अखेर ‘कमळ’ फुलले!

0
27
  • – प्रमोद ठाकूर

गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालांबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे भाकीत करण्यात आले होते. प्रत्यक्षात निवडणूक मतयंत्रामध्ये वेगळेच दडले होते! मतदारांनी मतदानाद्वारे राज्यात राजकीय स्थिरता आणि फुटिरांना धडा शिकवला आहे असेच म्हणावे लागेल.

गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालांबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. त्यांत निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे भाकीत करण्यात आले होते. प्रत्यक्षात निवडणूक मतयंत्रामध्ये वेगळेच दडलेले होते! मतदारांनी भाजपला काठावरचे बहुमत दिले आहे. मतदारांनी मतदानाद्वारे राज्यात राजकीय स्थिरता आणि फुटिरांना धडा शिकवला आहे असेच म्हणावे लागेल. राजकीय पक्षांनी या निवडणूक निकालापासून बोध घेऊन पुढील वाटचाल करण्याची गरज आहे.

राज्यात मागील पाच वर्षांत राजकीय अस्थिरता होती. राज्यात भाजपचे सरकार असले तरी कॉँग्रेस, मगोच्या आमदारांना फोडून सरकार बनविण्यात आले होते. राज्यात फोडाफोडीच्या राजकारणामुळे राजकीय अस्थिरताच कायम होती. फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हे फोडाफोडीचे राजकारण सुरू होते. विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय संपादन करण्याच्या उद्देशाने भाजपाकडून इतर राजकीय पक्षांतील जिंकण्याची क्षमता असलेल्या काही प्रमुख नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. आता विधानसभेच्या २०२२ च्या निवडणूक निकालानंतर फोडाफोडीचे राजकारण बंद होईल, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

विधानसभा निवडणूक निकालामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. कॉँग्रेस पक्षाला १८ ते १९ जागा, भाजपला १४ ते १५ वगैरे अंदाज व्यक्त केले जात होते. प्रादेशिक पक्षांना सरकार स्थापनेमध्ये महत्त्व प्राप्त होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाने सरकार स्थापनेसाठी प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळविण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या. तथापि, निवडणूक निकाल जाहीर होताच कॉँग्रेसला मोठाच धक्का बसला. निवडणुकीत भाजपला २० जागा मिळाल्या. निवडणूक निकालाने प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी झाले आहे, असे दिसून आले.
विधानसभेच्या फेब्रुवारी २०२२ च्या निवडणुकीत अनेक राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने मतविभागणी झाली. या मतविभागणीचा भाजप, कॉँग्रेस, मगो आदी राजकीय पक्षांना फटका बसला. तसेच काही ठिकाणी लाभसुद्धा झाला. काही मतदारसंघांत मतविभागणीमुळे अनपेक्षित निकाल लागले. या निवडणूक निकालावरून राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आणि नेत्यांनी आत्मचिंतन करून पुढील वाटचाल करण्याची गरज आहे.

राज्य विधानसभेत आम आदमी पार्टी (आप) आणि रेव्होल्युशनरी गोवन (आरजी) या राजकीय पक्षांनी प्रवेश केला आहे. ‘आप’चे दोन उमेदवार आणि ‘आरजी’चा एक उमेदवार निवडून आला आहे. भाजपला सर्वांधिक २० जागा मिळाल्या आहेत, तर कॉँग्रेसला ११, मगोला २, गोवा फॉरवर्डला १ जागा मिळाली आहे. ३ अपक्ष निवडून आले आहेत. या निवडणुकीत १९ नवीन चेहरे निवडून आले आहेत. मावळती विधानसभा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढविलेले १७ जण पुन्हा निवडून आले आहेत, तर चार माजी आमदारांनी विधानसभेत पुन्हा प्रवेश केला आहे. राज्यातील १२ फुटीर आमदारांमधील नऊ जणांना लोकांनी घरचा रस्ता दाखविला आहे. फुटीरांमधील केवळ मोन्सेरात दाम्पत्य आणि नीळकंठ हर्ळणकर पुन्हा विजयी झाले आहेत. मतदारसंघातील वर्चस्वामुळे मोन्सेरात दाम्पत्य पुन्हा विजयी झाले आहे.
भाजप सरकारमधील दोन्ही उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर आणि मनोहर आजगावकर यांना पराभवाच्या नामुष्कीला तोंड द्यावे लागले. माजी मुख्यमंत्री, अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. त्यांच्यामुळेच भाजपच्या उमेदवाराला पराभवाला तोंड द्यावे लागले. पणजीतून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांनीही मोन्सेरातना जोरदार टक्कर दिली. त्यांना थोड्या मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. केपे मतदारसंघात वर्चस्व असलेल्या उपमुख्यमंत्री कवळेकर यांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल कॉँग्रेस पक्षाने मोठा गाजावाजा केला होता. कॉंग्रेस व इतर पक्षांतील नेत्यांना त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश दिला. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाचे तृणमूलमध्ये विलीनीकरण करून निवडणुकीपूर्वी विधानसभेत तृणमूलचा आमदार तयार केला. तथापि, विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आणण्यात या पक्षाला यश प्राप्त झाले नाही.

विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’ या नवीन प्रादेशिक पक्षाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. साधारण १० टक्क्यांच्या आसपास मते ‘आरजी’ या पक्षाला मिळाली आहेत. सांत आंद्रे मतदारसंघातून ‘आरजी’चा उमेदवार विरेश बोरकर निवडून आला आहे. गेली कित्येक वर्षे राजकारणात असलेल्या भाजपच्या फ्रान्सिस सिल्वेरा यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत ‘आरजी’ पक्षाच्या उमेदवारांना विविध मतदारसंघांत चांगली मते मिळाली आहेत. भाजप नेते विश्‍वजित राणे यांच्याविरोधात ‘आरजी’चे मनोज ऊर्फ तुकाराम परब यांना सहा हजार मते मिळाली. राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांना आरजी या प्रादेशिक पक्षाची दखल घ्यावी लागणार आहे.
राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे असे बोलले जात होते. पण या वातावरणाचा फायदा घेण्यात कॉँग्रेस पक्षाला यश मिळाले नाही. भाजपला ३३.३१ टक्के मते मिळाली, तर भाजपच्या विरोधात उतरलेल्या राजकीय पक्षांना ६६ टक्के मते मिळाली. कॉँग्रेस पक्षाला २३.४६ टक्के मते मिळाली.

भाजपविरोधातील मतं कॉँग्रेस पक्षाकडे वळविण्यात कॉँग्रेसच्या नेत्यांना यश प्राप्त झाले नाही. भाजप विरोधातील मतांची विविध पक्षांत विभागणी झाली. निवडणुकीपूर्वी योग्य नियोजन केले असते तर कॉँग्रेसला त्याचा फायदा झाला असता. कॉँग्रेस आणि तृणमूल कॉँग्रेस यांच्यात आघाडीसाठी प्रयत्नही करण्यात आले. तथापि, सर्वांची निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याने आघाडी होऊ शकली नाही. कॉँग्रेस पक्षाने अखेरच्या क्षणी गोवा फॉरवर्डशी आघाडी केली.
भाजपच्या मतांचे जास्त प्रमाणात विभाजन झाले नाही. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उमेदवारीमुळे भाजपला मांद्रे मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. प्रियोळ मतदारसंघात अपक्ष संदीप निगळ्ये यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे उमेदवार गोविंद गावडे यांना जास्त मताधिक्य मिळवता आले नाही. फोंडा मतदारसंघात भाजपचे संदीप खांडेपारकर यांच्या बंडखोरीमुळे भाजपचे उमेदवार रवी नाईक यांना जास्त मताधिक्य मिळवता आले नाही. त्यांना केवळ ७७ मतांची आघाडी मिळाली.

राज्य विधानसभेत दुसर्‍यांदा उतरलेल्या आम आदमी पक्षाने दोन जागांवर विजय संपादन करण्यात यश मिळवले. सासष्टी तालुक्यातील बाणावली आणि वेळ्ळी या दोन मतदारसंघांतून ‘आप’चे व्हेंझी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा विजयी झाले आहेत. ‘आप’ने सासष्टी तालुक्यातून राजकीय स्थान बळकट करण्यास सुरुवात केली आहे. सासष्टी तालुक्यात यापूर्वी कॉँग्रेसचे वर्चस्व होते; मात्र आता कॉँग्रेसचे वर्चस्व कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सासष्टी तालुक्यात कॉँग्रेसला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. सासष्टीमधील नावेली मतदारसंघातून भाजपचा उमेदवार उल्हास तुयेकर विजयी झाले आहेत. भाजपला नावेली मतदारसंघात अनपेक्षित विजय मिळाला आहे. सासष्टीमधील दोन जागांवर ‘आप’ने कब्जा केला आहे. गोवा फॉरवर्डने एक जागा मिळविली, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मताधिक्य बरेच घटले आहे. साखळी मतदारसंघातून सलग तिसर्‍यांदा विजयी होऊन त्यांनी हॅट्‌ट्रिक केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना केवळ ६१६ मतांची आघाडी मिळाली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याविरोधात त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी काम केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपमधील नेतेपद मिळविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याविरोधात काम करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. परंतु सावंत यांचा पराभव करणे शक्य झाले नाही.

