अध्यात्म आणि आत्मज्ञान

0
1

योगसाधना- 666, अंतरंगयोग- 252

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आपली भारतीय संस्कृती अतिशय उत्कृष्ट आहे. या संस्कृतीला अनेक पैलू आहेत. काही स्थूल तर काही सूक्ष्म. ज्ञान दोन्हींचे हवे. पण अध्यात्मामध्ये सूक्ष्म पैलू जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून आत्मज्ञान अत्यंत आवश्यक आहे.

आपली भारतीय संस्कृती अतिशय उत्कृष्ट आहे. या संस्कृतीला अनेक पैलू आहेत. काही स्थूल तर काही सूक्ष्म. ज्ञान दोन्हींचे हवे. पण अध्यात्मामध्ये सूक्ष्म पैलू जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून आत्मज्ञान अत्यंत आवश्यक आहे.
दुर्भाग्याने हल्लीच्या शिक्षणपद्धतीत आध्यात्मिक ज्ञान अगदी कमी प्रमाणात आहे. त्यामुळे विश्वात विविध समस्या निर्माण होताना दिसतात. ऋषी-महर्षींच्या आश्रमात अनेक विषयांबरोबर हे ज्ञानदेखील दिले जात असे. आता अशा ज्ञानाचा लाभ सहसा दुर्मीळच. पण अनेकवेळा काही मालिका (दूरदर्शनवरील) फार छान असतात. लक्ष देऊन घटना व चर्चा ऐकली तर फायदा होऊ शकतो. मालिका फक्त मनोरंजनासाठी बघण्यापेक्षा, त्यातील फक्त शब्दार्थ बघण्यापेक्षा, भावार्थ व आध्यात्मिक अर्थही बघितला तर कार्यक्रम बघताना आनंद तर वाटतोच, पण त्याचबरोबर व्यक्तीचे आत्मज्ञान वाढते. हल्ली चालू असलेली ‘रामायण’ ही मालिका यासंदर्भात अत्यंत उपयोगी आहे. त्यातील एक घटना ज्ञानपूर्ण आहे. ती घटना अशी-
मिथिला राज्यात राजा जनक आपली मुलगी- भूमिकन्या- सीता हिचे स्वयंवर जाहीर करतात. सर्व तयारी चालू असते. तेवढ्यात अत्यंत हुशार, तेजस्वी, पंडिता राजवाड्यात प्रवेश करते, ती म्हणजे गार्गी.
पूर्वीच्या काळी अशा थोड्याच स्त्रिया होत्या ज्या ज्ञानी होत्या, त्यातील एक म्हणजे गार्गी. पुरुषांनादेखील ज्ञानयुक्त चर्चा करण्यासाठी आव्हान देणाऱ्या काही स्त्रिया होत्या, त्यांत गार्गीचे नाव सर्वज्ञात होते. तिचे चरित्र अभ्यासण्याजोगे आहे. याज्ञवल्कल्य या अत्यंत ज्ञानी व्यक्तीबरोबर त्या चर्चा करताना त्यावेळच्या अनेक व्यक्तींनी बघितले होते. आता विषयांतर नको, कारण मूळ मुद्दा बाजूला राहील.

राजा जनकदेखील ज्ञानपूर्ण योगी होता. त्याच्या दरबारात तसे विद्वान होते. गार्गीला बघून सर्वांना आनंद होतो. पण तिच्या योग्यतेची कुणीही व्यक्ती- पुरुष अथवा स्त्री- जनकाच्या दरबारात नव्हती. जनक तिचे प्रेमाने, आदराने स्वागत करतात. पण ती सडेतोडपणे आव्हान देते की तिच्याशी शास्त्रार्थ करणारी व्यक्ती समोर आणा. कुणीही पुढे यायला धजावत नाही. त्यावेळी गार्गी स्पष्ट म्हणते- “माझ्याबरोबर शास्त्रार्थ करण्यास येथे कुणीही नाही तर ज्ञानाचे केंद्र मानल्या गेलेल्या मिथिला नगरीची प्रतिष्ठा धुळीत जाणार काय? आता मिथिला नगरी फक्त शिवधनुष्य आहे म्हणून आकर्षणाचे केंद्र राहील?”
त्यावेळी दुरून दरबारात येऊन सीता सांगते- ‘मला जर माझ्या पित्याची आज्ञा असेल तर मी शास्त्रार्थ करायला तयार आहे.’ सर्वांना आश्चर्य वाटते.
त्यावेळी गार्गी म्हणते- “बालपणात शिवधनुष्य उचलणारी बालिका- व तेही खेळखेळात- ती हीच आहे का? हीच का ती सीता? बालिके, तू शक्तिशाली असशील आणि जनकाची पुत्री म्हणून ज्ञानीदेखील असशील, पण शास्त्रार्थ करण्याचे आव्हान तू स्वीकारू शकशील? आज पहिल्यांदाच कुणी स्त्री शास्त्रार्थ करण्यास पुढे आली आहे. आजपर्यंत मी अनेक पुरुषांचा पराजय केला आहे.”

