अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना सावरण्यासाठी वेगळी यंत्रणा

0
171

वर्षअखेरीस खाण व्यवसाय सुरू : मुख्यमंत्री
पायाभूत सुविधा विकास व सामाजिक प्रगती म्हणजे विकास नव्हे. मानवी विकास अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळे अडचणीत सापडणार्‍या कुटुंबांना मुक्त करण्यासाठी वर्षभरात वेगळी यंत्रणा उभारण्याचा विचार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल जुन्या सचिवाल इमारतीसमोर आयोजित देशाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ध्वजारोहरण केल्यानंतर बोलताना सांगितले. चालू वर्ष अखेरपर्यंत खाण व्यवसाय पूर्ववत सुरू होईल असेही ते म्हणाले.
पूर्वीच्या काळात अडचणीत सापडलेल्या कुटुंबाना मदत किंवा त्यांना दिलासा देण्याचे सांत्वन करण्याचे काम सभोवतालचे लोक करीत होते. विभक्त कुटुंबामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असे सांगून कुंभारजुवे येथे एका कुटुंबाने केलेल्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचा त्यांनी उल्लेख केला. संकटप्रसंगी आधार देण्याची भावना नष्ट झाल्यानेच असे प्रसंग उद्भवतात असे ते म्हणाले.
समुपदेशन योजनेचा १५ हजार विद्यार्थ्यांना लाभ
विद्यार्थ्यांसाठी सुमपदेशन योजना राबविणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असून सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा झाला. अनेक विद्यार्थ्यांना तणावातून मुक्त करणे शक्य झाले, असे ते म्हणाले. खाण बंदीमुळे गोमंतकीय जनतेसमोर अनेक संकटे उभी ठाकली. चालू वर्ष अखेरपर्यंत खाण व्यवसाय पूर्ववत सुरू होईल असे पर्रीकर यांनी सांगितले.
जनतेने सकारात्मकतेने सहकार्य करावे
यापूर्वीच्या केंद्रातील आघाडी सरकारच्या अडमुठ्या धोरणामुळे आपल्याला विकासाच्या बाबतीत अनेक अडचणी आल्या. केंद्रात मोदींचे सरकार स्थापन करण्यासाठी जनतेने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. केंद्र सरकारच्या मदतीने गोवा हे देशातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदर्श राज्य घडविण्याचा आपला प्रयत्न असेल. त्यामुळे जनतेने सकारात्मक दृष्टिकोनातून सहकार्य करावे, असे आवाहन पर्रीकर यांनी केले. लवकरच राबविण्यात येणार्‍या दिनदयाळ आरोग्य विमा योजनेचाही पर्रीकर यानी उल्लेख केला. राज्यात आधुनिक शिक्षणाच्या तसेच अन्य माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम केले जाईल, असे ते म्हणाले.