>> गोवा विधानसभेत राजकीय आरक्षण लागू करण्याची मागणी
राज्यातील अनुसूचित जमातींतील (एसटी) लोकांना राजकीय आरक्षण ही मोहीम सुरू केलेल्या अनुसूचित जमातींच्या संघटनेने गोवा विधानसभेत एसटींना आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विधानसभेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेचे आगामी अधिवेशन 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ते 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आपल्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी अनुसूचित जमातींकडून 5 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेवर मोर्चा काढला जाणार आहे.
गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण द्यावे यासाठी राज्यातील अनुसूचित जमातीतील लोकांचा लढा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. 40 सदस्यीय गोवा विधानसभेत आपणाला 10 टक्के म्हणजेच 4 मतदारसंघांत आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. आपल्या ह्या मागणीसाठी 2009 साली अनुसूचित जमातींनी गोवा विधानसभेवर एक भव्य मोर्चा नेला होता. त्याशिवाय 25 मे 2011 रोजी बाळ्ळी येथील आंदोलनाला हिंसक रुप मिळाल्यानंतर झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये अनुसूचित जमातीतील दोघे युवा नेते होरपळून मृत्यूमुखी पडले होते.