नागरिकांचा इशारा
रस्ता दुरूस्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
पणजी स्मार्ट सिटीसाठी खोदलेल्या रस्त्यांची 30 सप्टेंबरपूर्वी दुरुस्ती करावी अन्यथा 30 सप्टेंबर रोजी रायबंदरचा मुख्य रस्ता अडवण्याचा इशारा काल रायबंदर येथील नागरिकांनी सरकारला दिला. स्मार्ट सिटीसाठी खोदलेल्या रस्त्यांची विनाविलंब दुरुस्ती केली जावी अशी वेळोवेळी रायबंदरवासीयांनी मागणी केलेली असताना त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ काल रायबंदरवासीय रस्त्यावर आले होते. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रायबंदरचे नगरसेवक सिल्वेस्टर फर्नांडिस व सेंड्रा मारिया डिकुन्हा उपस्थित होती.
स्मार्ट सिटीच्या कामामुळे रायबंदर येथे प्रचंड धूळ प्रदूषण होत असून रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिकाही सुरू झाली आहे. सरकारने या रस्त्यांवर जीवघेणे अपघात होण्याची वाट पाहू नये, असा इशारा देत सरकारने मागणी मान्य न केल्यास आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे रायबंदरवासीयानी म्हटले आहे.
रायबंदर येथे स्मार्ट सिटीचे काम हाती घेतल्यानंतर येथील गटारे तुंबून पावसाळ्यात रायबंदर येथील रस्ते पाण्याखाली जाऊ लागले असल्याचे रायबंदर येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
पणजी स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली रायबंदर येथील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असतानाच येथील लोकांना धूळ प्रदूषणाचाही फटका बसत आहे. पुढील दोन आठवड्यांत रस्ते दुरुस्ती करा अन्यथा 30 सप्टेंबर रोजी रायबंदरचा मुख्य रस्ता अडवू असा इशारा रायबंदरमधील नागरिकांनी दिला आहे. नागरिकांनी केलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीच्या मागणीकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने रायबंदरमधील नागरिक काल याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
रायबंदरमधील पोर्तुगीजकालीन गटारांची दैना झाली आहे. इतकी वर्षे पावसाळ्यातसुद्धा पाण्याचा विसर्ग व्हायचा. मात्र, स्मार्ट सिटीची कामे झाल्यापासून रायबंदर बुडू लागले असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
येथील खराब रस्त्यांबात कल्पना दिली की त्यानंतर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली जाते. रायबंदर येथे फूटपाथ व अन्य कामे हाती घेतली असली तरी तीही व्यवस्थित केलेली नाहीत. त्यामुळे नागरिक रस्त्यावर इतरले असल्याचे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या नगरसेवक सेंड्रा कुन्हा यांनी सांगितले.
कुडचड्यात काँग्रेसचे आंदोलन
कुडचडे येथेही रस्त्यावरील खड्ड्यांबाबत काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांत त माती टाकून व शेणाने सारवून भाजप सरकारचा निषेध केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व इतर पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या खराब स्थितीबद्दल सरकारला दोष दिला.