>> देविदास कोनाडकर मृत्यू प्रकरणी दोघांना अटक
>> जीवे मारण्याच्या हेतूनेच टेम्पोची दुचाकीला धडक
दाडाचीवाडी-धारगळ येथे रविवारी रात्री टेम्पोच्या धडकेत दुचाकीचालक देविदास कोनाडकर यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पहिल्यापासून स्थानिक आणि टॅक्सी व्यावसायिकांनी व्यक्त केला होता. हा संशय अखेर खरा ठरला. या प्रकरणी मोहित कुमार (19) आणि अभिषेक कुमार (20, दोघेही रा. बुलंद शहर, उत्तर प्रदेश) या दोघांना पेडणे पोलिसांनी अटक केली. तसेच या घातपातासाठी वापरलेला टेम्पो जप्त केला. धोकादायक स्थितीत टेम्पो उभ्या केल्याच्या विषयावरून संशयित आणि कोनाडकर यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर हा खुनाचा प्रकार घडला.
सविस्तर माहितीनुसार, दाडाचीवाडी-धारगळ येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास एका टेम्पोने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यामुळे देविदास ऊर्फ देऊ चंद्रकांत कोनाडकर यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर टेम्पोचालकाने पलायन केले होते. देविदास कोनाडकर यांचा एक कान कापून टाकल्याचे अपघातस्थळी दिसून आले होते. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच त्यांचे सहकारी मित्र आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला होता.
या संशयावरून पेडणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला पेडणे पोलिसांनी स्थानिक लोकांच्या सहाय्याने टेम्पोचा शोध घेतला. त्यात क्र. जीए-03-एन-3662 या क्रमांकाचा टेम्पो या घातपातात वापरल्याचे समोर आले आणि त्यांनी संशयितांचा माग काढला. संशयित राहत्या पत्त्यावर आढळून आल्याने संशय बळावला. यावेळी पोलिसांनी त्याच परिसरात झाडाझुडुपांत शोधाशोध केली. त्यावेळी तेथे मोहित कुमार व अभिषेक कुमार हे संशयित सापडले.
पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर, निरीक्षक सचिन लोकरे, नवनीत गोलतेकर, आशिष पोरोब, प्रवीण शिमेपुरस्कर यांनी तपासकामात मोलाची भूमिका बजावली.
टेम्पोचालकाने का दिली धडक?
12 मे रोजी रात्रीच्या सुमारास संशयितांनी आपला टेम्पो वळणावर धोकादायक स्थितीत उभा केला होता आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. याबाबत देविदास कोनाडकर यांनी त्यांना त्याचा जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. यानंतर देविदास कोनाडकर हे दुचाकीवरून पुढे निघून घेतले. त्यानंतर संशयितांनी टेम्पोनेच त्यांचा पाठलाग केला. दाडाचीवाडी-धारगळ येथे पोहोचताच कोनाडकर यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने संशयितांनी दुचाकीला टेम्पोची धडक दिली आणि त्यांना काही अंतर पुढे फरफटत नेले. अपघातानंतर कोनाडकर यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.