अध्यापन राष्ट्रउभारणीची लोक चळवळ व्हावे

0
121
फोंडा केंद्रशाळेत उपस्थित राहून खासदार नरेंद्र सावईकर यांनी मोदींचे भाषण ऐकले तर वास्कोत सुसेनाश्रम शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वीज मंत्री मिलिंद नाईक यांचीही उपस्थिती होती. पर्वरी येथील शाळेत मोठ्या पडद्यावर मोदींचे भाषण ऐकताना विद्यार्थींनी. काले येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत वीजजोडणी नसल्याने चौगुले क्लबमध्ये मोदींचे भाषण दाखवण्यात आले. कमळेश्‍वर विद्यालयाच्या विद्यार्थिनी भाषण ऐकताना. डिचोलीतील शांतादुर्गा विद्यालयाचे विद्याथी.

शिक्षक दिन संदेशात पंतप्रधान नरेंद मोदींची हाक
अध्यापन हे राष्ट्र उभारणीची लोक चळवळ व्हावे, अशी हाक काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतून देशभरातील शाळांना संबोधित करताना दिली. शिक्षकी पेशाचे देशाच्या जडणघडणीसाठी महत्त्व प्रतिपादित करताना, डॉक्टर्स, अभियंते आदी सर्व शिक्षितांनी शाळेत वर्ग घ्यायला हवेत, असेही ते म्हणाले. आज देशात चांगल्या शिक्षकांची कमतरता असल्याचे सांगून ही परिस्थिती बदलायला हवी व भारतातून चांगल्या शिक्षकांची जगात ‘निर्यात’ व्हायला हवी असे त्यांनी सांगितले. मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.
देशातील सर्व शाळांत शैचालये बांधण्यासाठी प्राधान्य देणार आहे, मुलींना घराजवळ शाळा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणार आहे, असे ते व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे प्रक्षेपित संदेशात म्हणाले. मुलींना शिकवणे म्हणजे दोन परिवारांना शिकवणे, माहेरच्या व सासरच्या, असे सांगून, मात्र मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण मोठे आहे, असे त्यांनी चिंतेच्या स्वरात सांगितले. त्यामागे वेगळ्या शौचालयांची कमतरता प्रमुख कारण असल्याचेही मोदी यांनी नमूद केले. शिक्षकांनी मुलांना भेदभावाशिवाय शिकवावे व तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी सूचवले. शिक्षकी पेशाचा आदर वाढावा, शाळेत व्यक्तीत्व घडावीत, स्वच्छता व कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन दिले जावे, असेही मोदी संदेशात म्हणाले. साध्या सोप्या भाषेत त्यांनी मुलांना संबोधित केले व त्यानंतर देशभरातील मुलांच्या निवडक प्रश्‍नांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तरे दिली. मोदींचे हे भाषण देशभरातील शाळांमध्ये थेट प्रक्षेपित करण्यात आले. त्यासाठी व्यवस्था करण्याची सूचना सर्व शाळांना राज्य सरकारांच्या माध्यमातून करण्यात आली होती. दरम्यान, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडूसारख्या बिगर भाजप सरकारच्या राज्यांनी मोदींचे भाषण प्रक्षेपित करण्याबाबत विशेष रस दाखविला नाही. ६३ वर्षिय मोदींनी नवी दिल्लीच्या माणिकशॉ सभागृहात आयोजित या कार्यक्रमात ९० मिनिटे संवाद साधला.
हेडमास्टर नव्हे, टास्कमास्टर !
पंतप्रधानांनी काल निवडक प्रश्‍नांनाही उत्तरे दिली.
