- मीना समुद्र
पेंट करायला आलेल्या लोकांनी तिला खिडकीपासून ओढून-ओरबाडून पलीकडे कचऱ्यात फेकून दिले. तिचे विळखे घातलेले हात छाटून टाकले. हे करणे त्यांना अपरिहार्य होते, पण काळजात दुखले. ती सदाबहार वेल तिकडे उन्हात करपून कोळपून गेली.
दृष्ट लागावी अशी फुलली होती गोकर्णीची वेल. घराच्या एका खोलीच्या खिडकीखाली केव्हातरी टाकलेल्या बिया छान रुजून वर आल्या आणि पावसाच्या सरींचा हात धरून सरसर वाढत गेल्या. खिडकीच्या ग्रीलला तिने पकडले आणि वरच्या टोकापर्यंत गेली. मग मात्र आणखी वर जाण्यापेक्षा तिने वळून ग्रीललाच विळखे घालायला सुरुवात केली, आणि हळूहळू सबंध खिडकीच तिच्या हिरव्या मायेने व्यापली. किंचित लंबगोल असलेल्या अतिशय कोमल, पातळ असलेल्या पानांनी ती भरून गेली. एकेक पान हे छोट्या-छोट्या पानांचे बनलेले आणि थोड्याच दिवसांत गोकर्णीची किंचित जांभळट गर्द निळी फुलं इथं-तिथं डोळे उघडून मिटीमिटी पाहू लागली.
ही फुलं तशी सूर्यवंशीच. सकाळी उजाडल्यावर लवकर पाहावे तर गाढ झोपेत गुरगटून गेलेली. पण सूर्यकिरणांनी गुदगुल्या केल्या की हसत हसत डोळे उघडणारी. सूर्य वर आला की पूर्ण जागी होणारी. आणि त्या चमकत्या उन्हाच्या आनंदाने सताड डोळे उघडून बघणारी आणि मग दिवसभर टक्क डोळे उघडेच ठेवून बसणारी. निळ्या रंगाच्या मध्यभागी सुंदर पांढराशुभ्र रंग आणि पाकळ्यांवर थोड्या चुण्या. गाईच्या कानासारखा आकार. त्यामुळे तिला सार्थ नाव पडले- गोकर्णी.
पानांच्या हिरव्यागर्द पसाऱ्यात ती निळी, किंचित जांभळट छटा मिसळल्यासारखी आणि त्यामुळे आणखीनच सुंदर दिसणारी ती फुलं मोरपिसासारखी वाटतात. इथे-तिथे हिरवाईवर फुललेल्या त्या फुलांमुळे उघडलेल्या मोरपिसाऱ्यानं माझी खिडकी आच्छादून गेली. उजेड जरा मंद झाला तरी तिला तिथून हुसकायची किंवा दुसरी वाट दाखवायची हिंमत मला तरी झाली नाही. शिवाय उजेडासाठी दुसरी खिडकी होतीच. शिवाय इतर झाडांना फुलं नसली की गोकर्णी ओंजळभरून फुलं द्यायची. गणेशाला, शिवशंभूला प्रिय असणारी ही फुलं सर्व देवांना आणि देव्हाऱ्याला सुशोभित करायची. त्यांच्याविषयी आणखी एक गुपित कळले होते की, ही फुलं साधारण 8-10 घेऊन- देठ काढून- रात्री ग्लासभर पाण्यात भिजत घालायची आणि सकाळी गाळून किंवा पाकळ्या उकळून ते पाणी थंड करून प्यायचे. सर्दी-खोकला, तसेच आणखी काही विकारांवर किंवा ते होऊ नयेत म्हणूनही हा काढा किंवा चहा किंवा लिंबू पिळून त्याचे केलेले सरबत अतिशय गुणकारी असते. फुलांचा रंग ग्लासमधल्या पाण्यात उतरला की पाणी अशी नीलकांती धारण करते की बस! नीलमणी वितळला आहे की काय असे वाटावे असे ते पाणी. थोडावेळ आपण पाहत राहतो त्याच्याकडे. नीलनभाचे आणि विष्णू, राम-कृष्णाच्या नीलवर्णाचे आकर्षण आपल्या मनाला असतेच ना! अशा या पाण्यात लिंबू पिळल्याने त्याला किंचित जांभळट छटेचा गुलाबी रंग येतो. तोही रंग मनमोहनच!
