>> नानोड्यात कदंब बस व कारची धडक; दोघेजण गंभीर जखमी
नानोडा-डिचोली येथील हमरस्त्यावर कदंब बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात सासरा आणि सून अशा दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात काल सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. दोन्ही वाहनांतील धडकेनंतर कारमधील महादेव सावळाराम राऊत (66, रा. वरचावाडा-साळ) आणि व सौ. सोनाली दीपक राऊत (32, रा. वरचावाडा-साळ) हे दोघे ठार झाले. या अपघातात जखमी झालेल्या दोघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
नानोडा-अस्नोडा हमरस्त्यावर पूजा गेस्ट हाऊसजवळ हा अपघात झाला. जीए-03-सी-8447 क्रमांकाची कार साळ-कासारपालहून म्हापसाच्या दिशेने जात असताना जीए-03-एक्स- 0244 या कदंब बसला तिची समोरासमोर धडक झाली. त्या कारमधील चौघांना गंभीर दुखापत झाली. दोघांना तातडीने 108 रुग्णवाहिकेतून इस्पितळात नेले, तर दोघे कारमध्येच अडकून पडले. त्यांना डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्वजण करासवाडा-म्हापसा येथे जाण्यासाठी निघाले होते; मात्र दुर्दैवी अपघातात होत्याचे नव्हते झाले. अपघातातील जखमींना सुरुवातीला डिचोली आरोग्य केंद्रात उपचारासाठी केले, तेथून नंतर म्हापसा जिल्हा इस्पितळ आणि त्यानंतर गोमेकॉत दाखल करण्यात आले; मात्र जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला.
या अपघातात शुभदा नारायण रेडकर (65, रा. बांदा-सिंधुदुर्ग) आणि आशिष अनंत परब (42, रा. साळ) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातामुळे साळ गावावर शोककळा पसरली आहे. महादेव राऊत आणि सोनाली राऊत यांचे मृतदेह बांबोळी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दोडामार्ग-गोवा पोलीस आऊटपोस्टचे हवालदार कृष्णा नाईक यांनी अपघाताचा पंचनामा केला. डिचोलीचे पोलीस निरीक्षक सुरज गावस व या प्रकरणी तपास करीत आहेत.