अटकपूर्व जामिनासाठी पूजा शर्माचा उच्च न्यायालयात अर्ज

0
14

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराच्या मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा हिने अटकपूर्व जामिनासाठी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अर्ज दाखल केला; मात्र उच्च न्यायालयाने पूजा शर्मा हिला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. या अर्जावर सोमवार दि. 15 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

येथील उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणात संशयित पूजा शर्मा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी फेटाळून लावला होता. त्यामुळे आता पूजा शर्मा हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. तिच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली; मात्र न्यायालयाने तात्काळ सुनावणीस नकार देत या प्रकरणी सोमवारी सुनावणी ठेवली
आहे.

पूजा शर्मा हिला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आहे, असा दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला. सरकारी पक्षाकडून सोमवारी युक्तिवाद केला जाणार आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतली आहे. आसगाव येथील घराच्या मोडतोड प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे केला जात आहे. या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप झालेला नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले.