अटक, मारहाण प्रकरणात कर्पे यांना 10 हजारांचा दंड

0
0

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांना एका अटक आणि मारहाण प्रकरणामध्ये जोरदार दणका दिला. विश्वेश कर्पे यांची गोवा मानवाधिकार आयोगाच्या (जीएचआरसी) आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली असून, गृह सचिवांना आयोगाच्या आदेशाची कार्यवाही करण्याचा निर्देश न्यायालयाने दिला आहे. कर्पे यांच्याकडून 10 हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. येथील उच्च न्यायालयात पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांनी गोवा मानवाधिकार आयोगाच्या आदेशाला आव्हान दिले होते. मानवाधिकार आयोगाने सप्टेंबर 2015 मध्ये कर्पे यांना हणजूण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना वर्ष 2013 मध्ये बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या आणि मारहाण केलेल्या तक्रारदाराला 5 हजार रुपये देण्याचा निर्देश दिला होता. उच्च न्यायालयाने कर्पे यांची याचिका फेटाळताना गृह सचिवांना आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासह एकूण 10 हजारांचा दंड वसूल करण्याचे निर्देश दिले.