सभापती राजेश पाटणेकर यांना डिचोली मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. आपल्या विरोधात पक्षाच्या काही नेत्यांनी काम केल्याचा संताप पाटणेकर यांनी व्यक्त केला आहे. सभापती पाटणेकर यांची निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी नव्हती. मुख्यमंत्री डॉ. सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी विनवणी केल्यानंतर अखेर राजेश पाटणेकर निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार झाले होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात ज्या उमेदवारांना नवीन सरकारमध्ये मंत्रिपद देण्याचे आश्‍वासन दिले होते, त्यांतील बहुतांश उमेदवारांचा पराभव झाला आहे. सभापती पाटणेकर यांना मंत्रिमंडळात समावेश करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. फातोर्डा मतदारसंघातील उमेदवार दामू नाईक, मडगाव मतदारसंघातील उमेदवार मनोहर आजगावकर, मांद्रे मतदारसंघातील उमेदवार दयानंद सोपटे यांना मंत्रिपदे देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु या सर्वांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी योग्य नियोजन केल्याने २० उमेदवार निवडून आले आहेत. जिंकण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षांतील आमदार, अपक्ष आमदारांना, उमेदवारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेले रवी नाईक, गोविंद गावडे, रोहन खंवटे, प्रवीण आर्लेकर, प्रेमेंद्र शेट विजयी झाले आहेत, तर जयेश साळगावकर यांना पराभव पत्करावा लागला. भाजपने तीन माजी आमदारांना पुन्हा निवडून आणले आहे. त्यांत गणेश गावकर, सुभाष फळदेसाई आणि रमेश तवडकर यांचा समावेश आहे.
मायकल लोबो भाजपमधून बाहेर पडल्याने बार्देश तालुक्यातील भाजपचे वर्चस्व कमी झाले आहे. बार्देशमधील केवळ तीन जागा भाजपला मिळाल्या आहेत, तर कळंगुट, शिवोली, साळगाव आणि हळदोणा या चार जागा कॉँग्रेसला मिळाल्या आहेत.

सत्तरी तालुक्यातील दोन्ही जागांवर विजय संपादन करून भाजपचे नेते विश्‍वजित राणे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. पर्ये मतदारसंघातून प्रथमच भाजप उमेदवार डॉ. दिव्या राणे विजयी झाल्या आहेत. या मतदारसंघात कॉँग्रेसचे नेते प्रतापसिंह राणे निवडून येत होते. या निवडणुकीत ज्येष्ठ राणे उतरले नाहीत. वाळपई मतदारसंघातून विश्‍वजित राणे भरघोस मताधिक्याने पुन्हा निवडून आले आहेत.

सांगे, सावर्डे, काणकोण या मतदारसंघांत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. खाणव्याप्त भागातील सावर्डेतून भाजपचे गणेश गावकर, सांगेमध्ये सुभाष फळदेसाई आणि काणकोणमध्ये भाजपचे रमेश तवडकर विजयी झाले आहेत.

डिचोली तालुक्यातील दोन जागा भाजपला मिळाल्या असून एक जागा अपक्षाला मिळाली आहे. फोंडा तालुक्यातील फोंडा, शिरोडा आणि प्रियोळ या तीन जागांवर भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे. फोंडा आणि प्रियोळमध्ये भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी बंड केले असले तरी त्याठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. फोंडा तालुक्यातील केवळ मडकई मतदारसंघावर मगोचे वर्चस्व कायम आहे.

तिसवाडी तालुक्यात भाजपचे वर्चस्व कमी झाले आहे. केवळ पणजी आणि ताळगाव मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. सांताक्रुझ आणि कुंभारजुवा या दोन मतदारसंघांत कॉँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर सांत आंद्रे मतदारसंघात ‘आरजी’ या प्रादेशिक पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. पेडणे तालुक्यात मगो आणि भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
यावेळी विधानसभा निवडणुकीत एकूण पाच दाम्पते होती. त्यांतील तीन दाम्पते विजयी झाली आहेत. उपमुख्यमंत्री चंद्रकात कवळेकर, त्यांची पत्नी सावित्री कवळेकर यांना पराभवाला तोंड द्यावे लागले. तृणमूल कॉँग्रेसचे किरण कांदोळकर आणि त्यांची पत्नी कविता कांदोळकर यांनाही पराभव पत्करावा लागला. निवडणूक रिंगणात उतरलेल्या चर्चिल आलेमांव आणि वालंका आलेमांव या बाप-लेकीला मतदारांनी पराभूत केले आहे.

राज्यात निवडणूक काळात राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक जाहीरनाम्यातून वेगवेगळी आश्‍वासने दिली. आता भाजपला वचननाम्याच्या अंमलबजावणीसाठी पाऊल उचलावे लागणार आहे. भाजपने वर्षाला तीन घरगुती गॅस
सिलिंडर मोफत देण्याचे आश्‍वासन दिले होते. घरबांधणीसाठी कमी व्याजदरात कर्ज, तसेच खाणप्रश्‍न सहा महिन्यांत सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. इंधनाचा दर न वाढविण्याचेही आश्‍वासन दिले आहे. दयानंद सामाजिक योजनेचे मानधन तीन हजार रुपये करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
राज्यात भाजपकडे २० आमदारांचे संख्याबळ आहे. इतर राजकीय पक्षातील नेत्यांना प्रवेश दिल्याने भाजप हे संख्याबळ गाठू शकला. मगोने भाजपला विनाअट पाठिंबा दिला आहे. तसेच ३ अपक्ष आमदारांनी सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. भाजपला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देणारे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे.