- – मीना समुद्र
अप्रूप असेल तर जीवन आनंदी, शांत, समाधानी असतं. अप्रूप नसेल तेव्हा आत्मिक आनंद होत नाही आणि आत्मिक आनंद झाला नाही तर स्मरणात काही राहत नाही, स्मृतिपटलावर कधीच उमटत नाही. एखाद्या गोष्टीबद्दलचं अप्रूप वाटणं, कुतूहल वाटणं ही माणसाची जागृतावस्था आहे.
ऊे र्ूेी ज्ञपेु ुहरीं शुशिीींी वे ींे ीींरू लीशरींर्ळींश? ‘नेहमी सर्जनशील, कृतिशील राहण्यासाठी तज्ज्ञमंडळी काय करतात?’ -अशा मथळ्याखाली परवा फेसबुकवर ‘स्वरस्वप्न’च्या स्वप्ना दातार यांचं एक सुंदर भाषण ऐकलं. त्या एक उत्कृष्ट व्हायोलिनिस्ट आहेत. अतिशय साधेपणाने, दिलखुशपणे गप्पा माराव्यात तसे त्यांचे बोलणे. अतिशय मधुर, आर्जवी स्वरही ऐकावासा वाटणारा. बालपणीचे गमतीजमतीचे किस्से सांगताना त्या म्हणाल्या की, आमचे बालपण टी.व्ही.शिवाय आणि तरुणपण इंटरनेटशिवाय गेले. टी.व्ही. स्वतःच्या घरी नाही म्हणून दुसर्यांकडे जाऊन, शिस्त-शांतता पाळून त्यांनी पाहिला. शनिवारी मराठी, रविवारी हिंदी चित्रपट, गुरुवारी छायागीत, शुक्रवारी ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’मधली झिरझिरीत साडीतली, डोक्यात फुलांचा मोठ्ठा गुच्छ घालणारी तबस्सुम अशा सार्या आठवणी ऐकताना आपलेही स्मरणरंजन होते. कारण त्या काळच्या बर्याच जणांच्या अशाच प्रकारच्या आठवणी या थोडक्यात समाधान-आनंद शोधणार्या वृत्तीच्या होत्या. त्यामुळे असंख्य लोकांनी सहमतीदर्शक मते मांडली.
या वृत्तीच्या मुळाशी होतं त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल- मग ती अगदी लहानसहान का असेना- वाटणारं अप्रूप! हे अप्रूप असेल तर जीवन आनंदी, शांत, समाधानी असतं. ‘अप्रूप नसेल तेव्हा आत्मिक आनंद होत नाही आणि आत्मिक आनंद झाला नाही तर स्मरणात काही राहत नाही, स्मृतिपटलावर कधीच उमटत नाही’ हा त्यांचा स्वानुभवजन्य निष्कर्ष आहे. हे अगदी छोट्या-छोट्या दुर्मीळ गोष्टींचं कुतूहल त्यांच्या मनात जागं असल्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद बहरला आणि त्यांना कलेत जीव ओतता आला; सर्जकता वाढीला लागली.
दुर्लभ, अलभ्य, अप्राप्य अशा गोष्टींचं माणसाला नेहमी कुतूहल असतंच. त्या प्राप्त करण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण होते. आणि कष्टपूर्वक, प्रयत्नपूर्वक ती गोष्ट साध्य झाली की मनाला निर्व्याज असा आनंद मिळतो. आजकालच्या मुलांना सर्वकाही तयार, आयते मिळते. त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायला त्यांचे पालक सदैव तयार असतात. वस्तूंची, वस्त्राप्रावरणांची भरमार असते. अवास्तव मागण्याही पुरवल्या जातात. सारे काही अनायास मिळाले की अप्रूप नष्ट होते. कुतूहल संपले की माणसाला एकप्रकारे जडत्व येते. आजकाल मुलांना नवीन कपडे, टीव्ही, फ्रीज हे न मागताही मिळते. त्यामुळे त्याचे काहीच अप्रूप वाटत नाही. ही मुलं त्यांचं बालपण कशात बघणार असा प्रश्न स्वप्ना दातार यांना पडतो. फ्रीजची केवढी क्रेझ असायची आमच्या वेळी. त्यातली थंडगार सरबतं, घरी बनवलेलं आईस्क्रीम, कुल्फी, अगदी त्यात पाणी ठेवून केलेलं बर्फ कडाम्कुडूम् करून खाण्यातही केवढी गंमत असायची. अगदी साधे चिंचोके, बांगड्यांच्या काचा जमवण्यात आणि त्यांचे नाना आकार-प्रकारचे खेळ शोधून काढण्यात एक वेगळाच आनंद होता.