प्रश्‍नोत्तराच्या सत्रातील काही अंश
* अकरावीच्या एका विद्यार्थ्याचा प्रश्‍न – गांधीनगरहून दिल्लीला आल्यावर कसे वाटले ? पंतप्रधान : अजून दिल्ली पाहण्यास वेळ मिळालेला नाही. घर ते कार्यालय एवढेच अंतर प्रवास असतो. जास्त काही फरक पडलेला नाही. फक्त जरा जास्त मेहनत करतो, सकाळी आणखी लवकर उठतो, शब्दांच्या वापराबाबत जास्त सजग असतो. मुख्यमंत्रीपदाचा पंतप्रधानपद हाताळताना खूप उपयोग झाला. अनुभव मोठा शिक्षक असतो, पण अनुभव शिक्षणावर अवलंबून असतो. कधीच वाटले नव्हते, पंतप्रधान बनेन कारण कधी वर्गाचा मॉनिटरही झालो नव्हतो.काहीतरी करण्याचे स्वप्न पाहा, त्यासाठी काम करत राहा, तुम्हाला यश येईलसुद्धा, पण सगळ्यात जास्त आनंद स्वप्नासाठी वावरण्यात असतो.
* विद्यार्थ्याचा प्रश्‍न – आमच्याशी बोलून तुम्हाला काय मिळालेे ? पंतप्रधान : सगळेच लाभासाठी नसते. देश आमचा चेहरा पाहून कंटाळलाय आज देशभरातील मुलांना पाहून देश प्रफुल्लीत झालाय. आज टीव्ही मुलांसाठी चालतोय, फक्त मुले दिसताहेत, माझ्यासाठी ही मोठी उपलब्धी आहेत. मी हेडमास्टर नाही, टास्कमास्टर आहे. मी मेहनत करतो व इतरांनाही काम पूर्ण करण्यासाठी मेहनत करायला लावतो.
* इम्फाळच्या विद्यार्थ्याचा प्रश्‍न : मी भारताचा पंतप्रधान कसा बनू शकेन ? पंतप्रधान : २०२४च्या निवडणुकीची तयारी सुरू कर….तोपर्यंत मलाही काही भीती नाही….भारत लोकशाही राष्ट्र आहे, इथे कोणीही पंतप्रधान बनू शकतो…मात्र पंतप्रधानपदाची शपथ घेताना निमंत्रण दे !
* विद्यार्थी : जपान आणि भारतात शिक्षणाच्या दृष्टीने काय फरक दिसला ? पंतप्रधान : जपाश शिकण्याला महत्त्व देते, तिथे पालक मुलांना शाळेत सोडायला जात नाहीत, सर्व मुलांना समान वागणूक मिळते, कुवतीच्या आधारावर कधीही मुलांमध्ये भेदभाव होता कामा नये, प्रत्येक मुलात काहीतरी विशेष असते, शिक्षकांनी ते शोधायला हवे.
* लेहच्या विद्यार्थिनीचा प्रश्‍न : तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी शाळेत असताना कधी खोडसाळपणा केला होता का ? पंतप्रधान : खोडसाळपणा केल्याशिवाय कुणी बालक असू शकतो का ? बालपणातले अनुभव हे फार महत्त्वाचे असतात.
* दिल्लीच्या विद्यार्थ्याचा प्रश्‍न – राजकारण कठीण आहे का ? तुम्ही ताण कसा हाताळता ? पंतप्रधान : राजकारण एक व्यवसाय न समजता सेवेची संधी समजले पाहिजे. भारत माझा परिवार आहे, मी काम करताना थकत नाही.
मोदींच्या भाषणास विद्यालयांचा प्रतिसाद
पंतप्रधानांकडून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवेचा गुरुमंत्र
काणकोणात ७००० विद्यार्थ्यांनी ऐकले पंतप्रधानांचे भाषण
काणकोण तालुक्यातील प्राथमिक ते च्च माध्यमिक स्तरावरील ७ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषण ऐकण्याचा लाभ घेतला. तालुक्यातील मल्लिकार्जुन, श्रद्धानंद, सेंट अँथनी, सेंट तेरेझा, दामोदर, कात्यायणी, बाणेश्‍वर, सर्व सरकारी माध्यमिक शाळा, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात भाषण ऐकण्याची सोय करण्यात आली. ज्या शाळांत केबल, टीव्हीची सोय नव्हती, त्या शाळांनी यासाठी खास कनेक्शन घेतले.
