अडवानी, रामदेवबाबांना मिळणार पद्मविभूषण पुरस्कार!

0
95

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कार बहाल केल्यानंतर आता पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होणार असून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरु रामदेवबाबा, धार्मिक गुरु श्री श्री रविशंकर, ख्यातनाम अभिनेते अमिताभ बच्चन यांची नावे या पुरस्कारासाठी निश्‍चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदा पद्मविभूषण पुरस्कारांच्या यादीत एकूण १४८ व्यक्तींचा समावेश असून त्यात केवळ दोनच राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल या अन्य राजकीय व्यक्तीला हा सन्मान बहाल केला जाणार असल्याचे वृत्त आहे. या व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, रजनीकांत, दिग्दर्शक संजय लीला भंसाळी, गीतकार प्रसून जोशी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे. अभिनेता सलमान खान यांचे वडील पटकथालेखक सलीम खान यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. गीतकार प्रसून जोशी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या प्रचारासाठी मदत केली होती. अर्थतज्ज्ञ विवेक देब्रॉय, पत्रकार रजत शर्मा, हरीशंकर व्यास, स्वप्न दासगुप्ता तसेच अभिनेते प्राण (मरणोत्तर) यांचीही नावे पुरस्कार यादीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. क्रीडा क्षेत्रामध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, कुस्तीपटू सुशील कुमार तसेच त्याचे प्रशिक्षक गुरु सत्पाल आणि भारतीय हॉकी संघाचे कर्णधार शारदा सिंग यांनाही पद्म पुरस्कार बहाल करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. पद्म पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयातून उद्या पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.