सीता नम्रपणे नमस्कार करून म्हणते- “जय-पराजय युद्धक्षेत्रात असतो. ज्ञानक्षेत्रात विविध विचारांचा संगम असतो. आपणासारख्या ज्ञानी व्यक्तीकडून मला थोडादेखील ज्ञानाचा अंश मिळाला तर मी माझे भाग्यच समजेन!”
मग त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दोघांना गळ्यात घालण्यासाठी काही विशिष्ट फुलांचा हार दिला जातो. त्यावेळी गार्गी समजावते- “ज्ञानी शांत असावा लागतो. शास्त्रार्थाच्या वेळी काही कारणामुळे जर त्याला क्रोध आला तर त्याच्या शरीराचे तापमान वाढल्यामुळे फुले कोमेजतील. हा कमलाहार थोडा थोडा काळा होईल.”
सीता म्हणते, “मला आपल्याकडून मिळालेली ज्ञानफुलेच फार महत्त्वपूर्ण आहेत.”
त्यानंतर गार्गी सीतेला प्रश्न विचारते-
1) तिन्ही लोकांत सर्वात शक्तिशाली अस्त्र कुठले- ब्रह्माचे ब्रह्मास्त्र, महादेवाचे पाशुपतास्त्र की नारायणाचे नारायणास्त्र?
सीता म्हणते ः करुणा! तिच्यापेक्षा दुसरे मोठे अस्त्र नाही. कारण करुणेमध्ये सर्वांची पीडा समजण्याचा भाव आहे. त्यामुळे सगळे आपले बनतात, आणि तसे झाल्यावर कोणत्याही अस्त्राची गरज नाही.
गार्गीचे एक कमळ कोमेजते. कदाचित तिला सीतेचे सुंदर उत्तर ऐकून क्रोध आला असेल.
2) “सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण समय व व्यक्ती.”
सीता ः “वर्तमान. कारण भूतकाळ मागे गेला तो परत येणार नाही. भविष्यकाळाबद्दल कुणीही काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या चालू असलेले पलच महत्त्वाचे. सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती ती जिच्याबरोबर आपण वर्तमान क्षणात आहोत. जशा आपण माझ्यासोबत आहात.”
तद्नंतर ‘रॅपीड फायर’ प्रश्न सुरू होतात.
3) प्रकाशापेक्षा जास्त वेगवान काय?
सीता ः मन! एका क्षणात तिन्ही लोक पार करू शकते!
4) सर्वात अधिक पवित्र काय?
सीता ः अग्नी! अग्नीशी संबंध आला की ती वस्तू पवित्र होते.
5) सर्वात जास्त शुभ?
सीता ः शब्द व कर्म.
6) सर्वात शुभ प्रार्थना?
सीता ः जी दुसऱ्यासाठी केली जाते ती!
7) सर्वात मोठा मित्र?
सीता ः विवेक… सदा शुभ मार्गावर नेणारा!
8) सर्वात मोठा शत्रू?
सीता ः अहंकार!
9) सर्वात सुंदर आभूषण?
सीता ः नम्रता!
10) सर्वात सुंदर पराक्रम?
सीता ः त्याग.
11) सर्वात मोठा विजय?
सीता ः स्वतःवर!
12) त्रिदेवात सर्वात मोठा ब्रह्मा, शिव की नारायण?

  • नर!

गार्गी ः नर सर्वांच्या वर कसा?
सीता ः नराची करुणा ब्रह्मासमान, त्याग शिवासमान, मर्यादा नारायणासमान संतुलन राखणारी. नराला तिन्ही गुण असतात म्हणून तो त्रिदेवासारखा महान.
एवढ्यात गार्गीच्या फुलहाराची सर्व फुले काळी होतात. मध्ये सीतेची दोन कमळे काळी होतात. शेवटच्या प्रश्नात. कदाचित तिला थोडा क्रोध आलाही असेल, पण लगेच सर्व उत्तरे शांतपणे दिल्यावर ती परत पूर्ववत ताजी होतात.
गार्गी म्हणते, “अ्‌‍द्भुत, सुंदर असाच नर तुला वर रूपात मिळो.” ती पुढे म्हणते- “सीते, मला तू शास्त्रांचा व जीवनाचा नवा अर्थ शिकवला आहेस. मी प्रभावित झालेय.” मग ती राजा जनकाला विचारते, “राजा, तुम्ही असा वर सीतेसाठी शोधू शकणार? तुम्हाला चिंता झाली असेल. परीक्षेसाठी सज्ज रहा.”
सीता गार्गीला वाकून, पदस्पर्श करून नमस्कार करते. गार्गी सीतेला आशीर्वाद देते.
सारांश एवढाच- अशा लहान कथांमध्ये अध्यात्माचा अंश आहे, ज्यांचा मानवी जीवनाच्या विकासार्थ वापर करायला हवा. पाठ्यक्रमात अशा गोष्टी शिकवायला हव्यात, तरच भारतात व विश्वात सुवर्णयुग, सत्‌‍युग येईल.