बलराम उच्च माध्यमिक विद्यालयात केबल टीव्हीची सोय नसल्यामुळे या विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाड्यावरील शैला नाईक व विनोद नाईक यांच्या घरी कार्यक्रम पाहण्याची सोय केल्याची माहिती प्रभारी प्राचार्य कमलाकांत म्हाळशी यांनी दिली. श्रीस्थळच्या शासकीय विद्यालयातील मुलांची सोय वाड्यावरील घरांत तर सादोळशेच्या शासकीय विद्यालयाने आपल्याच शाळेत ही सोय केली.
काही शाळांना परिपत्रक उशिरा मिळाल्याने थोडा गोंधळ निर्माण झाला. पैंगीणच्या काही प्राथमिक शाळांची सोय पैंगीण पंचायतीने केली. आगोंदच्या शाळासमूहाने एकत्रितपणे हा कार्यक्रम पाहिला.
सेंट ऍनीसमध्ये कार्यक्रम पाहिला नाही
आगोंदच्या सेंट ऍनीस विद्यालयात टीव्ही केबलची सुविधा नसल्यामुळे हा संवाद शाळेत न ऐकता विद्यार्थ्यांनी आपापल्या घरीच पाहण्याची सूचना फादरनी दिली. मात्र सदर कार्यक्रमावर आधारित पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व मुलांची आज दि. ६ रोजी सकाळी शाळेत प्रश्‍नमंजूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सर्व मुले पाहतील असा विश्‍वास फादरनी व्यक्त केला.
पर्वरीत उत्तम प्रतिसाद
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी काल पर्वरीतील सर्व विद्यालयांतून विशेष आयोजन करण्यात आले होते. बहुतेक सर्व शाळांमधून दूरदर्शन, इंटरनेटची सोय करण्यात आली होती.
विद्या प्रबोधिनी आणि एल. डी. सामंत विद्यालयातील भव्य सभागृहात मोठा पडदा लावून विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मोदी यांचे भाषण ऐकण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी सुमारे नऊशे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. मुख्याध्यापिका नीता साळुंखे तसेच इतर शिक्षकांनी यावेळी चोख व्यवस्था आणि आयोजन केले होते. मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
साल्वादोर द मुंद येथील सुनंदाबाई बांदोडकर विद्यालयातही मुख्याध्यापक म्हाळसाकांत देशपांडे यांनी सदर भाषण विद्यार्थ्यापर्यंत दूरदर्शनद्वारे दाखविण्याचे आयोजन केले होते. उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सदर भाषण ऐकले.
डिचोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवेचे भान ठेवण्याचा गुरुमंत्र देताना निसर्ग, पर्यावरण जपा, वीज-पाणी वाचवा, आत्मविश्‍वास वाढवा या गोष्टींबरोबरच शिक्षणात झोकून द्या असा गुरुमंत्र दिला व विद्यार्थ्यांसोबतच पालक शिक्षकांनाही तो भावला. डिचोली तालुक्यातील बहुतेक शाळांमधून मोदींच्या या भाषणाला विक्रमी प्रतिसाद लाभला. मात्र काही शाळांनी दुपारच्या सत्रात हा कार्यक्रम केला नाही. येथील शांतादुर्गा विद्यालयाने हिराबाई झांट्ये सभागृहात खास व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी १२०० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. हा उपक्रम उत्कृष्ट असल्याची प्रतिक्रिया अथर्व मांद्रेकर या विद्यार्थ्याने व्यक्त केली. शिक्षक, मुख्याध्यापक तसेच विविध शाळा व्यवस्थापनाने चांगली व्यवस्था करताना पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची चांगली व्यवस्था केली होती.
