– सौ. पौर्णिमा केरकर
अजंठा लेणी पाहण्यासाठी आम्ही औरंगाबादला जाण्याची तयारी केली ती अंगाची काहिली करणार्या वैशाख वणव्याच्या दिवसांतच. मे महिन्याच्या दिवसांतही महाराष्ट्रातील कोरड्या भागात जाण्याचे धाडस आम्ही सर्वांनी केले ते अभूतपूर्व अशी बुद्ध लेणी पाहण्यासाठीच! जाताना वाटेत ठिकठिकाणी डाळिंबाची शेती दिसली. काही ठिकाणी द्राक्षांचे मळे पाण्याअभावी अगदीच सुकून गेलेले दिसले. आमचा प्रवास होता बसचा. सूर्य वरून आग ओगत होता. तरीही मनात काळ्या कातळाची दैवी अनुभूती परत परत स्पर्शून जायची. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा शांत स्वर अंतरंगात सामावून घेण्यासाठीचा तो प्रवास होता.औरंगाबादेतील सातमाळा पर्वतराजीच्या रांगा खानदेश, मराठवाड्यात विखुरलेल्या आहेत. तापी नदीच्या अस्तित्वाने हा परिसर नावारूपास आलेला आहे. इथेच घाटमाथ्याजवळ ‘अजंठा’ हे लहानसे गाव वसलेले आहे. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात एवढे ऐतिहासिक वैभव दडलेले आहे, याचा शोध कोणी व कसा घेतला असेल याविषयीचे कुतूहल मनात जागे झाल्याशिवाय राहत नाही. अजंठाची लेणी दोन रांगांत कोरलेली दिसतात. लांबून पाहिले असता डोंगररूपी लांबलचक कातळ अर्धचंद्राकृती आकारात स्वतःमध्ये लहान लहान ओवर्या सामावून घेतलेले दिसते. मोठा दगड व दरवाजे जसे लक्ष वेधून घेतात, तसेच लहानमोठे खांबसुद्धा या दगडातून मोठे आकर्षक भासतात.
लेणी पाहण्यासाठी जर तिन्हीसांजेपर्यंत आपण अजंठाला पोहोचू अशा अंदाजाने प्रवास केला तर तो अधिक सोयिस्कर ठरतो. कारण ही लेणी पाहायची ती सकाळी सकाळी जाऊन. महाराष्ट्र टुरिझमच्या पर्यटकांसाठीच्या बसेस सकाळी नऊ वाजता सुरू होतात, त्यामुळे कोवळ्या उन्हात बरीचशी लेणी पाहून झालेली असतात. पाच वाजेपर्यंत संपूर्ण डोंगर फिरून होतो. आता जर नऊ ते पाचपर्यंत फिरून ‘मी अजंठाची लेणी पाहिली’ असे कुणी सांगत असेल तर ते अभ्यासू मनाला, संशोधक वृत्तीला कधीच मानवणार नाही. त्यांच्यासाठी एक दिवसच काय, एक आठवडासुद्धा अपुरा पडणारा आहे.
ही लेणी अनुभवायची तर सकाळची वेळच सोयीस्कर ठरते. त्यासाठीची अनेक कारणे आहेत. एकतर औरंगाबादहून अजंठाला जाण्यासाठीच्या प्रवासात खूप रात्र झाली तर वाटेत मुक्काम करण्यासाठी व्यवस्थित सोय होणे कठीण. शिवाय वाटेत रात्र घालवली तर मग दुसर्या दिवसाची दुपार उजाडते अजंठ्याला जाण्यासाठी. म्हणून मग सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंतच असलेल्या इथल्या भटकंतीवर मर्यादा पडते. आटापिटा करून हा जागतिक वारसा पाहण्यासाठी आपण आलेलो असतो, पण इथे पोचल्यावर आपल्या प्रवासाचे नियोजन सपशेल फसल्याची जाणीव होते. म्हणून जरा दिवसाउजेडी अजंठाला पोहोचून, लवकर उठून पहिली बस पकडली की मग बाकी सारा प्रवास सुखकर होतो.
