अखेर युद्धविराम

0
25

गेल्या आठ ऑक्टोबरपासून अखंड आणि अहोरात्र सुरू असलेल्या इस्रायल – गाझा युद्धात प्रथमच चार दिवसांच्या युद्धविरामाबाबत दोन्ही गटांत सहमती झाली आहे. अमेरिकेच्या आग्रहास्तव कतारने घडवून आणलेल्या ह्या समेटानुसार इस्रायलच्या प्रत्येक ओलिसामागे तीन पॅलिस्टिनी कैद्यांना इस्रायलला सोडावे लागणार आहे. शिवाय चार दिवस युद्धविरामही घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ह्या तडजोडीबाबत खुद्द इस्रायलच्या युद्धकालीन सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत, परंतु गाझामध्ये युद्धात भरडून निघणाऱ्या आबालवृद्धांसाठी मात्र हा फार मोठा दिलासा असेल. अर्थात हा युद्धविराम तात्पुरता असेल आणि हमास जेवढे ओलीस मुक्त करील, तेवढे त्याचे दिवस वाढत जातील, परंतु युद्ध मात्र आम्ही थांबवलेले नाही असे इस्रायलने जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे हा दिलासा तात्पुरता असेल हेही तितकेच खरे आहे. इस्रायल – गाझा युद्धामध्ये आजवर अकराशेहून अधिक बळी गेले. उत्तर गाझावर इस्रायली फौजांनी प्रत्यक्ष ताबाही मिळवला. हमासचे जमिनीखालील अनेक तळही उद्ध्वस्त केले, परंतु बहुसंख्य ओलिसांना हमासने कुठे ठेवले आहे ह्याचा थांगपत्ता मात्र इस्रायलसारख्या तंत्रज्ञानात माहीर असलेल्या देशालाही लागू शकलेला नव्हता. त्यामुळे ओलिसांच्या नातेवाईकांकडून सरकारवर सतत टीका होत होती. ह्या तडजोडीमुळे काही ओलिसांची सुटका होईल त्यामुळे टीकेची धारही कमी होईल असा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा होरा असावा. अन्यथा त्यांच्या सरकारला समर्थन देणाऱ्या उजव्या पक्षांचा ह्या युद्धविरामाला पाठिंबा दिसत नाही. खुद्द सरकारमधील राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतमार बेन ग्वीर यांनी ह्या तडजोडीला विरोध करताना ओलिसांना मुक्त केले जाणार असेल तर त्यात इस्रायली सैनिकांचा समावेश असायला हवा असा आग्रह धरला आहे. हमासने मात्र प्रामुख्याने महिला आणि मुलांचा ह्या सुटका होणाऱ्या ओलिसांत समावेश असेल असे जाहीर केले आहे. त्यातही हे सगळे ओलीस इस्रायलचेच असतील असे स्पष्ट नाही. इतर अनेक देशांचे नागरिकही ओलीस असल्याने त्यांची सुटका हमास प्राधान्याने करू शकते. दोघा अमेरिकी महिलांना हमासने यापूर्वीच कतारच्या मध्यस्थीमुळे सुरुवातीलाच सोडून दिलेले होते. हमास जेवढ्या प्रमाणात ओलिसांना मुक्त करील, तेवढा युद्धविराम वाढवत नेऊ असे इस्रायलने घोषित केले आहे. सध्या चार दिवसांसाठीचा युद्धविराम आहे आणि त्याबदल्यात सुमारे पन्नास ओलिसांची मुक्तता अपेक्षित आहे. पण ही संख्या वाढली तर युद्धविरामही चार दिवसांवरून दर दहा ओलिसांमागे एक दिवस असा वाढवत नेण्याची इस्रायलची तयारी आहे. त्यानंतर मात्र हमासचा खात्मा करण्याची आपली मोहीम पुन्हा कार्यान्वित केल्याखेरीज इस्रायल स्वस्थ बसणार नाही. गाझामध्ये जे रणकंदन गेले सात आठवडे सुरू आहे, त्यातून हजारो निष्पाप मुले, महिला बळी गेल्या हे खरे असले तरी ह्याची सुरुवात हमासने केली हे विसरता येत नाही. ज्या रानटीपणाने सात ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला झाला त्या दहशतवादी कृत्याची पॅलेस्टिनी मुक्तीचळवळीशी सांगड घालण्याचा प्रयत्न हमासने आणि त्याच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष समर्थकांनी सातत्याने चालवलेला असला, तरी मुळात ते एक आयसिससारखेच दहशतवादी कृत्य होते आणि इस्रायलसारखा कडवा देश त्याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे हमासही जाणून होती. पण तरीही ते आततायी कृत्य हमासने केले. त्याची फळे भोगावी लागली ती मात्र गाझावासीयांना. गाझावर सत्ता गाजवणाऱ्या हमासला आपल्या नागरिकांची, महिलांची, मुलाबाळांची चिंता असती, तर असे आततायी कृत्य त्यांनी केलेच नसते. परंतु येथे तर इस्पितळांना, शाळांना आपले अड्डे बनवून आणि भुयारांमध्ये तळ स्थापून इस्रायलविरुद्ध मोठी मोर्चेबंदी हमासने वर्षानुवर्षे केली होती. आपल्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून नागरी वस्त्यांतून ज्या प्रकारे इस्रायलवर क्षेपणास्रे हमास डागत राहिली, त्यातून त्यांचे अंगभूत रानटीपणच अधोरेखित होते. इस्रायलने हमासच्या नायनाटासाठी पाऊल उचलले खरे, परंतु जगातील सर्वांत दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या गाझामध्ये असा नीरक्षीरविवेक राखणे जवळजवळ अशक्यप्राय होते. त्यामुळे इस्रायलही मनमानीपणे हल्ले चढवत राहिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध निर्वासित छावण्यांवर, इस्पितळांवर आणि शाळांवरही इस्रायलचे हवाई हल्ले झाले, पण तेथेच हमासचे तळ असल्याचा इस्रायलचा दावा राहिला आहे. खरे तर हमासचा संपूर्ण नायनाट हे त्याचे उद्दिष्ट असले तरी ते साध्य होणे कठीण आहे. उलट सध्याच्या गाझावरील कारवाईमुळे खवळून उठलेल्या तरुणांतून दहशतवाद्यांची नवी पिलावळ तयार होण्याचीच अधिक शक्यता आहे.