गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, त्याच दरम्यान काल राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. अधिवेशनाच्या काळातच राणेंनी भाजपच्या दोन बड्या नेत्यांची भेट घेतल्याने त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
काल गोवा विधानसभेचा अधिवेशनाचा सहावा दिवस होता. या अधिवेशनादरम्यानच काल मंत्री विश्वजीत राणे यांनी अचानक दिल्ली गाठत शहा व नड्डा यांची भेट घेतली. खुद्द राणे यांनी या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. मधल्या काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एक आदेशवजा सूचना जारी करत सरकारमधील मंत्र्यांनी आपणास कल्पना दिल्याशिवाय परस्पर दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊ नयेत, असे बजावले होते. आता यावेळी राणेंनी मुख्यमंत्र्यांना कल्पना देऊन वरिष्ठांची भेट घेतली की कल्पना न देताच हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.