अधिवेशनात विष्णू वाघ, रोहन खंवटे यांचे सर्वाधिक प्रश्‍न

0
147

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मंगळवारपासून चालू होत आहे. दि. २१ ऑगस्टपर्यंत चालणार्‍या या अधिवेशनाच्या पहिल्या दहा दिवसांत सांत आंद्रे आमदार विष्णू सुर्या वाघ आणि पर्वरीचे आमदार रोहन खंवटे या दोघांनी सर्वात अधिक प्रश्‍न विचारले असून शंभराहून अधिक प्रश्‍न विचारणार्‍या आमदारांत विजय सरदेसाई, नरेश सावळ व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा स’ावेश आहे.
दि. २२ जुलै ते दि. ५ ऑगस्टपर्यंत विधानसभेचे कामकाज एकूण १० दिवस चालेल. या कालावधीत श्री. वाघ व श्री. खंवटे यांनी प्रत्येकी १६२ प्रश्‍न विचारले आहेत. श्री. वाघ यांनी २८ तारांकित तर १३४ अतारांकित प्रश्‍न विचारले आहेत तर श्री. खंवटे यांनी १३३ अतारांकित व २९ तारांकित प्रश्‍न विचारले आहेत.
त्याखालोखाल प्रश्‍न विचारणार्‍यांत नरेश सावळ यांचा क्रम लागतो. त्यानी ३० तारांकित व १२२ अतारांकित मिळून एकूण १५२ प्रश्‍न विचारले आहेत. पाठोपाठ कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स आलेक्स यांनी १५१ (२८ तारांकित, १२३ अतारांकित) प्रश्‍न विचारले आहेत. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी २८ तारांकित व ११९ अतारांकित प्रश्‍नांसह एकूण १४७ प्रश्‍न विचारले आहेत.
या पाचही आमदारांनी मिळून विचारलेल्या एकूण प्रश्‍नांची संख्या ७७५ होते. या पाचजणांनंतर सर्वाधिक प्रश्‍न विचारणार्‍यात दिगंबर कामत यांचा क्रम सहावा लागतो. त्यानी पहिल्या दहा दिवसांत एकूण ८९ प्रश्‍न विचारले आहेत. यातले २८ तारांकित तर ६१ अतारांकित आहेत. बाबुश मोन्सेरात यांनी एकूण ६४ प्रश्‍न विचारले आहेत. सत्ताधारी पक्षातर्फे प्रश्‍न विचारणार्‍यात डॉ. प्रमोद सावंत यांचा क्रम श्री. वाघ यांच्यानंतर लागतो पण वाघांच्या १६२ प्रश्‍नांच्या तुलनेत डॉ. सावंत यांनी २४ अतारांकित व २६ तारांकित मिळून एकूण ५० प्रश्‍न विचारले आहेत. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी २८ तारांकित व १ अतारांकित असे फक्त २९ प्रश्‍न विचारले आहेत.