डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे नवे मंत्रिमंडळ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय नेत्यांच्या विशेष उपस्थितीत शानदार सोहळ्यात सत्तारूढ झाले. राज्याला अखेर सरकार मिळाले. नवनिर्वाचित आमदारांमध्ये मंत्रिपदे मिळवण्यासाठी लागलेल्या चढाओढीसंदर्भात गेल्या १९ मार्चच्या अग्रलेखात नूतन मंत्रिमंडळासंदर्भात जे अंदाज वर्तवले होते, ते शब्दशः खरे ठरले आहेत. या मंत्रिमंडळात समाविष्ट झालेले आमदार, त्यांचा लावण्यात आलेला ज्येष्ठताक्रम, पहिल्या टप्प्यात शपथ देण्यात आलेले मंत्री ह्या सगळ्यातून काही गोष्टी ठळकपणे सूचित होतात. पहिली बाब म्हणजे निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरलेल्या विश्वजित राणे यांना मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांखालोखाल द्वितीय क्रमांकाचे स्थान बहाल करण्यात आले आहे. खरे तर ज्येष्ठतेचा व मंत्रिपदाच्या अनुभवाचा विचार करता मावीन गुदिन्हो हे विश्वजित यांच्यापेक्षा ज्येष्ठ ठरतात. परंतु एकूण गेल्या अठरा दिवसांतील राजकीय घडामोडी विचारात घेऊन विश्वजित यांची द्वितीय स्थानावर वर्णी लावण्यात आलेली दिसते. वि श्वजित, मावीन, नीलेश काब्राल, गोविंद गावडे हे मागील सरकारमध्ये मंत्री होते. गेल्यावेळी जे बारा मंत्री होते, त्यापैकी दोन उपमुख्यमंत्री सर्वश्री बाबू आजगावकर व बाबू कवळेकर आणि दीपक पाऊसकर, मिलिंद नाईक, फिलीप नेरी रॉड्रिग्स हे तीन मंत्री निवडणुकीत पराभूत झाले, तर आणखी एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षांतर केल्याने त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह जे सहाजण पुन्हा निवडून आले, त्यापैकी जेनिफर मोन्सेर्रात वगळता सर्वांना पुन्हा मंत्रिपद मिळणे हे स्वाभाविक होते. जेनिफर यांच्या जागी त्यांचे पती बाबूश मोन्सेर्रात यावेळी आपली मंत्रिपदी वर्णी लावून घेणार हे दिसत होेतेच. त्यानुसार त्यांनी यावेळी मंत्रिमंडळात शिरकाव केलेला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर ज्यांना सत्ताधारी पक्षात प्रवेश दिला गेला होता, त्या रवी नाईक व रोहन खंवटे यांना मंत्रिपदे देणेही क्रमप्राप्त ठरले होते. सुभाष शिरोडकर यांची ज्येष्ठता विचारात घेता त्यांनाही मंत्रिपद अपेक्षित होतेच. त्यामुळे ह्या सर्वांना रीतसर मंत्रिपदे देण्यात आली आहेत.
गोव्याच्या एकूण बारा मंत्रिपदांपैकी नऊ जागा काल भरण्यात आल्या. आता राहिल्या तीन जागा. विद्यमान सरकार हे भाजपचे स्वबळाचे सरकार नाही. तीन अपक्ष आणि मगो पक्ष यांचा पाठिंबा ह्या सरकारच्या स्थैर्यासाठी घेण्यात आलेला असल्याने ही तीन मंत्रिपदे त्या सहयोगींना जाणार असे दिसते. त्यामुळे मगो पक्षातर्फे त्या पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर, अपक्षांपैकी आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना मंत्रिपदे देणे क्रमप्राप्त आहे. राहिलेले जे तिसरे मंत्रिपद आहे, ते मगोचा मांद्रेचा आमदार जीत आरोलकर किंवा डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये व कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोनियो वाझ यांच्यापैकी एकाला द्यावे लागणार आहे. पेडणे तालुक्याला नव्या सरकारमध्ये प्रतिनिधित्व नाही, त्यामुळे आरोलकर यांना ते देणे योग्य ठरले असते, परंतु तेथे डॉ. शेट्ये यांची वर्णी लागेल असे दिसते. कालच्या शपथविधी सोहळ्यात केवळ भाजपच्या नऊ मंत्र्यांचाच समावेश करून पक्षाने जो खणखणीत संदेश विशेषतः मगो पक्षाला दिलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ‘हे आमचे सरकार आहे आणि तुम्हाला मिळणारे मंत्रिपद ही मेहेरबानी आहे’ असेच जणू यातून सूचित करण्यात आले आहे. अर्थात, उद्या जेव्हा सुदिन ढवळीकर यांना दुसर्या टप्प्यात मंत्रिपद देण्यात येईल, तेव्हा त्यांच्या ज्येष्ठतेनुसार त्यांना अपेक्षित असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपदच त्यांना दिले जाणार की एखाद्या दुय्यम खात्यावर बोळवण करण्याची हिंमत मुख्यमंत्री दाखवणार हे पाहावे लागेल. काल सत्तारूढ झालेल्या नऊजणांपैकी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि फार तर नीलेश काब्राल सोडल्यास सगळी बिगर भाजपा मंडळी आहेत. त्यामुळे हे मंत्रिमंडळ केवळ नावापुरते भाजपचे आहे. खरे तर हे आयातांच्या ‘नवभाजपा’चे मंत्रिमंडळ आहे. रा. स्व. संघाचे ज्येेष्ठ नेते त्याकडे त्याच नजरेतून बघत असतात. सद्यस्थितीत राज्यात स्वतःचे सरकार स्थापन करण्यास प्राधान्य असल्याने ह्या वस्तुस्थितीकडे कानाडोळा जरी केला गेला असला तरी पुढील काळामध्ये भाजपला आपला हा सरळसरळ कॉंग्रेसीकरण झालेला चेहरा बदलण्याचे प्रयत्न नक्कीच करावे लागतील. विद्यमान मंत्रिमंडळाचा एकूण चेहरा पाहिला तर त्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापुढे आहे. त्यांना आपल्या मंत्रिमंडळातील महत्त्वाकांक्षी आणि उचापती नेत्यांना लगाम तर घालावाच लागेल असे दिसते!