>> दुचाकी अपघातात आसाममधील दोघांचा मृत्यू
>> एप्रिल महिन्यांत आतापर्यंत 17 बळी
राज्यातील रस्ता अपघातात वाहनचालकांचे बळी जाण्याचे सत्र सध्या सुरूच आहे. काल रविवारी दि. 14 एप्रिल रोजी संध्याकाळी 4.30 च्या सुमारास बांबोळी येथे झालेल्या एका दुचाकी अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पप्पू गोगाई (27) व अच्युत गोगाई (19) अशी या अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही आसाम राज्यातील असल्याची माहिती आगशी पोलिसांनी यावेळी दिली. या प्रकरणी आगशी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत सुरक्षा रक्षकाची सेवा संपल्यानंतर दुचाकीचालक अच्युत गोगोई (19) आणि दुचाकीवर मागे बसलेला पप्पू गोगोई (27) हे पणजीला येत होते. ते काल वेर्णा येथून पणजीकडे येण्यास निघाले होते. बांबोळी येथील होली क्रॉस चर्चजवळ शिरदोण चढतीवर पोहोचल्यानंतर ज्या ठिकाणी उड्डाणपूल संपतो त्या ठिकाणी ते पोहोचले असता चालक अच्युत याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व मोटारसायकल रस्त्यावरील विभाजकाला जाऊन आदळली. यावेळी हे दोघे मोटारसायकलवरून उसळून रस्त्यावर पडल्यानेे या दोघांना जबर मार लागला व त्यात त्यांचा मृत्यू झाला.
आगशी पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल कुट्टीकर यांनी घटनास्थळी धाव घऊन अपघाताचा पंचनामा केला. उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांनी तपास सुरू केला आहे.
अपघातांचे सत्र
यंदा 2024 या वर्षी अगदी पहिल्या दिवसापासून अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. सरकार आपल्या परीने हे अपघात रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे मात्र तरीही ही अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही असेच दिसून येत आहे. सरकार अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. पण त्याला अद्यापपर्यंत तरी यश आलेले दिसून येत नाही.
एक एप्रिल रोजी पणजीत झालेल्या या महिन्यातील पहिल्या अपघातानंतर काल रविवार दि. 14 एप्रिलपर्यंत अपघातांचे सत्र सातत्याने सुरू आहे. कोलवा, धर्मापूर, मुळगाव, नेसाय, वेळ्ळी, पैरा-शिरगाव, माशे, मोले, नागवा, शिरसई, उसगाव, कान्सा-थिवी आणि काल बांबोळी येथे विविध अपघात झाले असून या अपघातांत 17 जणांचे बळी गेले आहेत.
15 भीषण अपघात; 17 मृत्यू
राज्यातील अपघातांचे सत्र अजून काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यात 1 ते 14 एप्रिल या काळात झालेल्या विविध अपघातातील 15 भीषण अपघातांत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.