लहान मुलाच्या डोक्यात जे कुतूहल दिसतं, त्याच्या वृत्तीतही ते असतं त्यामुळे नानाप्रकारच्या हालचाली, धडपड करून ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतं. वाढदिवसाचा केकही केव्हा एकदा कापतोय आणि खातोय असे त्याला झालेले असते. त्याच्या कुतूहलामुळे आधीच बोटे खुपसून बोटाला लागलेला केक चाटण्यात त्यांना केवढी गोडी वाटते. भेटवस्तूंचं सुंदर चंदेरी, सोनेरी वेष्टन किंवा आवरण काढण्याची, फाडण्याची त्यांना घाई झालेली असते तीही आतली वस्तू पाहण्याच्या कुतूहलापायीच!
माझ्या लहानपणी घराजवळच गाण्याचा क्लास होता. माझ्या मैत्रिणीचे वडील, भाऊ हे सगळे संगीत क्षेत्रातले. तबला, तंबोरे, पेटी असे सगळे साहित्य त्यांच्याकडे असायचे. माडीवर कुणी नसले की आम्ही पेटीवर बोटे फिरवीत असू. तंबोर्याच्या तारांवरून बोटे फिरवली की झंकाराच्या नादाने अननुभूत आनंद होई. पेटीसारख्या वाद्यातून हवे तसे स्वर निघतात कसे याचे खूपच कुतूहल वाटे. ती वाद्ये वाजविणार्यांचं मोठं अप्रूप वाटे. आपल्यालाही ते यायला हवे असे वाटे. मुलांना गाण्यासारखी एखादी कला शिकवा, असे स्वप्ना दातार यांनी सांगितले आहे. कुतूहल असेल तर शिक्षण होतं. नवनवीन शोध लागतात. झाडावरून सफरचंद खालीच का पडलं याचं कुतूहल जागं झाल्यामुळे न्यूटनने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. इतिहाससंशोधन असो की आकाश निरीक्षण असो, त्याबद्दलच्या कुतूहलामुळे आपल्याला गोष्टीचं ज्ञान होतं. आपण कुतूहल शमविण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी अनेक खटपटी-लटपटी करून बघतो. आकाश, चंद्र, चांदण्या, सूर्य, तारे, नक्षत्रतारे हे सारे आपल्याला अप्राप्य असते. त्यामुळे आपल्याला त्यांचे कुतूहल वाटते. आपण त्यांचे निरीक्षण करून त्यांचे सौंदर्य, त्यांची स्थिती, इतर ग्रहतार्यांशी त्यांचे संबंध हे सारे पाहतो. सृष्टीची रहस्ये आपल्याला भूल घालतात. त्यांचे अप्रूप सतत वाढते असते. त्याचे रहस्य उलगडताना शास्त्रीय शोध लागतात. गरज आणि कुतूहल यांचे एकत्रीकरण होते. साहित्य, वक्तृत्व, चित्रकला, संगीत, नृत्य अशा कोणत्याही क्षेत्रात कुतूहल वाढविणार्या गोष्टी असतात. त्यामुळे आपली चेतनाशीलता वाढते. नावीन्य येते. कल्पनाशक्तीचा विकास होतो.
कार्यकारणभाव उलगडण्याची क्षमता आणि विचारशीलता वाढते. समूहभावना, सहकार्याची वृत्ती, निरीक्षणशक्ती, जिज्ञासा वाढून जीवनाला स्वयंपूर्ण दिशा मिळते. कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखा तोच-तोचपणा आला की कुतूहल संपते. अरेबियन नाईटमधल्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकताना अर्ध्यावर सोडल्या की कुतूहल वाढते. विक्रम-वेताळाच्या गोष्टीत प्रश्नाचे उत्तर राजा बरोबर देईल का? काय देईल? असे त्याचे कुतूहल मनात जागृत होते.
थोडक्यात काय, एखाद्या गोष्टीबद्दलचं अप्रूप वाटणं, कुतूहल वाटणं ही माणसाची जागृतावस्था आहे आणि त्याच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाची ती विकासावस्था आहे. नवनिर्मितीचा तो पाया आहे.