विशेष मुलाखत
– कालिका बापट
गोव्यात यायला मला फार आवडते. इथे कामाच्या निमित्ताने तर येतेच. गोव्यातील चाहत्यांच्या प्रेमासाठीच येथे येण्याची संधी सोडत नाही. परवा इथल्या कट्ट्यावर मुलाखतीचा कार्यक्रम झाला. प्रेक्षकांची गर्दी आणि त्यांचे माझ्यावरचे अफाट प्रेम पाहून मी खरोखर भारावून गेले.
भारत लोकशाही प्रधान देश असला तरी प्रत्येक माणसाने नियमांच्याच आधारे जगले पाहिजे हे विसरून चालणार नाही. नियमबाह्य गोष्टी घडल्या तर अडथळे येणे हे स्वाभाविक आहे. हल्ली अन्यायाला सुध्दा मनोरंजन बनवून ते लोकांपुढे वेगळ्या पध्दतीने सादर केले जाते, ते होऊ नये, असे मत सुप्रसिध्द सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी विशेष मुलाखतीत व्यक्त केले.
सोनाली कुलकर्णी इफ्फीच्या निमित्ताने सध्या गोव्यात आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा त्यांचा चित्रपट यंदा इंडियन पॅनोरमा विभागात निवडण्यात आला आहे. त्यानिमित्त त्या गोव्यात आहेत. त्यांच्याशी केलेल्या संवादात आपल्या अभिनयाचा प्रवास उलगडतानाच त्यांनी सध्या चालत असलेल्या विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली.
कच्चा लिंबूतील विशेष मुलाची आई साकारताना काय अनुभव आला?
खरोखर अभिनय म्हणून यातील आईची भूमिका साकारताना जेवढा आनंद मला झाला, त्याहीपेक्षा ती सकारताना खूप त्रास झाला. यातील शैलजा काटदरे या आईने स्त्रीत्वाचे पैलू मांडले आहे. विशेष मुलाची आई साकारताना बाईचे बाईपण साकारले आहे. यात मुलांची भूमिका केलेल्या मनमीत पेम हा चित्रिकरणाच्या दरम्यान केवळ सोळा वर्षांचा होता. आपला अभिनय साकारताना त्याला दडपण असायचे. तरीही भूमिकेतल्या आई बरोबरच खर्या अर्थाने आई व्हावे लागले. आई मुलाच्या नात्यासंबधी, स्त्रीत्वाविषयी भाष्य करणारी, कुटुंबासाठी, आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी करणारी, त्यासाठी नोकरी करणारी, चाळीत राहाणारी अशी शैलजा काटदरेची ही अंत:र्मुख करणारी भूमिका आहे. प्रसाद ओक यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांनी मला या भूमिकेसाठी निवडले. त्याचा मान राखून ही भूमिका आपण केली आहे. यातील सर्वच कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे.
इफ्फीत कच्चा लिंबूची निवड झाली याबद्दल काय वाटतं?
आनंद तर आहेच. शिवाय अशा महोत्सवांमधून अधिक काम करण्याचे प्रोत्साहन लाभते. प्रसाद ओकने मोठ्या मेहनतीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. योग्य कलाकारांची निवड. सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकांनाही योग्य न्याय दिला आहे. मुळात म्हणजे संवेदनशील असा हा विषय आहे. प्रत्येकाने पाहावा असा हा चित्रपट आहे. हा केवळ चित्रपट नसून, आईचे, स्त्रीत्वाचे जगणे यात मांडण्यात आले आहे. इफ्फी सारख्या महोत्सवांबद्दल मला फार अभिमान आहे. इफ्फीत तर मी येतेच. अशा महोत्सवांतून कलाकारांनाही अधिक काम करण्याची उर्जा मिळते. चित्रपटप्रेमींबरोबरच देश विदेशातून आलेल्या कलाकारांकडून कामाचे कौतुक केले जाते. पुढे जाऊन अधिक चांगल्या भूमिका मिळतात. इफ्फीसारखे महोत्सव खर्या अर्थाने कलाकारांना पोषक असून ते कलाकारांना घडवतात.
