संसदेच्या चालू अधिवेशनकाळासाठी रजा मागणारा सचिन तेंडुलकरचा अर्ज काल राज्यसभेत गदारोळात संमत झाला. सचिन राज्यसभेचा नियुक्त सदस्य असून त्यांच्या सभागृहात अनुपस्थितीविषयी वारंवार वाद झाला आहे. चालू अधिवेशनाच्या सुरुवातीपासून म्हणजे ७ जुलै ते अधिवेशन संपेपर्यंतच्या म्हणजे १४ ऑगस्ट या काळासाठी सचिनचा हा अर्ज होता.
राज्यसभा उपाध्यक्ष पी. जे. कुरीयन यांनी सभागृहाला सांगितले की, तेंडुलकरने वैयक्तिक, व्यावसायिक व पारिवारीक कारणांसाठी सभागृहातून अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली आहे. मात्र त्याला समाजवादी पक्षाचे नरेश अगरवाल यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, सचिन दिल्लीत विज्ञान भवनात कार्यक्रमासाठी येतो पण सभागृहात येत नाही, हा सभागृहाचा अवमान आहे. त्यावर गदारोळ झाला, शेवटी रजा मंजूर करण्यात आली. कारणांवर चर्चेचा सदस्यांना अधिकार नसल्याचे उपाध्यक्षांनी सांगितले.