हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसलएल) आज मंगळवारी फातोर्डाच्या पं. नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा आणि जमशेदपूर एफसी यांच्यात लढत होईल. गोव्याचे दोन खेळाडू निलंबित आहेत. आघाडीवरील संघांच्या आसपास राहण्यासाठी गोव्याला विजय अनिवार्य आहे.
गोवा आतापर्यंत अपराजित आहे. त्यांनी चार सामन्यांतून आठ गुण मिळविले आहेत. जिंकल्यास ते आघाडी घेऊ शकतील. प्रशिक्षक सजिर्र्ओ लॉबेरा यांना मात्र चिंता असेल, याचे कारण गोवा अद्याप सलग दोन सामने जिंकू शकलेला नाही. विजय-बरोबरी अशी त्यांची मालिका आहे. त्यामुळे स्पेनचे लॉबेरा यातून सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असतील.
गोव्याला मध्य फळीतील ह्युगो बौमास आणि विंगर सॅमीनलेन डुंगल यांची उणीव जाणवेल. महिन्याच्या प्रारंभी नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्धच्या लढतीत मारामारी केल्याबद्दल त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.
लॉबेरा यांनी सांगितले की, वैयक्तिक पातळीवर उत्तम खेळाडू असलेला भक्कम संघ आमच्याकडे आहे असे वाटते. हे दाखविण्याची एक संधी उद्या आम्हाला मिळालेली असेल. आमच्यासाठी हे अवघड असेल, पण एक प्रशिक्षक म्हणून मी परिस्थिती बदलण्यासाठी केवळ काम करू शकतो.
गोव्याची मदार मध्य क्षेत्रात अहमद जौहू, लेनी रॉड्रीग्ज यांच्यावर असेल, तर दोन्ही बाजूंनी प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात मुसंडी मारण्याची कामगिरी ब्रँडन फर्नांडिस आणि जॅकीचंद सिंग यांना पार पाडावी लागेल. एदू बेदिया दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यामुळे गोव्यासाठी ते चांगले ठरेल.
स्टार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने तीन गोल केले आहेत. ३६ वर्षांचा हा खेळाडू धडाका कायम राखण्याचीच चिन्हे आहेत.
लॉबेरा यांनी सांगितले की, जमशेदपूरचा संघ फार भक्कम असून त्यांच्याकडे चांगले बचावपटू आणि आक्रमक आहेत. आक्रमण आणि बचाव यांत त्यांनी चांगले संतुलन साधले आहे. त्यामुळे हा सामना आमच्यासाठी फार अवघड असेल.
जमशेदपूरचे प्रशिक्षक आंतोनिओ इरिओंदो यांच्यासमोर विजयी मार्गावर परतण्याचे लक्ष्य असेल. घरच्या मैदानावरील पहिल्या तीन सामन्यांत त्यांनी सात गुण मिळविले. त्यानंतर मागील लढतीत ते प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळले. त्यात त्यांना एटीकेविरुद्ध पराभूत व्हावे लागले. बाहेर खराब खेळ करणारा संघ असा शिक्का बसू नये यासाठी आपला संघ प्रयत्नशील राहील अशी आशा इरिओंदो यांना असेल. त्यासाठी त्यांना गोव्यात अनुकूल निकाल साध्य करावा लागेल. इरिओंदो म्हणाले की, माझ्या मते गोवा पहिल्या तीन संघांमध्ये आहे. त्यांना कसे हरवायचे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करीत नाही. कदाचित आम्हाला संघाचे स्वरुप आणि डावपेचांवर काम करावे लागेल. पण त्यांचा संघ नक्कीच भारी आहे. ते आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळे आमच्यासाठी ते नक्कीच खडतर प्रतिस्पर्धी ठरतील. मध्य फळीतील पिटीला मागील सामन्यात दुखापत झाली. तो वेळेत तंदुरुस्त होतो का हे पाहावे लागेल. स्ट्रायकर सर्जिओ कॅस्टेल यानेही तीन गोल केले आहेत. त्याने लीग दणाणून सोडली आहे. त्यामुळे गोव्याच्या कार्लोस पेना आणि मुर्तडा फॉल या बचाव फळीतील जोडीविरुद्ध तो कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.