अघोरी

0
21

मुंबईत आपल्याच लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे करून ते मिळेल त्या भांड्यात भरून ठेवणाऱ्या, ते बारीक करण्यासाठी मिक्सरमध्ये वाटणाऱ्या, विल्हेवाट लावण्यासाठी गॅसवर भाजणाऱ्या, कुकरमध्ये शिजवणाऱ्या, हरेक प्रकारे ते नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका माथेफिरूच्या अघोरी प्रकाराने मुंबईच नव्हे, संपूर्ण देश हादरून गेला आहे. काही काळापूर्वी श्रद्धा वालकर या मुलीचे अशाच प्रकारे तुकडे तुकडे करून नष्ट करण्याच्या धडपडीत असलेल्या आफ्ताब पूनावाला या माथेफिरूचे प्रकरण देशभर गाजले होते. ज्या अर्थी दोन्ही घटनांमध्ये बरेच साधर्म्य दिसते आहे, त्या अर्थी या माथेफिरूने हे अघोरी प्रकार करण्यासाठीची प्रेरणा आफ्ताब पूनावालाच्या बातम्या पाहून घेतली असेल असे मानायला बराच वाव आहे. त्यामुळे ह्या गुन्ह्याकडे ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणूनच पाहावे लागेल. आत्महत्येसारखी एखादी घटना घडते, तेव्हा तिची पुनरावृत्ती करण्याची लाटच उसळते असे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आत्महत्येसारख्या घटनांचे वार्तांकन करताना अतिशय जबाबदारीने केले जावे अशी अपेक्षा ते प्रसारमाध्यमांकडून बाळगतात. बलात्कार वा इतर गुन्ह्यांच्या बाबतीतही वार्तांकन अतिशय जबाबदारीने व्हायला हवे. परंतु एखादा गुन्हा जितका भेसूर आणि भयावह असेल, त्याहून अधिक भयावह प्रकारे, खास करून वृत्तवाहिन्यांवरील त्यांचे वार्तांकन असते. चोवीस तास त्या विकृतीची विस्तृत, बीभत्स वर्णने तऱ्हेतऱ्हेने प्रेक्षकांच्या माथी मारली जातात. त्यातून अशा विकृत कल्पना कोणी माथेफिरू उचलू शकतो याचे भानही अशावेळी ठेवले जात नाही. टीआरपीच्या नादात वाहवत जाऊन हा जो काही हैदोस समाजात घातला जातो, त्याची निष्पत्ती मग अशा प्रकारच्या पुनरावृत्तीमध्ये होते.
आफ्ताब प्रकरण घडले तेव्हा त्या खाटिकवृत्तीची भरपूर चर्चा झाली होती. मग आता हा जो माथेफिरू मुंबईच्या प्रकरणात पकडला गेला आहे, तो तर साने आहे त्याचे काय? शेवटी गुन्हेगाराला जात, धर्म नसते हेच खरे. आपण त्या मुलीची हत्या केलेली नाही, तर तिने स्वतःहून आत्महत्या केली आणि त्यामुळे केवळ ती बातमी बाहेर फुटू नये यासाठी आपण तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला असा आव आता ह्या महाभागाने आणला आहे. तिने आत्महत्याच केली असे जरी एकवेळ मानले, तरी त्या घटनेबाबत तो पोलिसांना कळवू शकला असता. तिच्याविषयी त्याला खरोखरीच काळजी असती, तर तिचे प्राण वाचवण्यासाठी शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या मदतीने त्याने तिला इस्पितळात हलवण्याचा आटापिटा केला असता. परंतु तसे काहीही न करता ज्या अधमपणाने त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याची धडपड चालवली आहे, ती त्याच्यातील मानसिक विकृतीच दर्शवते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची त्याने अवलंबिलेली पद्धत तर त्याहून घृणास्पद आहे. जिच्यासमवेत आयुष्यातील गेली दहा वर्षे एकत्र घालवली, तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करणे, ते तोडणे, शिजवणे, भाजणे हे ज्याला सुचू शकते, अशी व्यक्ती माणूस म्हणवून घेण्यास तरी पात्र आहे काय? एखाद्या हिंस्र श्वापदाप्रमाणे त्याने आपल्या लिव्ह इन पार्टनरचे लचके तोडलेले दिसतात. श्रद्धा वालकर आणि सरस्वती वैद्य या दोन्ही प्रकरणांमध्ये त्या दोघीही लिव्ह इन पद्धतीनेच आरोपींसोबत राहत होत्या. त्यामुळे यानिमित्ताने या ‘लिव्ह इन’ जीवनपद्धतीचे तोंड फाडफाडून समर्थन करणाऱ्यांनाही थोडे आत्मचिंतन करावे लागेल. या प्रकरणातील आरोपी पोलिसांना उलटसुलट जबान्या देत सुटला आहे. त्यामुळे यातील सत्य नेमकेपणाने बाहेर काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असणार आहे. या प्रकरणाचा अतिशय काटेकोर तपास करून ह्या विकृत नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी असा प्रयत्न प्रामाणिकपणे झाला पाहिजे. अन्यथा, असे एखादे धक्कादायक प्रकरण घडते तेव्हा गहजब होतो, चर्चा होते, परंतु कालांतराने ते विस्मृतीच्या अंधारात जाते आणि त्याची तीव्रताही विसरली जाते. अशा घटना घडतात तेव्हा त्यांचा समाजावर जो सखोल परिणाम होतो त्याकडेही गांभीर्याने पाहण्याची जरूरी आहे. मीरारोडच्या ज्या इमारतीमध्ये ही घटना घडली, तेथील आणि आजूबाजूच्या रहिवाशांवर या प्रकाराचा किती भीषण परिणाम झाला असेल. तेथील मुलाबाळांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना केवढा मोठा मानसिक धक्का बसला असेल याची तर कल्पनाही करवत नाही. त्यामुळे किमान वृत्तवाहिन्यांच्या आणि वृत्तपत्रांच्या वार्तांकनासंदर्भात थोडी तरी स्वयंशिस्त पाळली जाण्याची गरज वाटते. अशा गुन्ह्यांची रसभरित वर्णने करणाऱ्यांनी असे काही आपल्या कुटुंबात, आपल्या आजूबाजूला घडले असते तर हाच सूर लावला असता काय?