अपूर्वी- रवी कुमारला कांस्य

0
130

>> १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकार

इंडोनेशियात सुरू असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजांनी पदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर रायफल सांघिक प्रकारात भारताच्या अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने कांस्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत कोरिया, मंगोलिया यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांची कडवी झुंज मोडून काढत भारतीय जोडीने ४२९.९ गुणांचा वेध घेत कांस्यपदकाची कमाई केली. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये भारतीय जोडीने या स्पर्धेत आपला दुसरा क्रमांक राखून ठेवला होता. मात्र चीनच्या जोडीने धमाकेदार पुनरागमन करत भारतीय जोडीला तिसर्‍या स्थानावर ढकलले.

अखेरच्या क्षणांमध्ये चीनची झुंज मोडून काढण्यात भारतीय जोडी अपयशी ठरली. यंदाच्या स्पर्धेमधील भारताचे हे पहिले पदक ठरले आहे. भारतीय जोडीचा पात्रता फेरीतील गुण ८३५.३ होते तर कोरियाने ८३६.७ गुण मिळवत भारताच्या पुढचे स्थान पटकावले होते. तैवानच्या संघाने स्पर्धा विक्रमाची नोंद करताना ४९४.१ गुणासह सुवर्ण तर चीनने ४९२.५ गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. रवी कुमारसाठी वैयक्तिक स्वरुपात ही मोठी कामगिरी आहे. २८ वर्षीय रवी कुमारने २०१४ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते आणि २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये त्याने कांस्यपदकाची कमाई केली होती. अपूर्वी चंदेलाने २०१४ च्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्णलक्ष्य साधले होते.