अखेर सत्तारूढ

0
97

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे पहिलेवहिले सरकार सत्तारूढ होण्याचा मार्ग अखेर काल खुला झाला. अपेक्षेनुरुप देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या खंद्या तरूण नेत्याची मुख्यमंत्रिपदावर निवड करून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आपल्या पक्षाची यापुढची दिशा कोणती असेल हे स्पष्ट केले आहे. काही तरी करून दाखविण्याची उर्मी, त्यासाठी लागणारी धडाडी आणि उत्साह असणार्‍या तरुणांना संधी दिली तर ते उत्तम कामगिरी करून दाखवतात यावर नरेंद्र मोदी यांचा विश्वास आहे आणि त्यांनीच देवेंद्र यांच्या पाठीशी पक्षाचे बळ उभे केले. त्यामुळे एकनाथ खडसे, नितीन गडकरी यांच्यासारख्यांचे मुख्यमंत्रिपदासाठीचे डावपेच तडीला जाऊ शकले नाहीत. गडकरी यांचे नाव पुढे रेटण्याचा विदर्भातील चाळीस आमदारांनी प्रयत्न केला खरा, परंतु तो गडकरींच्या अंगलट आला. दुसरीकडे खडसे यांनी ऐनवेळी मुख्यमंत्रिपदासाठी आपला दावा पुढे केला, तरी त्या दबावाचा पक्षनेतृत्वावर परिणाम होऊ शकला नाही, कारण फडणवीस यांना केवळ पक्षाचेच नव्हे, तर संघाचेही समर्थन प्राप्त आहे. खडसेंनी स्वतःचे नाव पुढे केले, तेव्हा फडणवीस यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालेले आहे याची त्यांना पुरेपूर कल्पना होती, त्यामुळे महत्त्वाचे मंत्रिपद मिळवण्याठीच त्यांनी हा अट्टहास केला असणे शक्य आहे. शेवटी त्यांनाच फडणवीस यांचे नाव सुचविणे भाग पडले. फडणवीस हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे हे त्यांच्या विरोधक म्हणून बजावलेल्या कामगिरीतून दिसून आले आहे. विशेषतः कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारमधील भ्रष्टाचाराची पाळेमुळे त्यांनी ज्या कसोशीने पुराव्यांनिशी खोदून काढली ती सारीच कामगिरी प्रशंसनीय होती. मात्र, आता ज्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच पक्षाच्या बाहेरून का होईना, पाठिंब्यानिशी सत्ताशकट हाकण्याची पाळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला इतकेच नव्हे तर भाजप सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची पाळी आली तर आम्ही तटस्थ राहू असेही सांगून टाकले. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी झाली आणि त्याचा फायदा उठवत भाजपाने शिवसेनेचे दात तिच्याच घशात घालण्याचा पुरेपूर प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत चालवला. दोन्ही पक्षांची युती तुटली त्यानंतर सेना नेत्यांनी आणि विशेषतः सेनेच्या मुखपत्रातून भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर आणि अगदी पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहांवरदेखील जी शेलकी टीका झाली, त्याचा हिशेब व्याजासह चुकता करण्याची आयती संधी भाजपाला मिळाली. अमित शहांना आदिलशहा संबोधणार्‍या आणि मोदींच्या वडिलांनाही नाहक वादात ओढणार्‍या सेनेने शेवटी शेवटी दाती तृण घेत सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा प्रदर्शित केली, तरीही त्यांना भाजप नेत्यांनी झुलवत ठेवले. आपल्याला महत्त्वाची मंत्रिपदे मिळावीत, उपमुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी सेनेने चालवलेल्या प्रयत्नांना दाद न देता भाजपने त्यांना अंधारात ठेवले. आता शिवसेनेशी सत्तेत सामील होण्याबाबत बोलणी सुरू असल्याचे भाजपाने सांगितले असले तरी शुक्रवारी होणार्‍या दिमाखदार शपथविधीत सेनेच्या मंत्र्यांना सामील करून घेतले गेले नाही तर त्याचा अर्थ शिवसेनेचे महत्त्व भाजपच्या लेखी या घडीस अत्यंत दुय्यम आहे हाच असेल. एवढे अपमानित होण्याची वेळ सेनेवर कधीच आली नसेल. मात्र, सारे अपमान गिळून सेना भाजपच्या दारात सत्तेसाठी उभी आहे असे आज चित्र दिसते. ‘एकच रक्त’ असल्याचा साक्षात्कारही सेना नेत्यांना आता झाला. देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे भाजप नेते आहेत. अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरच भाजपला पाठिंबा देण्याचा विचार करू म्हणणारी शिवसेना आता कोणत्या तोंडाने देवेंद्र यांच्यासारख्या विदर्भवादी सरकारमध्ये सामील होणार आहे हे पाहावे लागेल. उपमुख्यमंत्रिपद, महत्त्वाची किमान दोन मंत्रिपदे या शिवसेनेच्या अटी भाजप मानणार आहे का, की शिवसेनेला दुय्यमच लेखले जाणार आहे हेही येत्या लवकरच स्पष्ट होईल. भाजप नेते निवडणुकीत शिवसेनेने आपल्यावर उडवलेली राळ विसरलेले दिसत नाहीत. पण शेवटी महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यायचे असेल, तर राष्ट्रवादीच्या बाहेरच्या पाठिंब्यापेक्षा शिवसेनेने सत्तेत सहभागी होणे कधीही चांगलेच. त्यामुळे भाजपही आता तडजोडीचा मार्ग अवलंबील. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवरून नेण्याचा संकल्प फडणविसांनी सोडलेला आहे. त्यांना शुभेच्छा देऊया!