अखिल जगाची माता ः पृथ्वी योगसाधना

0
41

५४०योगमार्ग – राजयोग अंतरंग योग – १२५

– डॉ. सीताकांत घाणेकर

एका दाण्याच्या बदल्यात धरतीमाता आम्हाला शेकडो दाणे देते. एका बीजाच्या बदल्यात शेकडो फळे देते. तसेच बरोबर बीजेंही देते. एवढेच नव्हे तर हे सर्व करून ती आनंदित होते कारण ती देण्यातच समाधान व स्वतःच्या अस्तित्वाचे सार्थक मानते.

आपण धरतीमातेबद्दलच्या एका छोट्याशा प्रार्थनेचा अभ्यास – शब्दार्थ, गर्भितार्थ तसेच थोडे सखोल चिंतन करीत आहोत. दररोज सकाळी उठल्यावर म्हणण्यात येणारी ही प्रार्थना – ‘समुद्रवसने देवी…..!!’
यातील प्रत्येक शब्दात गहन अर्थ व तत्त्वज्ञान आहे. धरतीमातेला ‘समुद्रवसने’ म्हटलं आहे. तसेच तिला ‘विष्णुपत्नी’ म्हणजेच ‘लक्ष्मी’ म्हटले आहे.
आपण अनेकवेळा एक दृश्य बघतो- सागराच्या तळाला श्रीविष्णू शेषनागावर पहुडले आहेत व श्रीलक्ष्मी त्यांच्या पायाकडे बसलेली आहे. हे दृश्य अत्यंत हृदयगम्य आहे. बालपणात आणि आतासुद्धा मला फार आवडणारे असे दृश्य आहे. योगसाधनेचा अभ्यास केल्यानंतर वाटते की श्रीविष्णू शवासनात आहेत. तसेच श्रीमहादेव कैलासावर सतत ध्यानावस्थेत (पद्मासनात) दाखवले जातात. योगसाधना करतेवेळी अशी दृश्ये डोळ्यासमोर आणली की चित्त एकाग्रता करण्यास सोपे जाते.

पू. पांडुरंगशास्त्री या संदर्भात एक वेगळाच विचार मांडतात – ‘‘धरती मातेच्या विशाल शरीराला झाकणारे सागर ही तिची विविध वस्त्रे आहेत. मनुष्यदेह जसा वस्त्राने आच्छादित असतो तशी पृथ्वीही मोठ्या अंशाने समुद्राने आच्छादलेली आहे. मानव जसा वस्त्रांनी शोभतो तशी पृथ्वीदेखील समुद्रांनी शोभते. समुद्राला पृथ्वीमातेच्या वस्त्राची उपमा देऊन शास्त्रकारांनी संतांनानाही परोक्षरीत्या उपदेश केला आहे. समुद्र जसा स्वतःच्या मर्यादा सोडत नाही त्याप्रमाणे मानवाने वस्त्रपरीधान मर्यादेला बाजूला सारता कामा नये. आजच्या काळात वस्त्रांना मर्यादारक्षणाऐवजी अंगप्रदर्शनाचे साधन बनवीत असलेले पाहून शास्त्रकारांना तसेच सृष्टीच्या सर्जकाला किती व्यथा होत असतील हे सूज्ञ हृदयच जाणू शकते.’’
वस्त्रपरिधानाचा हा विषय- मुख्यत्वे करून स्त्रियांच्या वस्त्रांचा – फार आवश्यक पण संवेदनशील आहे. विश्‍वात या संदर्भात जे घडते आहे ते प्रत्येकाला ज्ञात आहे. त्या विषयावर इथे विचारप्रदर्शन व भाष्य करण्याची गरज नाही. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. तसेच ते परस्परविरोधी असतात. परंपरा व आधुनिकता हे दोन विचार इथे प्रदर्शित होतात. आम्हाला त्यात पडण्याचे कारण नाही. प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य आहे. योग्य- अयोग्य याबद्दल चिंतन करून त्याप्रमाणे प्रत्येकजण निर्णय घेऊन त्यानुसार आचरण करेल. योगसाधनेत पवित्रतेला अत्यंत महत्त्व आहे. हा मुद्दा लक्षात ठेवून प्रत्येक व्यक्तीने आपली कृती ठरवली. ऋषीमहर्षी आपल्या विचारांनी फक्त मार्गदर्शन करतात. संत-महात्मे-महापुरुष त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जातात. आपण कसे जावे हे स्वतः ठरवू.

धरती मातेचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे उदारता – उदारतेचे ती मूर्तिमंत स्वरूप आहे. या संदर्भात पू. शास्त्रीजींचे विचार अत्यंत मौल्यवान आहेत…
‘‘सागरात सापडणार्‍या अमूल्य रत्नांचा किंवा मोत्यांचा तिला थोडाही लोभ नाही. पृथ्वीमाता ही सर्व समृद्धी स्वतःच्या पुत्रांना देऊन टाकते. धन्य आहे तिच्या औदार्याची. वसुंधरा स्वतः शोभते स्वतःच्या वीर रत्नांच्या वैभवात आणि गौरव अनुभवते- नरश्रेष्ठांच्या निर्मितीत. भगवंताला ज्यांचे स्मरण करताना आनंद होतो अशा अनेक पुण्यशील पुरुषांचे सर्जन पृथ्वीमातेने केले आहे.

