटूक पोशाखावर असलेले काळ्या रेघांचे जाळे आणि छाती किंवा पाठीवर असलेले कोळ्याचे चित्र हेही अनुकरणीय झाले. स्पायडरमॅनचा मुखवटा, टोप्या, त्याचा छाप असलेला पोशाख यांनी बाजारपेठा गजबजल्या. बराच काळपर्यंत लोकमनावर अधिराज्य गाजवणारा असा हा स्पायडरमॅन! कोळ्याची वैशिष्ट्ये असणारा, त्याचे गुण अंगी असणारा अफलातून माणूस! आणि अशा या स्पायडरमॅनवर श्री. संदीप खरे यांनी लिहिलेले अफलातून बालगाणे, बोलगाणे- ‘स्पायडर मॅन स्पायडर मॅन- मिस्सेस स्पायडर मॅन!’ डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि साथींनी गायिलेले हे अफलातून बालगीत मोठ्यांनाही आवडेल असे. मिस्सेस स्पायडरमॅनची कथा-व्यथा त्यात विणलेली.

स्पायडरमॅनची बायको त्याला म्हणजे तिच्या ‘ह्यांना’ ‘चिकट’ अशी पदवी देते. त्याच्या अंगातील द्रवामुळे ती सार्थ आहे तरी ‘चिकट’ म्हणजे कंजूष या अर्थी मोठ्या खुबीने हे विशेषण कवीने कोळ्याला बहाल केले आहे. फक्त भिंतीला चिकटण्यापुरते ते चिकट आहेत, पण सगळ्यांची कामे मात्र फुकट करून देतात. कुठलाही चिकटपणा किंवा कंजूषपणा न करता. कुठल्या क्षणी लग्न केलं कोण जाणे. कारण खोट्या नशिबाने कोळ्याच्या नववधूचा नवीन घरात प्रवेश झाल्यावर तिला नुसती जळमटंच जळमटं दिसतात. नवरदेव कुठल्या कोपऱ्यात बसले असतील ते काही सांगता येत नाही. त्यामुळे छतजमीन तिला बिचारीला झाडून लख्खही करता येत नाही. धुणं, इस्त्री काही नसलेला एकच एक ड्रेस घालून हे नवरोबा फिरतात. त्याच्या बायकोला वाटते कधी झब्बा, कधी सूट घालावा. पण कसली हौसच नाही. आचरट, गबाळा ड्रेस घालून तस्सेच भटकायला जातात, दाढी-आंघोळ न करताच उठलं की आपले कुठेही लटकायला लागतात. स्पायटरमॅनच्या या बेशिस्तीवर मिसेस स्पायडरमॅन काही बोलायला जावं, विचारावं म्हटलं तर नुसते एकटक बघत राहतात. डोळ्याची पापणीही लवत नाही. त्यांच्या मनात नक्की काय आहे हे चेहऱ्यावरून कळत नाही. आता अशा पतिदेवांना घेऊन लग्नमुंजीत कसं जायचं? तिथे नवरा-नवरी, मुंजा मुलगा, उत्सवमूर्ती बाजूलाच राहतात आणि यांना बघण्यासाठी त्यांच्यासमोर रांगा लागतात. बरं, पोराबाळाकडेही धड लक्ष नाही. किती रडायचं आणि किती बोलायचं, काय काय सांगायचं? रोज यांचा फोटो पेपरमध्ये येतो म्हणून काय उपयोग त्या प्रसिद्धीचा अन्‌‍ नावाचा? त्याचं काय लोणचं घालायचं का? एकदा मुलांच्या शाळेत गेले होते तर मास्तरांशी बोलायचं सोडून त्यांच्यासमोर जाळं टाकून स्वतः उलटं टांगून लोंबत होते. किती ऑड वाटलं मुलांना!’ मिसेस स्पायडरमॅनची ही तक्रार किती रास्त वाटते! ‘मी आपली घरात 24 तास डांबलेली आणि हे मस्त मोकाट वाऱ्यावर फिरतात. येथे कोण काळजी लागून राहते जिवाला. जीव मुळीच थाऱ्यावर नसतो. हे कुठं असतील, कसे असतील, काय करत असतील म्हणून. लटकत लटकत इकडे-तिकडे जातात. भिंतीला चिकटून बसतात. अहो काही सांगता येतं का वेळकाळ? समजा जाळं कुठं अडलं तर आणि डिंक संपला तर..?’ मिसेस स्वायडरमॅनला ही काळजी सतत वाटते.

आता मला सांगा, दुसऱ्यासाठी आपला जीव असा टांगून घेतं का कुणी? मी यांना बोलते पण मग माझीच मला कीव येते. मेटाकुटीनं गृहस्थी निभवणाऱ्या गृहिणीची ही तक्रार आहे. तरीपण ‘असे आमचे हे आणि अशी मी, तरी आमचं नातं रेशिमधाग्यांनी विणलेलं आहे. सोसायचं अन्‌‍ झेलायचं असलं तरी ते भाग्याचं.’ एक गोष्ट मात्र त्या कोळिणीला आडवते, ती म्हणजे, ‘बाहेर जेव्हा काहीच नसतं, आमचं ध्यान कसं सांगू मलाच येऊन चिकटून बसतं.’
घरातल्या आणि टीव्हीवरच्या अशा दोन्ही कोळ्यांना लागू होणारी ही कविता. नवऱ्याबद्दलची बायकोची तक्रार असे मानवी भावभावनांचे आणि त्यातूनही मिसेस स्पायडरमॅनची तक्रार, चिंता, काळजी, वात्सल्य, प्रेम या स्त्रीसुलभ भावना इतक्या ताकदीने सहजसोप्या शब्दात व्यक्त करणे ही साधी गोष्ट नाही. मानवी मनाची स्पंदनं अतिशय गमतीने आणि हळुवारपणे या गाण्यातून व्यक्त झाली आहे. देशी-विदेशी वाद्यांचा आणि संगीताचा प्रयोग करीत गेलेलं हे गाणं म्हणूनच अफलातून वाटतं!