या वेलीला वा फुलांना ‘अपराजिता’ असे नाव आहे ते तिच्या आरोग्यदायक गुणांमुळेच असावे. अनेक रोगांना, अरिष्टांना दूर करणारी ही अपराजिता. शिवाय निळ्या रंगाच्या फुलांना विष्णुकांता, कृष्णकांता अशी नावेही आढळतात. पांढरी गोकर्णही अतिशय सुंदर दिसते. पण निळा रंग जास्त आकर्षित करतो. माझ्याकडच्या गोकर्णीचा तो मोरपिसारा लगतच्या पायवाटेवरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना आकर्षित करायचा. कुणी फुले तोडली तरी वेलीची ना नासायची, ना आमची! एका मार्च-एप्रिलमध्ये दुपारचा चहा हा त्या फुलांचा होता. नंतर भार कमी झाला तरी वर्षभर 5-6 फुले मिळत राहायची. त्यावरून ही सदाफुलीसारखी सदाबहार असावी असे वाटते. माझ्या त्या गोकर्णीला पाहून कविताही सुचली होती-
अंगोपांगी बहर फुलांचा हरित तजेला पानोपानी
मिठी घालते मायेच्या त्या पोपटरंगी करांनी
निळ्याजांभळ्या कर्णफुलांनी सजून बसली ही गोकर्णी
वाट पाहते काय कुणाची अधीरता ही दिसते नयनी
मूठ निळीची तिची उघडते बनते ओंजळ मित्र पाहुनी
उरात दाटे सोन आर्तता तशी शुभ्रता अर्घ्य वाहुनी
तंद्रीमध्ये विणीत बसली कोणासाठी रेशिमशेला
हलके हलके वाहे वारा त्या वेलीला रिझवायाला
सरसर येते सर ती जेव्हा नभांगणातुनी धरणीवरती
झिम्माफुगडी खेळायाला पोर परकरी आतुर का ती
वेल लाजरी जरा बावरी हिरवा हिरवा साज लेवुनी
नवरी नटली बुट्ट्यांचा हा नेसून शालू गर्भरेशमी
गोकर्णीच्या अशा त्या गर्भरेशमीपणावर आणि गर्भश्रीमंतीवर सारेच लुब्ध. पण खरोखरच तिला एकदा दुष्ट लागली. सोसायटीला बाहेरून पेंट करायला आलेल्या लोकांनी तिला खिडकीपासून ओढून-ओरबाडून काढून पलीकडे कचऱ्यात फेकून दिले. तिचे विळखे घातलेले हात छाटून टाकले. हे करणे त्यांना अपरिहार्य होते, पण काळजात दुखले. ती सदाबहार वेल तिकडे उन्हात करपून कोळपून गेली. खिडकी मोकळी झाल्यावर आलेला उजेडही असह्य झाला इतकी तिच्या छायेमायेची सवय झाली होती. तिच्या असंख्य शेंगा वाळवून ठेवल्या होत्या. त्या रुजत घालायचे ठरवले पाऊस आल्यावर.
आणि अचानक रंगकाम संपल्यानंतर परवा लक्ष गेले तर खिडकीखालच्या दगडधोंडा-मातीत तिचं मूळ तग धरून होतं. उरल्यासुरल्या पानांनी ती वार्ता सांगितल्यावर मन हर्षभरित झाले. तिथे रोज शिंपण चालू केले आणि ‘मी आहे’ म्हणत ती वीतभर, फूटभर करत आता पावसाच्या संजीवनीमुळे खिडकीपर्यंत आणि चार दिवसांत वरपर्यंत पोचली आहे. फुलांचे निळे बुंदके पानातून दिसले तेव्हा मनात आले- अपराजिताच ही खरी!