पेडणे तालुक्यातही व्यवस्था
पेडणे तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या वर्गाला विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती होती. डायसोसनसह बहुतेक सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची व पाहण्याची संधी विद्यालयांनी उपलब्ध करून दिली होती. बहुतेक शाळा सकाळऐवजी दुपारी ११ वा. भरण्यात आल्या होत्या. सायंकाळी ५ वा. मोदींच्या वर्गाने सांगता झाली. मात्र दुपारी भाषण असल्याने बहुतेक विद्यार्थ्यांना झोपेवर नियंत्रण ठेवता आले नाही. शिक्षकांनाही ही गैरसोय वाटत होती. मात्र तरीही शिक्षकदिनी देशभरात प्रथमच पंतप्रधानांशी अप्रत्यक्ष संपर्क विद्यार्थ्यांनी साधला.
कुडचडे रवींद्र भवनात आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे आयोजन कुडचडे रवींद्र भवनात करण्यात आले होते. कुडचडे सुपर कॉम्प्लेक्स व भाजप मंडळ यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल, सुपर कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष वामन भद्री, केप्याचे भागशिक्षणाधिकारी राम मूर्ती, उपनगराध्यक्ष प्रदीप नाईक, सर्वोदय विद्यालयाचे शिक्षक एकनाथ नाईक, अशोक नाईक उपस्थित होते.
रवींद्र भवनात चंद्रभागा तुकोबा नाईक विद्यालय, गार्डियन एंजल स्कूल, सर्वोदय विद्यालय, द न्यू एज्युकेशनल विद्यालय व सावर्ड्यातील शारदा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. भाषणानंतर १५ मिनिटांत विद्यार्थ्यांची चुळबुळ सुरू झाली. विद्यार्थी गप्पा मारू लागले व सुमारे अर्ध्या तासाने विद्यार्थी आणि शिक्षकही भाषण अर्ध्यावर सोडून घरी निघून जाऊ लागले.
मिराबाग-सावर्ड्यातील शाळेत टीव्हीची सोय नसल्याने विष्णू नाईक यांनी विद्यार्थ्यांची आपल्या घरात सोय केली. कुडचडे काकोडा गणेशोत्सव मंडळानेही खास मोठा पडदा लावून भाषणाची सोय केली होती.
सुसेनाश्रम विद्यालयात वीजमंत्र्यांची उपस्थिती
वास्कोतील जेटी-सडा येथील सुसेनाश्रम विद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी वीजमंत्री मिलिंद नाईक यांची खास उपस्थिती होती. सुमारे अर्धातास श्री. नाईक यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. त्यानंतर वीजमंत्री बायणा रवींद्र भवनातील शिक्षकदिनाच्या कार्यक्रमास रवाना झाले. तेथील जमलेल्या विद्यार्थी व शिक्षकांसोबत ते पुढील कार्यक्रमात सहभागी झाले.
सासष्टी तालुक्यातही सोय
शिक्षकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुले व शिक्षकांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी सासष्टी तालुक्यातील कित्येक शाळांत व्यवस्था करण्यात आली होती. कोकणी भाषा मंडळ शाळा, महिला नूतन, दामोदर विद्यालय अशा अनेक शाळांत विद्यार्थ्यांनी शांतपणे भाषण ऐकले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना पंतप्रधानांनी उत्तरे दिली. मात्र डायसीझन शाळांत अनुत्साह दिसून आला. येथील एका शाळेत भाषणाप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक आपापसात बोलत असल्याचे दिसून आले.
फोंडा तालुक्यातही लाभ
फोंडा तालुक्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्याचा लाभ घेतला. येथील केंद्रीय विद्यालयात खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, उपनगराध्यक्ष शांताराम कोलवेकर तसेच भाजप नेत्यांनी विद्यार्थ्यांसोबत आपला सहभाग दर्शवला. अन्य काही शाळांमध्येही भाजप नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिक्षकदिन आनंदात साजरा केला.