चिनी प्रवासी युआन आयुष्यात खूप फिरला. ठिकठिकाणी केलेल्या प्रवासाच्या नोंदीसुद्धा त्याने टिपून ठेवल्या आहेत. अजंठाची लेणी त्याने पाहिली व त्यांची नोंद करून ठेवली. तो लिहितो- ‘महाराष्ट्राच्या पूर्व भागात असलेल्या पर्वतरागांतील दरडीत मोठी दालने व मंडप कोरलेले आहेत. तेथे असलेल्या मोठ्या संघारामात मूर्ती सत्तर फुटांहूनही मोठी आहे. मंदिर तर १०० फुटांपेक्षाही मोठे आहे. ही भव्य बुद्धमूर्ती व त्यावरील पाषाणाची सप्त छत्रे बोधीसत्त्वाच्या अवताराची आठवण करून देतात.’
खजुराहोच्या शिल्पकलेची नजाकत शृंगाररसात समरस होते, तर अजंठामधील शिल्पकला शिल्पकलेपेक्षा चित्रकामासाठी विशेष महत्त्वपूर्ण वाटते. एकूण तीस गुफांचा समूह येथे आहे. या गुंफांतील कमानी, खांब, भिंती, छत यांवर सर्वत्र बुद्धाचीच चित्रे कोरलेली आढळतात. बुद्धमूर्ती, त्यांची स्तुपे ही मनोहारी व आकर्षकच वाटतात. अलंकारिक, मानवी आकृतीची यथातथ्य रेखांकन असलेली व कथानकपर, अशा वेगवेगळ्या प्रकारची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यांतही एक शिस्तबद्धता जाणवत राहते. पशुपक्षी, कल्पित प्राणी, यक्षगंधर्व, अतिमानवी योनी, बुद्ध, बोधिसत्त्व, लोकपाल अशी चित्रे कोरलेली आढळतात. बुद्धाची चित्रे तर अशी असंख्य भिन्न-भिन्न मुद्रांमध्ये चितारण्यात आलेली आहे की त्यातून वैविध्यपूर्ण अविर्भाव बुद्धाचे समग्र जीवनच दर्शवितात. बुद्धजीवनावर लोकमानसाने अतिश्रद्धेपोटी ज्या काही कथा, दंतकथा रचलेल्या होत्या, त्याच कथा चित्रांच्या माथ्यमातून या गुंफांमधून कोरण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बुद्धाचा जीवनपटच या गुंफांमधून दिसतो. एकूण तीस गुंफा असलेल्या पर्वतरांगेतील दुसर्या गुंफेत तर सिंहासनावर बसलेली खूप मोठी बुद्धमूर्ती स्थित आहे. एकूणच सर्वांगसुंदर चित्रमयतेसाठी ही गुंफा प्रसिद्ध आहे. सोफा, मंडप, गर्भगृह अशीच सर्वसाधारण सर्व गुंफांची रचना आहे. इतक्या सार्या गुंफांमधील मधल्या काही गुंफा या अर्धवटच राहिलेल्या आढळतात. चौथ्या क्रमांकाची गुंफा तर सर्वात मोठी असलेली गुंफा.
