अदानींची ईडी, सीबीआय चौकशी का नाही?

0
4

राहुल गांधींचा सवाल; चीनी व्यक्तीची गुंतवणूक; अदानी समूहाने आरोप फेटाळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीत चीनी व्यक्तीची गुंतवणूक आहे, त्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत काल केली. अदानींच्या गुंतवणुकीसाठी पैसा कुणाचा आहे. एक व्यक्ती देशातील सर्व गोष्टी खरेदी करू लागला आहे. त्यावर मोदी गप्प का आहेत, तसेच ईडी, सीबीआय हे अदानी यांची चौकशी का करत नाहीत, असा सवालही राहुल गांधींनी केला. दरम्यान, राहुल गांधींनी केलेले हे सर्व आरोप अदानी समूहाने फेटाळले आहेत. त्यांनी या संबंधित एक निवेदन प्रसिद्ध करुन हे आरोप जुनेच असून, त्यामध्ये समूहाला क्लीन चिट मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.

अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून 1 अब्ज डॉलर्स हे भारताबाहेर गेले आणि नंतर पुन्हा अदानी यांच्याच कंपनीत गुंतवण्यात आले. त्या पैशातूनच आता अदानी हे विमानतळ आणि इतर प्रकल्प राबवत आहेत. हा पैसा कुणाचा आहे? अदानींचा आहे की आणखी कुणाचा? दुसऱ्या कुणाचा असेल तर ते कोण आहेत याची चौकशी करावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली.

विनोद अदानी हे या मागचे मास्टरमाईंड असून ते गौतम अदानी यांचे बंधू आहेत. अदानी यांच्या कंपनीमध्ये नासर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग यांची गुतंवणूक आहे. अदानी जर भारतात विकास प्रकल्प राबवतात. तर त्यांच्या कंपनीमध्ये चीनी व्यक्तीचा पैसा कसा? असा सवालही राहुल गांधींनी केला.

‘ओसीसीआरपी’च्या आरोपानंतर अदानी समूहाचे शेअर्स गडगडले
हिंडनबर्ग नंतर आता ‘ओसीसीआरपी’ या अमेरिकन संस्थेने अदानी समूहाला लक्ष्य केले आहे. अदानी समूहाने मॉरिशस कनेक्शनद्वारे निनावी गुंतवणूक करुन, स्वतःचं भांडवली बाजारमूल्य वाढवल्याचा आरोप ओसीसीआरपीने केला. या आरोपानंतर भारतीय बाजारात अदानी समुहाच्या शेअर्सला मोठा फटका बसला. अदानी समुहाने ओसीसीआरपीचे आरोप स्पष्टपणे फेटाळल्यानंरही काल ही घसरण थांबली नव्हती.