…अन्यथा रात्रीची संचारबंदी

0
12

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा

>> कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नाताळ सण व नववर्षाची धूम यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असून लोकांनी कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. अन्यथा गोवा सरकारवर रात्रीची संचारबंदी लागू करण्याची पाळी येऊ शकते, असा इशारा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

नाताळ सणामुळे सगळीकडे धामधूम असून परिणामी ठिकठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केली. या गर्दीमुळे राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू शकतो, असे सांगून स्थानिक लोक तसेच पर्यटकांनी काळजी घ्यायला हवी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्यात ऑमिक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही, ही गोष्ट खरी असली तरी त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घ्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
काही राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारांनी ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास आमच्यावरही ती पाळी येऊ शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात पर्यटन उद्योगाने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी सामाजिक सुरक्षा, मास्क लावणे व सॅनिटायझेशन या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावी, अशी सूचना केली. दाबोळी विमानतळावर येणार्‍या विदेशी पर्यटकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

लंडन येथून आलेल्या पाच
प्रवाशांना कोरोनाची बाधा

लंडन येथून काल सकाळी गोव्यात आलेल्या आणखी पाच प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या पाचही प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. या पाच प्रवाशांपैकी चार जणांना मडगाव येथील टी. बी. इस्पितळात विलगीकरणत ठेवण्यात आले आहे. कासावली येथील प्राथमिक आरग्य केंद्रात जागा नसल्याने कोविड रुग्णांना टीबी इस्पितळात हलवण्यात येत आहे.

चोवीस तासांत ६७ बाधित
राज्यात काल शुक्रवारी कोरोनाचे ६७ रुग्ण सापडले आहेत. मात्र चोवीस तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. त्यामुळे राज्यातील बळींची संख्या ३५१८ एवढी असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ४५३ झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत ४३ रुग्ण बरे झाले आहेत. काल दिवसभरात १९०२ एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६७ पॉझिटिव्ह आढळून आल आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट वाढून ३.५२ टक्के एवढा झाला असल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७९ टक्के एवढे खाली आले आहे. काल शुक्रवारी कोरोनाची लक्षणे जाणवल्याने एका रुग्णाला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तसेच कोरोनामुक्त झाल्यामुळे दोघांना इस्पितळातून घरी पाठवण्यात आले. काल कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ६६ जणांनी घरी विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.

राज्यात सर्वात जास्त रुग्ण पणजी येथे असून तिथे आता रुग्णसंख्या ६० झाली आहे. तर मडगावात सध्या ५१, कासावलीत ३० रुग्णसंख्या आहे.

पर्यटन विभागाकडून सोमवारी नवी नियमावली
नाताळनिमित्त तसेच नवर्वानिमित्त २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत गोव्यात मोठ्या प्रमाणातपर्यटक दाखल होतात. मात्र पर्यटक किंवा गोव्यातील नागरिकांनी सेलिब्रेशन करताना कोव्हिडचे नियम पालन करणे गरजेचे आहे असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गोव्यात आतापर्यंत २८ व्यक्तींची ओमिक्रॉन संदर्भात तपासणी केली. यातील ८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र यातील काही व्यक्ती डेल्टा व्हेरियंट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गोव्यात पर्यटन विभागाकडून सोमवारी नियमावली जारी करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. मात्र सध्यातरी गोव्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार नाही असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी सरकारला या संचारबंदीचा निर्णय घेण्यास पाडू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले असून जे नागरिक मास्क लावणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

गोमेकॉत पुढील महिन्यात
जिनोम सिक्वेन्सिंग मशीन

गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पुढील महिन्याभरात जिनोम सिक्वेन्सिंग मशीन बसण्यात येईल. जेणेकरून परदेशातून येणार्‍या पर्यटकांची चाचणी लवकर करण्यात येईल. अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. या संबंधीचा निर्णय यासंदर्भात झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सध्या या चाचण्या पुण्यात केल्या जातात. त्यामुळे अहवालासाठी २० ते २५ दिवस वाट पहावी लागते.