>> भारताविरुद्धच्या कसोटीसाठी संघ जाहीर
भारताविरुद्ध बंगळुरू येथे १४ जूनपासून खेळविल्या जाणार्या आपल्या शुभारंभी कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तान संघाने आपल्या संघात चार तज्ज्ञ फिरकीपटूंना निवडले आहे. यामध्ये ऑफब्रेक गोलंदाज मुजीब रहमान, डावखुरा फिरकीपटू आमिर हमझा, लेगस्पिनर राशिद खान व चायनामन झहीर खान यांचा समावेश आहे.
नुकत्यात संपलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वात मुजीब व राशिद यांनी प्रभावी कामगिरी करत अनुक्रमे किंग्स इलेव्हन पंजाब व सनरायझर्स हैदराबादच्या वाटचालीत सिंहाचा वाटा उचलला होता. राजस्थान रॉयल्सशी करार केलेल्या १९ वर्षीय झहीर खानला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या अफगाण संघाचा तो प्रमुख घटक होता. तर हमझा याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोर्याने बळी घेत निवड समितीला प्रभावित केले. बांगलादेशविरुद्ध देहरादून येथे ३, ५ व ७ जून रोजी होणार्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत तसेच भारताविरुद्धच्या एकमेव कसोटीत संघाचे नेतृत्व असगर स्टानिकझाय करणार आहे. कसोटीसाठी निवडलेल्या केवळ पाच खेळाडूंची टी-२० साठी विचार करण्यात आला असून क्रिकेटच्या या अतिझटपट प्रकारासाठी युवा खेळाडूंना पसंती देण्यात आली आहे.
कसोटी संघ ः असगर स्टानिकझाय (कर्णधार), जावेद अहमदी, इहसानुल्ला, मोहम्मद शहजाद (यष्टिरक्षक), मुजीब रहमान, नासिर जमाल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, अफसर झाझाय, मोहम्मद नबी, राशिद खान, आमिर हमझा, सय्यद शिरसाद, यामिन अहमदझाय, वफादार व झहीर खान.
टी-२० संघ ः असगर स्टानिकझाय (कर्णधार), नजीब ताराकाय, उस्मान गनी, मोहम्मद शहजाद, मुजीब रहमान, नजिबुल्ला झादरान, समिउल्ला शेनवारी, शफिकुल्ला, दार्विश रसुली, मोहम्मद नबी, राशिद खान, गुलबदिन नैब, करिम जनत, शराफुद्दिन अश्रफ, शापूर झादरान व आफताब आलम.