अटल सेतूवरील विद्युत कामात मोठ्या घोटाळ्याचा कॉंग्रेसचा पुन्हा आरोप

0
141

मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाच्या (अटल सेतू ) विद्युत कामात मोठा घोटाळा झाल्याचा पुनरुच्चार गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला. विद्युत खांब आणि विद्युत सामान खरेदीची बनावट बिले तयार करून गोवा साधन सुविधा विकास महामंडळाला सादर करण्यात आली आहेत. राज्यात भ्रष्टाचाराला थारा देणार नाही अशी घोषणा करणार्‍या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या ८ दिवसात या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कथित सहभागाबाबत चौकशी करावी, असे आव्हान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी दिले.

या घोटाळ्याबाबत उपलब्ध कागदपत्रे सरकारकडे सादर करण्याची आपली तयारी आहे. या प्रकरणी वेळीच कारवाई केल्यास सरकारचे ३५ ते ४० कोटी रुपयांची बचत होऊ शकते. विद्युत सामान खरेदीसाठी तिसर्‍या कंपनीची नियुक्ती करून सात ते साडे सात कोटी रुपयांचा नाहक खर्च करण्यात आला आहे. पुलावरील प्रत्येक खांब खरेदीसाठी ७२,७५० रुपये खर्च आलेला आहे. तर, बिल सादर करताना ही रक्कम १ लाख ५३ हजार रुपये एवढी दाखविण्यात आली आहे. लाइट खरेदीसाठी ५९ हजार ६५२ रुपये खर्च आलेला आहे. बिल सादर करताना १ लाख ९७ हजार रुपये दाखविण्यात आलेले आहेत. तिसर्‍या पुलावरील विद्युत कामाबाबतची ठेकेदाराने सादर केलेली मूळ बिले मिळविण्यात आलेली आहेत. तसेच ठेकेदाराने सादर केलेल्या जीएसटी विषयी माहिती मिळविण्यात आलेली आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.

निविदेविना दिले विद्युत काम
पुलावरील विद्युत कामात गैरव्यवहार करण्यासाठी मूळ कंत्राटात जाणीवपूर्वक बदल करण्यात आलेला आहे. तसेच ४५ कोटीच्या विद्युत काम देताना निविदा जारी करण्यात आलेली नाही. विद्युत सामान खरेदीचे काम तिसर्‍या कंपनीला देण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, अशी घोषणा केलेली आहे. त्यामुळे जीएसआयडीमधील सुरू असलेला गैरव्यवहार त्यांच्या निदर्शनास आणून दिला जात आहे.

या प्रकरणी सरकारकडून कारवाई न केल्यास गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती तक्रार करणार आहे. कॉंग्रेसने आत्तापर्यंत बरीच कागदपत्रे मिळविलेली आहेत. आणखी काही कागदपत्रे मिळविली जात आहेत, असेही चोडणकर यांनी सांगितले. अन्यथा, सरकारने कॉंग्रेस पक्षाने मिळविलेली कागदपत्रे चुकीचे असल्याचे जाहीर करावे. तसेच, आपणावर अब्रूनुकसानीची दावा दाखल करावा, असेही आव्हान चोडणकर यांनी दिले.

मोन्सेरातनी दहा दिवसात
कॅसिनो हटवावेत

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पोट निवडणुकीच्या वेळी मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो हटविण्याबाबत दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आमदार मोन्सेरात यांनी दहा दिवसात कॅसिनो हटवावे, असे आव्हान गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिले.
पणजी पोट निवडणूक प्रचाराच्या वेळी बाबूश मोन्सेरात यांनी मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो १०० दिवसात हटविण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. त्यावेळी बाबूश मोन्सेरात हे कॉंग्रेस पक्षात होते. आता मोन्सेरात निवडून आल्यानंतर सत्ताधारी भाजपचे आमदार बनले आहेत. मोन्सेरात यांना आमदारपदी म्हणून निवडून आल्यास ९० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आमदार मोन्सेरात यांना त्यांच्या आश्‍वासनाची आठवण पुन्हा एकदा करून दिली जात आहे. त्यांना आश्‍वासनाची पूर्तता करण्यासाठी केवळ १० दिवस शिल्ल्लक राहिलेले आहेत. आमदार मोन्सेरात हे सत्ताधारी पक्षात असल्याने आपल्या आश्‍वासनाची पूर्तता कशी करतात याकडे कॉंग्रेस लक्ष ठेवून आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.