अपघातांबाबत साबांखाचे मुख्य अभियंते गंभीर नाहीत : गुदिन्हो

0
6

सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते हे रस्ता अपघातांबाबत गंभीर नाहीत, असा सनसनाटी आरोप काल वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केला.
रस्त्यावर अपघात होऊ नयेत यासाठी वाहतूक खाते प्रयत्न करीत आहे. काही दिवसांपूर्वी खात्याने रस्ते सुरक्षा समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर हे हजर नव्हते, त्यावरुन ते राज्यात होत असलेल्या रस्ता अपघातांबद्दल गंभीर नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे गुदिन्हो यांनी नमूद केले. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना गुदिन्हो यांनी वरील आरोप केला.

राज्यातील रस्त्यांच्या खराब स्थितीबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना प्रश्न करायला हवेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होणे हे अक्षम्य असल्याचे गुदिन्हो म्हणाले. रस्त्यांवरील खड्ड्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंतेच जबाबदार आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसाठी पावसाला दोष देणे हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

यापुढे रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, तशी सूचना आपण सचिवांना केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.