भाजप नेत्यांची पत्रकार परिषदेत घोषणा
भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपली हटवादी भूमिका कायम ठेवल्याने २५ वर्षांपासून असलेली उभयतांची युती अखेर काल संपुष्टात आली. भाजप नेत्यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषदेत युती तुटल्याची अधिकृतपणे घोषणा केली. शिवसेनेने कोणतीच तडजोड करण्याबाबत अनुकुलता न दर्शविल्याने युती कायम ठेवणे अशक्य ठरल्याचे भाजप नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जागा वाटपासंदर्भात शिवसेनेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. फक्त मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चेचे गुर्हाळ सुरू ठेवले गेले असा दावा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेनेने १५० जागांसाठीचा हेका न सोडल्याने घटक पक्षांचे जागा वाटप रखडले. परिणाम घटक पक्षांविना युती ठेवण्यात अर्थ नसल्याने ही युती संपुष्टात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मित्र पक्ष भाजपबरोबर राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाजपक्षाचे महादेव जानकर व शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्याबरोबर जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
युती झाली, तुटली, झाली, तुटली आणि त्यानंतर महायुती झाली व पुन्हा तुटली असा खेळ गेल्या काही दिवसांपासून चालला होता.
या खेळात मित्र पक्षांची फरफट झाली. युतीचा तिढा सुटण्यासाठी प्रारंभी या मित्रपक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतली होती. नंतर तेही वाढीव जागांसाठी अडून राहिले. शेवटी बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन या नेत्यांनी तयार केलेली युती संपुष्टात आली.