अगोदर आरोग्य खात्यातील रिक्त पदे भरा

0
7

>> आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांचा आरोग्यमंत्र्यांना टोला

22 हजार पदे निर्माण करून सरकारने नोकरभरतीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी प्रथम आपल्या आरोग्य खात्यात रिक्त असलेली पदे भरावीत, अशी मागणी आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात डॉक्टर्स, नर्सेस आदींची कित्येक पदे रिक्त आहेत. तेथे हृदयरोग विभागावर कित्येक महत्त्वाचे असे विभागही नाहीत. त्यामुळे दक्षिण गोव्यातील रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे राणे यांनी आता नोकरभरती प्रकरणी स्वत: क्रियाशील होत सर्वप्रथम दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात डॉक्टर्स, नर्सेस आदी पदे विनाविलंब भरावीत. तसेच आरोग्य खात्यात नोकरभरती करताना सर्व मतदारसंघांतील उमेदवारांचा विचार करावा, असे व्हिएगस म्हणाले.

राणे यांनी गेल्या अडीच वर्षाच्या काळात आपल्या आरोग्य खात्यात किती पदे भरली व किती जणांना नोकऱ्या दिल्या हेही जनतेला सांगावे, अशी मागणीही व्हिएगस यांनी केली. गोव्यातील जनतेने राज्यात आम आदमी पक्षाला जर सत्तेवर आणले, तर बेरोजगारीचा प्रश्न सोडवणार असल्याचेही ते म्हणाले. आपण बाणावली मतदारसंघात नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यावेळी आपण 172 जणांना नोकरीची नियुक्ती पत्रे दिल्याचेही त्यांनी नमूद केले.