महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक रणधुमाळी दरम्यान काल पोलिसांनी ४.८५ लाख रु. ची रोख रक्कम असलेली एक कार ताब्यात घेतली असून सदर कार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालकीची असल्याचा आरोप आहे.सदर गाडीत पोलिसांना अजित पवार यांची व्हिजिटिंग कार्डे व कपडे सापडले असल्याची माहिती परभणीचे पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांनी दिली. मात्र या अनुषंगाने पवार यांच्यातर्फे प्रतिक्रियेसाठी कोणीही उपलब्ध झाले नाही. यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या कृष्णा हजारे या कारचालकाने कारमधील कपडे पवार यांचे असल्याची माहिती दिली. सदर गाडी लातूर येथे जात होती. हे प्रकरण राज्य निवडणूक खात्याकडे सोपविण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत ७ घटनांद्वारे पोलिसांनी ५ कोटी रु.ची रक्कम जप्त केली आहे. मतदारांना वाटण्यासाठी ही रक्कम नेण्यात येत होती असा आरोप आहे.