तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील; गोवा शिपयार्डची निर्मिती
भारतीय तटरक्षक दलासाठी बांधण्यात आलेल्या अपतटीय गस्ती नौकेचे काल वास्को येथे एका शानदार सोहळ्यात जलावतरण करण्यात आले. गोवा शिपयार्डात तटरक्षक दलासाठी अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान वापरून एकूण सहा गस्तीनौका बांधण्यात येत असून पैकी एका नौकेचे जलावतरण नोव्हेंबर महिन्यात केल्यानंतर काल गुढी पाडव्याचे औचित्य साधून दुसरी गस्तीनौका तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील झाली. याप्रसंगी या नौकेचे भारतीय ‘शूर’ असे नामकरण करण्यात आले आहे.भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक राजेंद्र सिंग व त्यांच्या पत्नी सौ. उर्मिला सिंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गस्तीनौकेचे जलावतरण करण्यात आले. यावेळी गोवा शिपयार्डचे व्यावस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष रिअर ऍडमिरल (निवृत्त) शेखर मित्तल उपस्थित होते.
तटरक्षक दलाला बांधून दिल्या जाणार्या सहा नौकांपैकी ही १०५ मीटर लांबीची नव्या पिढीतील नौका आहे. तटरक्षक दलाच्या गस्तीच्या गरजा समोर ठेवून या नौकेची बांधणी करण्यात आली आहे. खराब हवामानातही ही नौका कार्यक्षमता टिकवून ठेवू शकेल. शोधकार्य तसेच आपत्कालीन प्रसंगी बचाव करणे ही कामे या जहाजावरून हाताळण्यात येणार आहेत. समुद्र निरीक्षणाबरोबर समुद्र पट्ट्यातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच हॅलीपॅडचीही व्यवस्था सदर जहाजावर करण्यात आली आहे अशी माहिती गोवा शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक रिअर ऍडमिरल (निवृत्त) शेखर मित्तल यांनी दिली. ९ मे २०१२ रोजी तटरक्षक दलासोबत अशा प्रकारच्या सहा नौकांचा करार करण्यात आला होता. त्यापैकी ही दुसरी नौका आहे. तर, २०१७ पर्यंत सर्व सहा नौका तटरक्षक दलाकडे सोपवण्यात येतील, असेही मित्तल म्हणाले. याप्रसंगी बोलताना अतिरिक्त महासंचालक राजेंद्र सिंग यांनी गोवा शिपयार्डच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. भारतीय तटरक्षक दल आणि गोवा शिपयार्ड यांच्यात १९९० सालापासून चांगले संबंध असून आतापर्यंत तटरक्षक दलासाठी शिपयार्डने २१ जहाजे बांधल्याचे श्री. सिंग म्हणाले. गोवा शिपयार्डच्या एकंदरीत कामकाजावर खूष होऊन गोवा शिपयार्डला तटरक्षक दलाने आणखी पाच नवीन जहाजे बांधण्याचे कंत्राट देण्याचे निश्चित केले असून त्याची कार्यवाही लवकरच केली जाईल अशीही घोषणा श्री. सिंग यांनी केली. सुरुवातीला गोवा शिपयार्डचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रिअर ऍडमिरल शेखर मित्तल यांनी स्वागतपर भाषणात गोवा शिपयार्डला केंद्र सरकारकडून ३२ हजार कोटींची कामे मिळाली आहेत. त्याअंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून १२ भू-सुरुंगविरोधी नौका बांधणी करण्यात येणार आहेत. तसेच गोवा शिपयार्डच्या विस्तार कामासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च साधन सुविधांवर करण्यात आला असून आणखी ७०० कोटी रुपये खर्च केले जाईल, असेही श्री. मित्तल म्हणाले.