अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठीचा सामना विद्यमान रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी ज्यो बायडन यांच्यात अटीतटीने लढला जात असताना काल जगाने पाहिला. अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया गुंतागुंतीची असते. तिचा निर्णय एका दिवसात होत नसतो. टपालाने आलेली मते यथावकाश मोजली जाण्याची प्रथा आहे. शिवाय काल झालेली मतमोजणी ही विविध प्रांतांमधील उमेदवारांच्या निवडीसाठी असते. प्रांतवार ‘इलेक्टोरल कॉलेज’ मधून मग अमेरिकी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी मतदान होत असते आणि त्याची मतमोजणी झाल्यावरच नूतन राष्ट्राध्यक्ष खर्या अर्थाने निश्चित होत असतो आणि जानेवारीमध्ये पदभार स्वीकारत असतो. परंतु ती व्यक्ती कोण असेल याचे अंदाज कालच्या मतमोजणीअंतीच स्पष्ट होत असल्याने अर्थातच त्याविषयी जनतेला कुतूहल असते.
काल मतमोजणी प्रक्रिया सुरू असतानाच ट्रम्प यांनी आपण विजयी झालो असल्याचे घोषित करून टाकले आणि उर्वरित मतमोजणी करू नका, विरोधी पक्षांनी त्यात गैरव्यवहार केलेला आहे आणि त्याच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार असल्याचा इशारा देऊन अमेरिकी जनतेला थक्क करून सोडले. ट्रम्प यांची एकूण लहरी वृत्ती लक्षात घेता त्यांच्यासारख्याने अशा प्रकारे अमेरिकी लोकशाही प्रक्रियेप्रतीच संशय घेणे आणि मतमोजणीआधीच स्वतःवर जवळजवळ राज्याभिषेक करून घेणे हे आश्चर्यकारक ठरत नाही हे खरे असले तरी निवडणूक प्रक्रियेमध्ये काही संकेत असतात जे उमेदवाराने पाळणे अपेक्षित असते, ते ट्रम्प यांना जमले नाही. या निवडणुकीमध्ये प्रथमच कधी नव्हे एवढ्या प्रचंड प्रमाणात टपाली मतदान झालेले आहे. जवळजवळ दहा कोटी लोकांनी टपालाने मतदान केल्याचे दिसून आलेले आहे. यापैकी बर्याच मतांची मोजणी बाकी असतानाच ट्रम्प यांनी स्वतःला विजयी घोषित करून न्यायालयात जाण्याची भाषा करणे गैर होते.
मतमोजणी पुढे सरकत असताना त्यामधील चुरस क्षणोक्षणी दिसून येत होती. कोणता पक्ष कोणत्या प्रांतामध्ये आघाडी घेणार याबाबत व्यक्त झालेले सारे अंदाज उलथेपालथे करीत काल निकाल येत होते. फ्लोरिडासारख्या प्रांतामध्ये तर अत्यंत अटीतटीचा सामना रंगला होता. डेमोक्रॅटस्नी यांनी तो प्रांत हस्तगत करण्यासाठी चंग बांधला होता. अगदी बराक ओबामांच्या सभा दोनदोनदा आयोजित करून तेथील क्युबन अमेरिकन जनतेला आकृष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला होता, परंतु अखेरीस रिपब्लिकनांनी तेथे बाजी मारली. प्रांताप्रांतामध्ये अशा प्रकारे संघर्ष रंगलेला पाहायला मिळाला. डेमोक्रॅटस्नी रिपब्लिकनांचे गेल्या निवडणुकीतील बालेकिल्ले हस्तगत करण्याचा आटोकाट प्रयत्न चालवल्याचे पाहायला मिळाले. सरतेशेवटी मिशिगन, पेनिसिल्वेनिया आणि विस्कॉन्सीन या तीन औद्योगिक प्रांतांपर्यंत लढत येऊन थांबली. मतमोजणीमधील आघाडी – बिघाडीचे हे नाटक रंगलेले असताना ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा केल्याने हा राष्ट्राध्यक्षपदाची ही निवडणूक कोणत्या थराला जाईल याची चिन्हे एव्हानाच दिसू लागली आहेत. ज्यो बिडेन यांनी ट्रम्प यांच्या लहरी कारभाराप्रतीची जनतेची नाराजी आपल्या पक्षाच्या बाजूने वळवण्यासाठी जंग जंग पछाडले, त्याचा फायदा त्यांना मिळाला.
जगातील सर्वांत समृद्ध राष्ट्र असलेली अमेरिका आज कोरोनासंदर्भात जगातील सर्वांत वाईट परिस्थितीला तोंड देते आहे. कोरोनाने आतापर्यंत जगातील सर्वाधिक म्हणजे जवळजवळ दोन लाख तीस हजार लोकांचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. प्रचंड संख्येने ओढवलेले मृत्यू, लक्षावधी लोकांच्या गेलेल्या नोकर्या, वर्णद्वेषातून उफाळलेला हिंसाचार, अशा अनेक देशांतर्गत संकटांनी ट्रम्प यांनी गेल्यावेळी घोषित केलेले ‘मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन’ चे स्वप्न कुठल्याकुठे उधळले गेले. ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणत त्यांनी गेल्यावेळची निवडणूक जिंकली होती. यावेळी त्यांना ही लढत एवढी सोपी ठरलेली नाही हे कालची मतमोजणी सांगते आहे. दोन कालावधींनंतर आलटून पालटून रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटस्ना सत्ता बहाल करण्याची अमेरिकी जनतेची परंपरा, परंतु ट्रम्प यांना यावेळी प्रयत्नांची शर्थ करावी लागलेली दिसते. अरिझोनासारख्या प्रांताने काल सत्तापालट करणारे पहिले राज्य होण्याचा मान मिळवला. खरोखर ऐतिहासिक स्वरूपाची लढत अमेरिकेच्या रणभूमीवर लढली जाते आहे. टपाली मतदानाच्या मोजणीनंतर जेव्हा अंतिम निकाल हाती येईल, तेव्हा तो दोन्ही गटांकडून स्वीकारला जाणार की न्यायालयांतून आणि रस्त्यावरील हिंसाचारातून लढला जाईल याची शाश्वती उरलेली नाही. ज्या लोकशाहीला अमेरिकी जनता आजवर अभिमानाने मिरवीत आली, तिचा तो वारसा मात्र ट्रम्प आणि बायडन यांच्या या लढाईमध्ये धोक्यात आलेला दिसतो आहे.