अनिवासी गोमंतकीयांच्या नोंदणीचे काम आयोगाकडून सुरू ः सावईकर

0
282

वंशाने गोमंतकीय असलेल्या अनिवासी भारतीयांच्या नोंदणीचे काम गोवा अनिवासी भारतीय आयोगाने हाती घेतले आहे. अशी माहिती काल या आयोगाचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली.

या संबंधी अधिक माहिती देताना ऍड. सावईकर म्हणाले की, खरे तर वंशाने गोमंतकीय असलेल्या अनिवासी भारतीयांची नोंदणी केली जावी अशी सूचना आपण ऑक्टोबर २०१९ मध्येच केली होती. आता उशिरा का होईना हे काम सुरू होत आहे ही चांगली बाब आहे.

ते पुढे म्हणाले की, एकदा का या लोकांची नोंदणी झाली की वंशाने गोमंतकीय असलेल्या अनिवासी भारतीयांचा आकडा किती आहे हे गोवा सरकारला कळू शकेल. हा सगळा डेटा तयार होणे अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे.

सध्या कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर विदेशात असलेल्या ज्या लोकांना गोव्यात परत यायचे आहे त्यांना मदत करण्यासाठीही नोंदणीमुळे होणार्‍या माहितीचा फायदा होणार आहे.

दरम्यान, काही गोमंतकीय विदेशात असलेल्या आपल्या कुटुंबीयांना तर काही जण नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. या लोकांनाही आता गोव्यात परतायचे असून त्यांची माहितीही आयोगाला मिळणार आहे. गोमंतकीय वंशाच्या अनिवासी भारतीयांची आता जी नोंदणी केली जात आहे त्याचा पुढील काळात आणखी विविध गोष्टींसाठीही सरकारला फायदा होऊ शकतो असेही सावईकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.