…अन्यथा खासगी इस्पितळांवर कडक कारवाई

0
13

>> अत्यवस्थ अवस्थेत रुग्णांना गोमेकॉत पाठवणारे रडारवर

>> आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा इशारा

रुग्णांची प्रकृती खालावलेल्या परिस्थितीत जी खासगी रुग्णालये रुग्णांना गोमेकॉकडे पाठवतात अशा खासगी इस्पितळांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी खोतोडा सत्तरी येथे आयोजित महा वैद्यकीय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना दिला.

गोव्यातील काही खासगी रुग्णालये त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर शेवटच्या टप्प्यापर्यंत उपचार करतात आणि नंतर त्यांना गोमेकॉमध्ये पाठवले जाते. परिणामी रुग्ण औषधोपचारांना आवश्यक तसा प्रतिसाद देत नाहीत. रुग्णांची प्रकृती खालावलेल्या परिस्थितीत जी खासगी रुग्णालये रुग्णांना गोमेकॉकडे पाठवतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले. तसेच आवश्यकता भासल्यास अशा रुग्णालयांचे परवानेदेखील निलंबित केले जातील असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी व्यासपीठावर वाळपई सरकारी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास नाईक, डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. वैभव गाडगीळ, अकीब शेख, संयोजक विनोद शिंदे, आरोग्य संचालीका डॉ. गीता काकोडकर, डॉ. गीता देशमुख, डॉ. आदित्य, केदार रायकर, प्रशांत सूर्यवंशी, खोतोडा सरपंच नामदेव राणे, नंदिनी म्हाळशेकर, सलोनी गावकर, तसेच इतर पंच, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजेश्री काळे, श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी देसाई तसेच इतरांची उपस्थिती होती.

केंद्राच्या माध्यमातून राज्यात नर्सिंग कॉलेजसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठीही प्रयत्न केले जातील. सामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा पुरविल्या जातील. सत्तरीच्या ग्रामीण भागात विविध भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांपासून आरोग्य शिबिरे सुरू आहेत. तेथील लोकांना आरोग्य सेवा, सुविधा मिळायला हव्यात. जनतेच्या भल्यासाठी आपण आणि आपले सरकार सदैव कार्यरत आहे. ग्रामीण लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी काम करीत आहे. आरएमडी केंद्रात ही रुग्णवाहिका ठेवलेल्या आहेत. केंद्राच्या सहकार्याने गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले जातील. गोव्यात कोरोनाचा संसग वाढू नये यासाठी नागिरकांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी आरोग्यमंत्री श्री. राणे यांनी केले.

गोमेकॉवरील विश्वास वाढला

गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. यामुळे आज गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकूण कारभारावरील जनतेचा विश्वास वाढलेला आहे. दररोज गोमेकॉ’मध्ये उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. थोडक्यात यंत्रणेवर विश्वास वाढल्याचे यामधून सिद्ध होत असल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रात क्रांती

पुढे बोलताना आरोग्यमंत्री राणे यांनी, गोव्यातील विविध स्तरावर असलेल्या आरोग्य क्षेत्रात सुविधा देण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. सत्तरी तालुक्याबरोबर पेडण्यापासून ते काणकोणपर्यंत सामान्य माणसांना आरोग्यांची चांगल्या प्रकारची सोय सुविधा निर्माण करण्यावर भर दिली जात आहेत. आरोग्य क्षेत्रात गोव्यात क्रांती घडत आहे. सरकारच्या माध्यमातून जनतेच्या दारात आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न असून ज्या ज्या ठिकाणी आरोग्य सेवा देण्याची गरज आहे त्या ठिकाणी सुविधा पुरवली जाणार आहे. ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातही मोफत सेवा देण्यात येत आहे. तसेच विविध योजना मार्गी लावल्या जात आहेत. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध स्तरावर काम केले जात आहे. महिलांच्या आरोग्यावर जास्त भर देण्याचा प्रयत्न असून केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्याच्या आरोग्य क्षेत्राचा कायापालट करण्यात केला जात असल्याचे सांगितले.

रोजगाराच्या संधी

राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी नवे नवे प्रकल्प आणून पायाभूत सुविधाही वाढवल्या जात आहेत, असे सांगून बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री. राणे यांनी स्पष्ट केले. गोमेकोत दंतचिकित्सा इस्पितळ नवे बांधण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा आरोग्यमंत्री राणे यांनी यावेळी केला.