अजित कडकडे यांना ‘गोमंतविभूषण’ प्रदान

0
6

कला अकादमीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

गोवा शासनाच्या कला संस्कृती संचालनालयातर्फे दिला जाणारा गोमंतविभूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार लोकप्रिय गायक अजित कडकडे यांना कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात मंगळवारी विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख 5 लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी व्यासपीठावर अजित कडकडे यांच्या पत्नी छाया कडकडे, सन्माननीय पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार चंद्रकांत शेट्ये, केदार नाईक, संकल्प आमोणकर, गोविंद गावडे, कला-संस्कृती खात्याचे सचिव सुनील अंचिपाका, कला संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप उपस्थित होते.

साधनसुविधा निर्माण करणे फक्त एवढेच सरकारचे काम नाही, तर आमचे सरकार कलाकार, साहित्यिक घडवण्यासाठी तत्पर आहे. कलेवर श्रद्धा ठेवून जिद्दीने, कष्टाने कलाकार बनून गोव्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अजितकुमार कडकडे यांच्यापासून नव्या पिढीतील कलाकारांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

अजित कडकडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवरांना बाबू गडेकर आणि साथींच्या भजन दिंडीने रंगमंचावर आणण्यात आले त्यावेळी रसिकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. सिद्धी सुर्लकर पिळगावकर यांनी गायिलेल्या स्तवनाने सोहळ्याला प्रारंभ झाला. यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अजित कडकडे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सोहळ्याचा प्रारंभ झाला. तत्पूर्वी अजित कडकडे यांच्यावरील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे कला अकादमीच्या कला दालनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

अजित कडकडे यांच्या प्रेमापोटी आज हे कला मंदिर रसिकांनी भरून गेले आहे. त्यांनी आत्मा ओतून स्वरांची सेवा केली. कडकडे यांच्याकडून प्रेरणा घेऊन गोव्यात अनेक कलाकार निर्माण होवोत, असे सुभाष फळदेसाई म्हणाले.
अजित कडकडे हे आपल्या गोव्याला भूषण आहेत. त्यांना गोव्याबद्दल अभिमान आहे. त्यांचे गाणे ऐकल्यानंतर मराठी संस्कृती काय चीज आहे याची प्रचिती येते. त्यांचे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावे अशी भावना निर्माण होते. त्यांचे कष्ट, जिद्द, समर्पितवृत्ती यामुळेच ते मोठे झाले, असे सदानंद तानावडे यांनी सांगितले.
यावेळी कला-संस्कृती संचालनालयाच्या सहाय्यक सांस्कृतिक अधिकारी क्रांती च्यारी यांनी सौ. छाया कडकडे यांची ओटी भरून त्यांचा सन्मान केला. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजय वैद्य यांनी मानपत्राचे वाचन केले. उपसंचालक मिलिंद माटे यांनी आभार मानले.

वडील म्हणाले, ‘गाण्याच्या नादाला लागू नको’
‘मी खूप छान शिकवेन; पण लोकांना आवडले तरच त्याचे गाण्यावर पोट भरेल. मी त्याची शाश्वती देऊ शकत नाही’ हे अभिषेकीबुवांचे उत्तर ऐकून माझे वडील नाराज झाले आणि मला गाण्याच्या नादाला लागू नको असा सल्ला दिला; परंतु मी हट्ट धरला गाणे शिकणार आणि तेही अभिषेकीबुवांकडेच. कारण माझा आतील ईश्वरी आवाज सांगत होता की, मी गायकच होणार आणि मी चिकाटीने शिकलो, अशी आठवण अजित कडकडे यांनी यावेळी सांगितली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काय म्हणाले?
अजित कडकडे यांनी जिद्द, चिकाटी धरून कष्टाने कला जोपासली म्हणून त्यांना यशाचा मार्ग सापडला. नव्या पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कलेवर श्रद्धा ठेवून प्राविण्य मिळविले पाहिजे. आमचे सरकार केवळ साधनसुविधा निर्माण करत नाही तर मानव संसाधन विकासही करते. कलाकार, साहित्यिक घडविण्यास आम्ही बांधील आहोत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

मी माझे गुरू पंडित अभिषेकीबुवा यांच्याकडून शिस्त, वेळ पाळणे, कलाकार कसा असावा अशा गोष्टी गाण्याव्यतिरिक्त शिकलो. हा पुरस्कार मी त्यांना व माझे इतर गुरू श्रीपादबुवा माडिये, पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले यांना अर्पण करतो. स्वामी समर्थांमुळे माझा प्रवास सुखकर झाला. माझी पत्नी छाया ही छायेप्रमाणे माझ्या पाठीशी उभी राहिली आणि प्रेम करणाऱ्या आपणा रसिकांशिवाय हा प्रवास पूर्ण झाला नसता.

  • अजित कडकडे, गायक