>> मुख्यमंत्र्यांच्या कारवाईच्या इशार्यानंतर स्थानिकांचा विरोध मावळला
मुरगाव तालुक्यातील सेंट जासिंतो बेटावर काल नौदल कर्मचारी व स्थानिक यांच्यात समझोता झाल्यानंतर अखेर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा झेंडा फडकला. ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत नौदलाचे हे झेंडावंदन असल्याचे स्थानिकांना नौदल कर्मचार्यांनी पटवून देण्यात आल्यानंतर सर्वांनी एकत्र येत ध्वजवंदन केले व राष्ट्रगीतही म्हटले.
सेंट जासिंतो बेटावर काल भारतीय नौदलाचे कर्मचारी आले होते. यावेळी स्थानिकांना त्यांनी, आम्ही या बेटावर ध्वजारोहण करणार असल्याचे सांगितले. याबाबत इतर रहिवाशांना माहिती मिळाली व तिथे स्थानिक जमू लागले. स्थानिकांनी यावेळी त्यांना बेटावर नौदलाला ध्वजारोहण करण्यास विरोध केला. मात्र तेथे ध्वजारोहण करण्यासंबंधीचे पत्र केंद्राकडून जारी झाल्याचे तेथील नौदलाच्या कर्मचार्यांनी सांगितले. तर स्थानिकांनी, ते पत्र आम्हांला या अधिकार्यांनी दाखवले नसल्याचा दावा केला. या बेटावर जुझे फिलिप डिसोझा यांच्या पूर्वजांचे निवासस्थान आहे. त्यामुळे त्यांनीही घटनास्थळी दाखल होत नौदलाला ध्वजारोहण करण्यास एकजुटीने विरोध करू असे सांगितले. तर स्थानिकांनी या बेटावर तिरंगा फडकावून हे बेट ताब्यात घेण्याचा नौदलाचा प्रयत्न आहे असा आरोप केला.
दरम्यान, यावेळी बेटावरील स्थानिक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, गोंयचो आवाजचे विरियटो फर्नांडिस यांनी नौदलाची दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तसेच नौदलाने आमच्यासोबत येऊन झेंडा फडकवावा, आम्ही त्यात सहभागी होऊ, असाही पर्याय दिला.
मुख्यमंत्र्यांकडून दखल
या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली आणि कुठल्याही परिस्थितीत बेटावर ध्वजवंदन व्हायलाच हवे. त्याला विरोध करणार्यांवर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश पोलीस दलाला दिला. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याच्या मार्गावर होते. मात्र अखेरीस स्थानिक पोलीस, नौदल अधिकारी आणि ग्रामस्थ तसेच धार्मिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत यावर चर्चेअंती तोडगा काढण्यात आला. त्यानंतर सेंट जेसिंतो बेटावर नौदलाच्या अधिकार्यांनी शनिवारी स्थानिकांच्या उपस्थितीत बेटावर तिरंगा फडकवला आणि सर्वांनी मिळून राष्ट्रगीतही म्हटले.
स्थानिकांना विश्वासात
घेतले नाही ः जुझे फिलिप
सेंट जासिंतो बेटावर तिरंगा फडकवण्यास माझा विरोध नाही. मात्र नौदल अधिकार्यांनी स्थानिकांना विश्वासात घेणे महत्त्वाचे होते अशी प्रतिक्रिया यानंतर बोलताना जुझे फिलिप डिसोझा यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांकडून नाराजी
सेंट जेसिंतो बेटावर स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकावण्यास नौदलाला स्थानिकांनी विरोध केल्याबद्दल मुख्नयंत्री डॉ. सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ट्वीटद्वारे मुख्यमंत्र्यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया देताना, ध्वजारोहण करण्यास विरोध करणे हे दुर्दैवी आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. सरकार अशा गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.