‘प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक
व्यासाम्बरीष शुकशौनक भीष्पदाल्भ्यान् |
रुक्मांगदार्जुन वसिष्ठ बिभीषणादीन्
पुण्यान् इमान् परमभागवतान् नमामि॥

  • ह्या अशा अनेक थोर पुरुषांची नावे आपण अनेकवेळा ऐकतो. विविध क्षेत्रातील हे उच्च कोटीचे आदर्श आहेत. शेवटी आपल्यासारखेच मानव आहेत पण सदाचरणामुळे फार मोठे झाले. इथे शास्त्रीजी त्यांना पृथ्वीमातेच्या ‘वीर रत्नां’ची उपमा देतात.
    आमच्या भारतात फक्त पुरुषरत्ने जन्मली असे नाही तर स्त्रियादेखील प्रातःस्मरणीय आहेत. त्यादेखील अनेक आहेत. पण पाच सती आहेत-

‘अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा |
पञ्चकं ना स्मरेन्नित्यं महापातक नाशनम् ॥

  • गौतम ऋषींची पत्नी अहल्या, पांडवांची पत्नी द्रौपदी, प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता, हरिश्‍चंद्राची पत्नी तारामती, रावणाची पत्नी मंदोदरी – या पाच महासतींचे जो नामस्मरण करतो त्याच्या महान् पातकांचा नाश होतो.

मुख्य मुद्दा म्हणजे नामस्मरणाबरोबरच त्यांच्या जीवनाचा, आदर्शाचा अभ्यास हवा. त्याप्रमाणे आपले आचरण करणेही अपेक्षित आहे.

भारतीय संस्कृतीची महत्ता अशी की – वेदशास्त्रपारंगत शिवभक्त (वेदांना ऋचा लावणारा) रावण स्वतःच्या विकारांमुळे राक्षस ठरला तर त्याची धर्मपत्नी मंदोदरी महासती मानली गेली.
आपण एवढाच विचार करुया की हे सर्व स्त्री-पुरुष ज्या मार्गाने गेले, तसेच आपणही जाऊया. शेवटी आपणही त्याच पृथ्वीमातेची संतान आहोत. ते थोर झाले मग आम्ही का होणार नाही? म्हणूनच अशा महान चरित्रांचा अभ्यास आवश्यक आहे. बालपणापासूनच तसे शिक्षण व संस्कार हवेत. पृथ्वीमातेचे गुण अनेक आहेत. त्यातील काही म्हणजे – क्षमा, सहनशीलता, औदार्य. ती सर्व सृष्टीला- प्राणी, पक्षी, वृक्ष, वनस्पती… सर्वांना जल देते. म्हणजेच ती सर्वांना जीवन प्रदान करते. मानव तिला खणतो, नांगरतो… बीज पेरतो. खरे म्हणजे यामुळे तिला वेदना होत असतील असा विचार आपण करत नाही. ती आम्हाला अन्न, फुले, फळे देते. इथेच एक छान धडा आहे- ‘अपकार करणार्‍यावरही उपकार करणे.’- धरतीमातेशिवाय हा धडा आम्हाला कोण शिकवू शकेल?

उपकारिषु यः साधु साधुत्वे तस्य को गुणः|
अपकारिषु यः साधु स साधुः सद्भिरुच्यते ॥

  • एका दाण्याच्या बदल्यात धरतीमाता आम्हाला शेकडो दाणे देते. एका बीजाच्या बदल्यात शेकडो फळे देते. तसेच बरोबर बीजेंही देते. एवढेच नव्हे तर हे सर्व करून ती आनंदित होते कारण ती देण्यातच समाधान व स्वतःच्या अस्तित्वाचे सार्थक मानते.

थोडा विचार केला तर लक्षात येईल की आपली प्राकृत मातादेखील धरतीमातेसारखीच सहनशील आहे. नऊ महिने मुलाला आपल्या गर्भाशयात व्यवस्थित सांभाळते- एका पेशीपासून एवढा मोठा देह घडतो. पण होणारे त्रास सोसते. पडेल ते सर्व काम -घरचे अथवा बाहेरचे – आनंदाने करते. त्यानंतर मुलाचा जन्म झाला की आपल्या रक्तापासून मुलासाठी पौष्टीक, अमृतासारखे दूध बनवते. मूल जसे जसे मोठे होते तसे त्याचे संगोपन करते. त्याला शिक्षण देते, संस्कार देते. वयात आल्यावर योग्य जोडीदाराबरोबर त्याचा विवाह करून दते. मानव असल्यामुळे मातेची एकच अपेक्षा असते की आपल्या मुलाने पालकांना वृद्धपणी सांभाळावे. दुःखाची गोष्ट म्हणजे सगळे पालक भाग्यवान नसतात. अनेकांना वृद्धाश्रमात आश्रय घ्यावा लागतो. अर्थात, काहीवेळा तशीच अपरिहार्य कारणे असतात. पण बहुतेकांच्या संदर्भात तसे नसते. त्यांना आपल्या घरी कुटुंबात- नातवंडांबरोबर उर्वरित आयुष्य जगायची फार इच्छा असते.

या अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक विषयावर विचार करताना आपण धरतीमातेपासून योग्य ते सद्गुण आत्मसात केले तर अशा समस्या पुष्कळ कमी होतील.
सारांश, माणसाने कृतघ्न न होता कृतज्ञ रहावे. योगसाधक नक्की असेच वागत असतील याबद्दल मला खात्री आहे. कारण योगसाधना करता करता आपण आनेक संस्कारांचे पालन करतो.