अन्नदानं परं दानं

0
2
  • डॉ. सीताकांत घाणेकर

योगसाधना- 683, अंतरंगयोग- 269

काहीजण जेवणाची चव आवडली नाही तर ते जिन्नस पानातच ठेवतात. ते उष्टे अन्न मग बाहेर फेकावे लागते. यासाठी पहिल्यांदा घेताना थोडा जिन्नस घ्यावा. आवडला तर पुन्हा घ्यावा. परंतु दुर्भाग्याने हे संस्कार लुप्त होताहेत. कदाचित पुढील जन्मात अशा आत्म्यांना व्यवस्थित अन्न मिळणार नाही.

विश्व, जीवसृष्टी म्हटली की जीवनाचे विविध पैलू डोळ्यांसमोर, मनासमोर येतात. विविध तऱ्हेच्या घटना चालूच असतात- काही सुखदायक, काही दुःखदायक, तर काही साध्या, काही भयानक. प्रत्येक जिवाला अशा विविध घटनांचा सामना करावाच लागतो. सुखदायक घटनांमध्ये जीव आनंदात असतो, तर दुःखदायक घटना घडल्या की त्याला चिंता होते.

तत्त्ववेत्ते म्हणतात की, प्रत्येकाच्या अनेक जन्मांच्या कर्माप्रमाणे त्याचे संचित घडते व त्याप्रमाणे दर जन्मीचे प्रारब्ध ठरते. त्यामुळे एक गोष्ट नक्की की प्रत्येकाने सत्‌‍कर्म करीत राहावे, सर्वांच्या शुभेच्छा घ्याव्यात, आशीर्वाद घ्यावेत. तसेच जीवनपद्धतीदेखील सात्त्विक ठेवावी. सामाजिक कार्यात जेवढे शक्य असेल तेवढे स्वतःला वाहवून घ्यावे. भगवंताला शरण जाऊन नियमित त्याच्या नामाचे चिंतन करावे.

आपण चौफेर नजर फिरवली तर विविध तऱ्हेच्या व्यक्ती दिसतात. त्यांचे जीवन दिसते. काही सज्जन व्यक्तींना दुःख भोगावे लागते, तर त्याचवेळी दुर्जन व्यक्ती आनंदात असतात. म्हणूनच शास्त्रकार म्हणतात की, प्रारब्ध भोग कुणालाही टळत नाहीत. अशावेळी सज्जनांनी भगवंतावर श्रद्धा ठेवून त्याला हृदयापासून शरण जावे. कळत-नकळत घडलेल्या दुष्कर्माबद्दल माफी मागावी. तसेच त्याच्याकडे समस्यांचा सामना करण्यासाठी सर्व तऱ्हेची शक्ती मागावी- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक. या सर्व शक्तींमध्ये सर्वात जास्त महत्त्वाची शक्ती म्हणजे आध्यात्मिक. शास्त्रशुद्ध योगसाधनेमध्ये या सर्व शक्ती सहज दृष्टीस पडतात.
सध्या सर्व विश्वात भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे कलियुग चालू आहे आणि तेदेखील कराल कलियुग. म्हणून अशावेळी आत्मशक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी देवाला संपूर्ण समर्पण अत्यंत आवश्यक आहे.

बालपणात आम्ही कुटुंबातील बहुतेक सदस्य एकत्र बसून एक छान प्रार्थना म्हणत असू-
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम्‌‍।
विहितमविहितं वा सर्वमेतत्‌‍ क्षमस्व
जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो ॥

