‘अट्टम’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

0
6

>> 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; हिंदीत ‘गुलमोहर’ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल दिल्लीत करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालखंडात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सीबीएफसीद्वारे प्रमाणित फीचर आणि नॉन-फीचर चित्रपटांचा समावेश होता. मल्ल्याळम चित्रपट ‘अट्टम’ने बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान पटकावला. गुलमोहर हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवडला गेला. ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘तिरुचित्रांबलम’साठी नित्या मेनन आणि ‘कच्छ एक्स्प्रेस’साठी मानसी पारेख हिला जाहीर झाला.

दरवर्षी सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात. आता लवकरच राष्ट्रपती भवनात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सूरज बडजात्या यांना ‘उंचाई’साठी जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता (उंचाई), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पवन मल्होत्रा (फौजी), सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट : कांतारा, सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीचा पुरस्कार : प्रमोद कुमार, सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट : कार्तिकेय 2, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट : पोन्नियिन सेल्वन – भाग 1, सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट : बागी दी धि…, सर्वोत्कृष्ट मल्ल्याळम चित्रपट : सौदी वेल्लाक्का, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : वाळवी, सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट : केजीएफ चाप्टर 2, सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट : काबेरी अंतरधन, सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट : इमुथी पुथी, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन : प्रितम आणि ए. आर. रेहमान, सर्वोत्कृष्ट गायक : अरिजितसिंह (ब्रह्मास्त्र), सर्वोत्कृष्ट ॲक्शनपट : केजीएफ चाप्टर 2, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट : द कोकोनट ट्री, सर्वोत्कृष्ट निवेदक : मुरमूर्स ऑफ द जंगल, बेस्ट डॉक्युमेंट्री : मुरमूर्स ऑफ द जंगल.

तीन मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार

परेश मोकाशी यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘वाळवी’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. ‘वाळवी’बरोबरच आणखी दोन मराठी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘मुरमूर्स ऑफ द जंगल ‘ या मराठी सिनेमाला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘वारसा’ या माहितीपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.