अफगाणिस्तानातील महत्त्वाच्या भागांवर तालिबानींचा ताबा

0
32

>> काबूलवर हल्ल्याची शक्यता

अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून माघारीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर तालिबानने आक्रमक पवित्रा घेत अफगाणिस्तानमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा ताबा घेत जवळपास दोन तृतीयांश भागावर वर्चस्व मिळवले आहे. तालिबानने कंदाहार, हेरात, गझनी या महत्त्वाच्या शहरांसह काबूलजवळील लोगार प्रांतावरही ताबा मिळवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये तालिबान राजधानी काबूलवर हल्ला करण्याची शक्यता आहे.

तालिबानकडून दिवसेंदिवस अधिक आक्रमक हल्ले केले जात असून राजधानी काबूलपासून ९० किमी अंतर दूर असणार्‍या लोगार प्रांतावरही शुक्रवारी ताबा मिळवला आहे. त्यामुळे राजधानी काबूलच्या जवळच्या राज्यांमध्ये तालिबानचे वर्चस्व निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री उशिरा तालिबानने कंदाहार प्रांताचा ताबा घेतला. तालिबानने ताबा घेतल्यानंतर अनेक सरकारी कर्मचारी आणि नागरिकांनी शहरातून पलायन केले. तालिबानने काबूलच्या जवळील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी तालिबानने वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे तालिबान कधीही काबूलवर हल्ला करू शकतो. काबूलवर तालिबानचा झेंडा फडकल्यास अफगाणिस्तान सरकारला पायउतार व्हावे लागणार आहे.

अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळल्यानंतर आता अमेरिका अफगाणिस्तानमध्ये तीन हजार सैनिकांना पाठवणार आहे. तर, ब्रिटन आणि कॅनडाने आपले खास प्रशिक्षित कमांडो पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे सैन्य युद्धासाठी पाठवण्यात येणार नाही.

या दूतावासातील अधिकारी, कर्मचार्‍यांना सुरक्षितपणे पुन्हा अमेरिकेत आणण्यासाठी अमेरिकेने तीन हजार सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटन देखील आपले नागरिक अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी ६०० कमांडो अफगाणिस्तानमध्ये पाठवणार आहे.