हात, पाय, वाणी, शरीर, कर्म, कान, नाक, डोळे, मन यांच्याद्वारे कळत-नकळत जे योग्य-अयोग्य अपराध मी केले असतील, त्या सर्व अपराधांची हे करुणासागर महादेवा, तुम्ही मला क्षमा करा. तुमचा जयजयकार असो.
तसे पाहिले तर मनाला दिलासा देण्यासाठी ही प्रार्थना अत्यंत अर्थपूर्ण, भावपूर्ण आहे. ती म्हणण्यामागे जीवनाचे एक महान तत्त्वज्ञान सामावलेले आहे. लहान असताना आम्ही ती कर्मकांडात्मक म्हणत असू, पण आता प्रौढपणी प्रत्येक शब्दाचा अर्थ समजतो आणि आपण देवाकडे काय मागतो याचा बोध होतो. खरे म्हणजे प्रार्थनांचा फक्त शब्दार्थ न बघता भावार्थदेखील बघायचा असतो. एवढेच नव्हे तर त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वतःचे आचरण बदलणे अपेक्षित आहे.
बहुतेक वेळा बहुतेक जण प्रार्थना न समजता म्हणतात व त्यामुळे त्यांची दुष्कर्मे चालूच राहतात, म्हणूनच विश्वाची ही दयनीय स्थिती झाली आहे. या प्रार्थनेनंतर आणखी एक सुंदर प्रार्थना असायची ः
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव॥ हे देवाधिदेवा, तूच माझी आई, तूच माझा पिता, तूच माझा भाऊ, तूच मित्र, तूच विद्या, तूच धन आणि तूच माझे सर्वस्व आहेस.
या प्रार्थनेमध्ये जीव व शिव यांची सर्व नाती, संबंध स्पष्ट सांगितलेले आहेत. सुख-दुःखात ही प्रार्थना म्हणायची असते. आपण सुखात असतो तेव्हा या प्रार्थनेचा भाव लक्षात घेत नाही; पण ज्यावेळी अति दुःख होते त्यावेळी या प्रार्थनेचा अर्थ चांगला समजतो. खरे म्हणजे तो समजायला हवा. येथे प्रामाणिक समर्पण हवे. विश्वातील सर्व संत अशा प्रार्थना म्हणताना समर्पित अवस्थेत असत; मग ते भारतीय असू दे अथवा अन्य धर्मातील!
उदा. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, गोराकुंभार, एकनाथ, मुक्ताबाय, मीराबाय, येशू ख्रिस्त. द्रौपदीनेदेखील वस्त्रहरणाच्या वेळी असहाय होऊन श्रीकृष्णाला पुकारले. संत मीराबाईनेसुद्धा तिला जबरदस्तीने प्यायला दिलेल्या विषाचे प्राशन करताना श्रीकृष्णाचे नाव घेतले. अशा विविध कथांचा मथितार्थ जाणून त्याप्रमाणे आपले आचरण अपेक्षित आहे.

या सदरात आपण विश्वातील समस्यांवर व घटनांवर थोडा थोडा विचार करीत आहोत. आता पुढे-
‘एकीकडे चव आवडली नाही म्हणून अन्न फेकले जाते, तर दुसरीकडे दोन घासांसाठी प्रार्थना करतात.’ हा विरोधाभास अनेकवेळा पाहायला मिळतो. ते कटू सत्य आहे. हे सर्व प्रारब्धाचेच भोग आहेत. येथे दोन गट आहेत- सांपत्तिक स्थिती चांगली असल्यामुळे अन्न भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, तर गरिबीमुळे काहींना अन्न व्यवस्थित, नियमित मिळत नाही. श्रीमंतांनी लक्षात ठेवायला हवे की अन्न हे पूर्णब्रह्म आहे. त्यामुळे अन्नाची नासाडी म्हणजे पाप आहे.
काहीजण जेवणाची चव आवडली नाही तर ते जिन्नस पानातच ठेवतात. ते उष्टे अन्न मग बाहेर फेकावे लागते. आपल्या आजूबाजूला अशी दृश्ये नियमित दिसतात- जास्तकरून समारंभात. खरे म्हणजे ‘बुफे’ पद्धतीत असे व्हायला नको, पण तसे घडतच असते. यासाठी पहिल्यांदा घेताना थोडा जिन्नस घ्यावा. मग आवडला तर पुन्हा एकदा आपण घेऊ शकतो. परंतु दुर्भाग्याने हे संस्कार लुप्त होताहेत. लक्षात ठेवावे की कदाचित पुढील जन्मात अशा आत्म्यांना व्यवस्थित अन्न मिळणार नाही. आमच्या बालपणी हे असे संस्कार बहुतेक कुटुंबांतून होत असत, अगदी सहज.

संदेशात शेवटी एक छान सल्ला आहे- ‘ही परिस्थिती बदलता येऊ शकते, फक्त आपल्यापासून सुरुवात करायला हवी.’ हे अगदी सत्य आहे. एक व्यक्ती सुधारली तर इतरदेखील त्याचे अनुकरण करतील अशी अपेक्षा ठेवावी.
खरेच, व्हॉट्सॲपवर येणारे अनेक संदेश ज्ञानपूर्ण असतात. इतरांना फॉरवर्ड करताना प्रथम स्वतः ते लक्ष देऊन वाचावे, त्यावर मनन-चिंतन करावे. गरज असल्यास आपापसात चर्चा करावी. त्यातील बोध आत्मसात करावा. विश्व नक्की प्रगतिपथावर येईल. अनेक दुःखद घटना टळतील. आम्ही स्वतःपासून आत्ताच याला सुरुवात करू!