जगातील अत्यंत प्राचीन असलेली ही चित्रे. जेव्हा बुद्धधर्माचा प्रचार व प्रसार आजूबाजूच्या देशांत झाला होता, त्यावेळेसही यामधील कलेला वेगळी उंची प्राप्त झाली होती. ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ शिकारीच्या निमित्ताने येथील जंगलातून भ्रमंती करीत असता एक फार मोठा व अलौकिक असा खजिना त्याला गवसला. तोच खजिना अजंठाच्या लेण्यांच्या माध्यमातून जगभर प्रसारित झाला. गुंफा सर्वत्र पसरलेल्या असल्यामुळे एका गुंफेकडून दुसर्या गुंफेकडे जाताना आपल्याला श्रम हे घ्यावेच लागतात. त्यातही गुंफा क्र. १६, १७ व १९ या गुंफांवरील चित्रकाम अप्रतिम असेच आहे. बुद्धाच्या जीवनात घडलेल्या असंख्य घटना अन् प्रसंगांचे वर्णन येथे आहे. लहानमोठ्या खोल्या निव्वळ भिक्षुकांसाठी कोरलेल्या आहेत. बुद्धाच्या शेवटच्या जन्मातले प्रसंगसुद्धा मोठ्या समरसतेने चितारले गेले आहेत. बुद्धाच्या जीवनात घडलेल्या अनेक प्रसंगांवर आधारीत चित्रांची मालिकाच येथे अधोरेखित होते. माया, स्वप्न, बुद्धजन्म, भविष्यकथन, बुद्धाचा धर्मोपदेश, राजगृहातील भिक्षा व असेच कितीतरी प्रसंग रेखाटले गेले आहेत. सर्वच गुंफांचे नाते हे बुद्धजीवनाशी असल्याने ‘अहिंसा परमो धर्म’चा विचार मनात डोकावत होताच.
गुंफा क्र. तीसमध्ये मात्र अजंठाच्या कारागिरांना शरीरशास्त्र व चित्रकला यांची बर्यापैकी जाण होती याची साक्ष तेथील चित्रे पाहून पटते. या चित्रकलेच्या अदाकारीने कोणीही पटकन मोहून जाईल. औरंगाबादहून केवळ शंभर ते दीडशे किलोमीटरच्या आसपास अजंठ्याला ही लेणी निसर्ग कोंदणात पहुडलेली आहेत. स्त्री-पुरुष भावनांची आंतरिक जाणीव जशी चित्रकारांना आहे, तसेच बुद्धरूपी आत्मचिंतन व तत्त्वज्ञानाची कास धरणे हे परमकर्तव्य मानले गेले आहे.
गुंफा क्र. नऊ व दहामधील चित्रांचे वैभव लोप पावण्याच्या वाटेवरती होते. भगवान बुद्धाच्या मृत्यूनंतर ३०० वर्षांनी काढलेली ही चित्रे सुरक्षित ठेवणे, त्यांचे संवर्धन करणे जोखमीचे काम होते. येथील काही चित्रे विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर होती. १९२० नंतर त्यातील काही चित्रे गडप तर झालीच, त्याचबरोबर त्यांचे दर्शन घेणेसुद्धा कठीण बनले. भारतातील रंगकाम केलेली ही खरे तर खूपच जुनी चित्रे असून ती सुरक्षित ठेवणे ही बरीच कठीण बाब होती. भारतीय सर्व्हेक्षण विभागाचे प्रमुख राजदेव सिंग यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली १९९९ पासून त्यांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून संवर्धन केले तर ते सयुक्तिक ठरेल असे वाटते.
या गुंफा पाहण्यासाठी दरदिवशी पाच हजारपेक्षा जास्त देशी-विदेशी पर्यटकांची ये-जा असते.
अजंठ्याला पोहोचल्यानंतर येथील चित्रकलेचा मोह कोणाला होणार नाही? या चित्रकलेत कलाकारांनी आपले नुसते अंतःकरण ओतले नाही तर भावनात्मकरीत्याही ती अजरामर करून ठेवलेली आहेत. येथील विविध गुंफांवर कोरलेले पशुपक्षी, प्राणी, स्त्री-पुुरषांची चित्रे या सर्वांतच भाव रिचवला, मुरवला आहे. त्यामुळेच त्यांतील भावनात्मकता हृदयाचा ठाव घेते. पशुपक्ष्यांनाही मन, भावना, संवेदना असतात याची जाणीव ऊरी बाळगूनच ही चित्रे आपल्याला स्वतःजवळ ओढून घेतात. अभ्यासू पर्यटक कितीही वेळपर्यंत फिरत राहिला तरी त्याला कंटाळा येत नाही. जगभरात आपल्या अप्रतिम चित्रकृतीमुळे अजरामर ठरलेल्या अजंठाच्या गुंफा प्रत्यक्षात अनुभवणे हा एक आनंदसोहळाच आहे.