नाटक, सिनेमा बरोबरच कुटुंबाची जबाबदारी कशी पेलता?
माझी मुलगी फारच लहान आहे. नुकतीच सहा वर्षांची झालीय. घरातले सारेच सासू, नवरा यांचे सहकार्य फार महत्त्वाचे वाटते. तरीही सून, बायको, आई या कुटुंबातील माझ्या भूमिका मी त्यांच्या सहकार्यामुळेच चांगल्या पध्दतीने पेलू शकते. माझी सासू अत्यंत मनमिळावू आहे, समजून घेणारी आहे. आमच्या दोघीत मैत्रीचे नाते असल्याने कौटुंबिक स्तरावरही अत्यंत भाग्यवान आहे. त्याशिवाय आज मी जिथे आहे, माझी अशी ही वेगळी टीम आहे, जिथे माझ्या कुटुंबाबरोबरच माझे मॅनेजर, हेअर स्टायलीस्ट, ड्रायव्हर यांचाही माझ्या यशात वाटा आहे, असे मी मानते. या सर्वांच्या सहकार्यामुळेच माझ्या कामाबरोबरच माझे कुटुंबही चांगल्या पध्दतीने चालवू शकते.
पदार्पणातच गिरीश कर्नाड यांच्यासारख्या दिग्दर्शकाबरोबर ‘चेलूवी’ या कन्नड चित्रपटात काम केल्यानंतर, आत्तापर्यंतचा प्रवास कसा झाला?
आपण जर आपल्या कामाप्रती प्रामाणिक असेल तर मग प्रवास हा सुखकरच होतो. माझ्या बाबतीतही तेच झाले. ‘चेलूवी’ नंतर चांगल्या दिग्दर्शकांबरोबर कामे करायला मिळाली. मुख्य म्हणजे हिंदी, मराठी यापुरते माझे चित्रपट सिमीत न राहता, इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटात काम करण्याची संधी लाभली. इटालीयन भाषेतही मी काम केलेय. चांगल्या कलाकारांबरोबर, चांगल्या दिग्दर्शकांबरोबर कामे मिळत गेली. आपण एकदा चांगले काम करतो, प्रामाणिकपणे कामाशी संलग्न राहतो, तेव्हा सगळे सुरळीत चालते, असा माझा तरी अनुभव आहे. आपल्या कामात इगोला जरा बाजूला ठेवावे लागते. इगो जिथे आड आला, तिथे अडथळा आलाच, अशा मताची मी आहे. माझ्या या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीनंतर आता कुठे मला काम करण्याची मजा वाटू लागली आहे. नवनवीन भूमिका करताना फार छान वाटतं. आणि नवीन भूमिकांमधील आव्हाने पेलायला आता मी तयार आहे. आपण विविध भाषांमधील चित्रपट केले आहेत, त्यामुळेच माझ्या या व्यवसायांमधील आव्हाने मी यशस्वीपणे पेलू शकते. आणि काम करतानाही मजा येते.
-अभिनय क्षेत्रात काम करायला येणारी नवीन मुले आपल्या बरोबर काम करण्यासाठी उत्सुक असतात. आपण तर या प्रवासात हिंदी, मराठीत अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. अजून कुणाबरोबर काम करण्याची इच्छा आहे का ?
हो. इच्छा तर आहेच. मला जोया अख्तर, अनुराग कश्यप, अश्विनी अय्यर यांच्यासारख्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची इच्छा आहे.
आगामी चित्रपट कुठले आहेत काय?
हो. सचिन कुंडलकर यांचा गुलाबजाम, ऋषीकेश गुप्ते यांचा दिल, दिमाग और बत्ती, नसिरूद्दीन शाह बरोबरचा सुदीप बन्डोपाध्याय यांचा होप और हम आदी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.