अखेर देवाभाऊ!

0
9

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयानंतर गेले अकरा दिवस लोंबकळलेला सरकारस्थापनेचा प्रश्न शेवटी काल एकदाचा निकाली निघाला. महाराष्ट्रातील महायुतीच्या नव्या सरकारच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे एकनाथ शिंदे नव्हेत, तर भाजपचे देवेंद्र फडणवीस स्वीकारतील हे काल स्पष्ट झाले. म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांमध्ये मोठी फूट घडवून आणून आणि त्यांच्या मदतीने विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय संपादन करून भारतीय जनता पक्षाने शेवटी आपले स्वतःचे सरकार घडविले आहे आणि स्वतःचा मुख्यमंत्री सिंहासनावर बसविला आहे व दोन्ही मित्रपक्षांची उपमुख्यमंत्रिपदावर बोळवण केली आहे. फडणवीस हे ब्राह्मण असल्याने एका मराठा नेत्याला हटवून ब्राह्मण नेत्याकडे मुख्यमंत्रिपद दिल्याचे काय परिणाम संभवतात ह्याची भाजप एवढे दिवस चाचपणी करीत होता, त्यामुळे आणि त्यात एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यामुळेच सत्तास्थापनेला हा विलंब लागला हे स्पष्ट आहे. शेवटी फडणवीस यांची काल भाजप विधिमंडळ गटनेतेपदी मोठ्या उत्सवी वातावरणात निवड झाली आणि महायुतीच्या बैठकीनंतर त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकारस्थापनेचा दावाही सादर केला. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांच्या नावाची घोषणा फडणविसांनी केली, परंतु एकनाथ शिंदे यांची नाराजी मात्र पुरती दूर झालेली दिसत नाही, त्यामुळे त्यांनी सरकारमध्ये यावे अशी इच्छा जरी फडणवीस यांनी व्यक्त केली असली, तरी हा अग्रलेख लिहून होईपर्यंत तरी शिंदे यांनी दुसरे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दर्शविलेली नव्हती. गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 148 जागा लढवल्या आणि त्यातील 132 जिंकण्याचा विक्रम केला. साहजिकच सर्वांत मोठा पक्ष ह्या नात्याने आणि ह्या एवढ्या मोठ्या यशाने त्याचा मुख्यमंत्रिपदावरील दावा बळकट झाला. शिवाय गेल्यावेळी शिवसेनेत फूट घडवली तेव्हा अगदी हातातोंडाशी आलेले फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद पक्षनेतृत्वाने शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले होते. त्यामुळे आता फडणवीस हेच महायुतीच्या विजयाचे खरे शिल्पकार असल्याने त्यांच्याकडे सत्तासूत्रे येत असताना शिंदे यांचा पापड मोडण्याचे कारण नव्हते. परंतु आपण राज्याचे मुख्यमंत्रिपदी राहिलो, आपल्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आणि आपल्याच कॉमन मॅनच्या प्रतिमेमुळे महायुतीला हे प्रचंड यश मिळाले असे एकनाथ शिंदे यांना वाटत असल्याने उपमुख्यमंत्रीपद किंवा महत्त्वाच्या मंत्रिपदांवर तडजोड करण्यास ते तयार नव्हते. त्यांनी आपले घोडे पुरेपूर दामटून पाहिले, परंतु अजित पवार यांनी आधीच आपला पाठिंबा देवेंद्र यांच्या नेतृत्वाला जाहीर करून टाकल्याने 57 जागा जिंकून दुसऱ्या स्थिती येऊनही शिंदे यांना काहीही सौदेबाजी करण्यास जागाच उरली नाही. त्यामुळे सरकारला नमवण्याचे साधनच शिंदे यांच्या हाती उरले नाही. महायुतीचे सगळे निर्णय दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच घेत असल्याने त्यांच्यापुढे किती आग्रह धरावा, किती ताणून धरावे ह्याचा विचारही शिंदे यांना करावा लागला, त्यामुळे सुरवातीला शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत असलेल्या आपल्या समर्थकांना नरमाईचे धोरण स्वीकारण्यास सांगणे त्यांना भाग पडले. दिल्लीतील बैठकीवेळचा त्यांचा पडलेला चेहरा, नंतर परस्पर थेट गावी निघून जाणे वगैरे प्रकारांतून आपली नाराजी शिंदे यांना जरी लपवता आली नाही, तरी ह्या दबावतंत्राला भाजप बळी पडणार नाही हे स्पष्ट झाल्याने त्यांना सरकारमध्ये सामील होणे भाग पडले आहे. गृहमंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या पदावर त्यांच्या पक्षाने दावा केला, तरी भाजप त्या दबावतंत्रापुढे झुकणार नाही हेही स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना कमकुवत केली असली तरी आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी शिवसेना महाराष्ट्रात बळकट होऊ देणे भाजपला भविष्यात महाग पडू शकते, त्यामुळे वेळीच शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचे पंख छाटण्याच्या तयारीत सध्या भाजप आहे. उपमुख्यमंत्रिपदी आलेले अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थखाते आले, तर उद्धव मुख्यमंत्रिपदी असताना मविआ सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवार कसा निधी रोखून धरायचे व त्यामुळे आपल्याला पक्ष कसा सोडावा लागला वगैरे युक्तिवाद करणाऱ्या शिंदेंना आता त्याच अजितदादांसोबत दिवस काढावे लागणार आहेत. शिंदे यांनी सत्तेसाठी पक्षाशी गद्दारी केली, परंतु सध्या त्यांची जी अवहेलना चालली आहे ती पाहिल्यास हेची फळ काय मम तपाला अशी भावना त्यांच्या मनात असेल यात शंका नाही. आता रस्सीखेच मंत्रिपदांसाठी असेल. त्यातून त्यांची नाराजी दूर होते की आणखी वाढते हे लवकरच कळेल.