>> देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब; सत्ता स्थापनेचा दावा सादर; आज शपथविधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या जवळपास 10-12 दिवसांपासून महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सर्वत्र रंगली होती. काल भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत सर्वांच्या सहमतीने देंवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती झाली. तसेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमोर सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत गुरुवारी होणारा शपथविधी व सत्तास्थापनेबाबतची माहिती दिली.
राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचे सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली असून, गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजता शपथविधी होणार आहे, असे एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मला आनंद आहे की अडीच वर्षांपूर्वी इथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिफारस आणि पाठिंब्याचे पत्र शिवसेनेच्या वतीने आम्ही दिले आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भाजपच्या उमेदवाराला देऊन टाकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल अशी भूमिका मी यापूर्वीच घेतली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
अजित पवारांच्या वक्तव्याने पिकला हशा
या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या, तसेच एकनाथ शिंदे व अजित पवारांनी एकमेकांना चिमटे काढले. यावेळी पत्रकारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले की उद्या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तुम्ही आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहात का? यावर एकनाथ शिंदे म्हणाले, थोडं थांबा, संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तेवढ्यात अजित पवार म्हणाले, मी तर उद्याच शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यावर शिंदे यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, अजितदादांना अनुभव आहे. त्यांना संध्याकाळी शपथ घेण्याचा, त्याचबरोबर सकाळी शपथ घेण्याचा देखील अनुभव आहे. शिंदेंच्या या टिप्पणीवर अजित पवार कुरघोडी करत म्हणाले, मागच्या वेळी आम्ही दोघांनी (मी व देवेंद्र फडणवीस) सकाळी शपथ घेतली होती. परंतु, त्यावेळी सरकार चालवायचे राहिले होते. यावेळी पुढच्या पाच वर्षांसाठी सरकार चालवणार आहोत.
आज मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा गुरुवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुंबईतील आझाद मैदानात पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह 22 राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काल देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांचे आणि जनतेचे आभार मानले. तसेच आमदारांना संबोधित करत असताना एक है तो सेफ है असा नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.