>> स्वाती केरकर यांचा इशारा; आगामी विधानसभा अधिवेशनापर्यंत मागण्यांची पूर्तता करा
राज्य सरकारने बालरथ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जुलै महिन्यात दिले होते; मात्र त्यातील एकाही मागणीची अद्याप पूर्तता झालेली नाही. येत्या विधानसभा अधिवेशनापर्यंत त्या मागण्यांची पूर्तता न केल्यास बालरथ कर्मचारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा बालरथ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष स्वाती केरकर यांनी आझाद मैदानावर पत्रकारांशी बोलताना काल दिला.
बालरथ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काल आझाद मैदानावर निदर्शने केली. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावेळी गेल्या जुलै महिन्यात बालरथ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. बालरथ कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणे, त्यांचा पगार शैक्षणिक संस्थांच्या मार्फत न देता थेट बँकेत जमा करणे, कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत अधिकृत आदेश काढणे अशा मागण्या आम्ही केल्या होत्या; मात्र आश्वासन देऊनही मागण्यांची पूर्तता झालेली नाही. कर्मचाऱ्यांना अजूनही पूर्वीचाच पगार आणि तो देखील उशिराने दिला जात आहे, असा आरोप स्वाती केरकर यांनी केला.
राज्य सरकारने बालरथ चालकांना महिना 17 हजार रुपये आणि मदतनिसाला 10 हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, इतर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने बालरथ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष द्यावे; अन्यथा बालरथ कर्मचाऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागणार आहे. मडगाव येथील एका शिक्षण संस्थेने गेली कित्येक वर्षे सेवा देणाऱ्या बालरथ चालकांना सेवेतून कमी केले आहे, याकडेही सरकारने लक्ष द्यावे, असेही स्वाती केरकर यांनी सांगितले.